नेत्यांवर बूटफेक? नव्हे, निषेधाचा राजमार्ग!


गेल्या गुरुवारी भाजपचे राज्यसभेतील खासदार जी. व्ही. एल. नरसिंहा राव यांच्या पत्रकार परिषदेत अशीच एक घटना घडली. कानपुर येथील एक सर्जन आणि मोदींचा टीकाकार मानल्या जाणाऱ्या व्यक्तीने राव यांच्यावर बूट फेकून मारला. राव व इतर भाजप नेते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना पक्षाच्या उमेदवार म्हणून जाहीर करण्यासाठी माध्यमकर्मियांशी संवाद साधत होते. त्यावेळी डॉ. शक्ति भार्गव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने राव यांच्या दिशेने बूट फेकला. या निमित्ताने अशा घटनांची एक उजळणीही झाली.

भारतात अशा प्रकारची पहिली कुप्रसिद्ध घटना 7 एप्रिल 2009 रोजी नोंदण्यात आली होती. जर्नल सिंग या एका हिंदी दैनिकाच्या पत्रकाराने पी. चिदंबरम यांच्यावर बूट फेकला होता. त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. दिल्लीतील 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगली प्रकरणातील आरोपी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्याच्या विरोधात त्याने हे पाऊल उचलले होते. त्यानंतर सिंग याला पोलिसांनी काही काळ स्थानबद्ध करून सोडले होते. चिदंबरम यांनी तो बूट चुकवला आणि पोलिसांना सिंग याला सौम्यपणे घेऊन जाण्यास सांगितले. इतकेच नाही तर जर्नलसिंगने पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. मात्र त्यात त्याला यश आले नाही, मात्र 2015 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्याने यश मिळविले.

अशाच प्रकारे 16 एप्रिल 2009 रोजी भाजपचे कार्यकर्ते पावस अग्रवाल यांनी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या दिशेने चप्पल भिरकावली होती. त्यानंतर अग्रवाल यांना चौकशीसाठी अटक करण्यात आली होती. अग्रवाल हे मध्य प्रदेशातील कटनी शहराचे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही अशा एका प्रकाराला सामोरे जावे लागले होते. अहमदाबाद येथे एका प्रचार सभेत बोलताना 26 एप्रिल 2009 रोजी त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. एका संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्याने त्यांच्यावर बूट फेकला होता, मात्र तो व्यासपीठाच्या अलीकडेच पडला होता. या घटनेने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि इतर सुरक्षाकर्मी घाबरले होते, परंतु मनमोहनसिंग यांनी आपला तोल ढळू न देता हितेश चौहान नावाच्या त्या विद्यार्थ्यावर गुन्हा न नोंदविण्यास बजावले होते. विरोधी भाजपने या घटनेचा निषेध केला होता.

राजस्थानच्या नवसंचार पत्रिकेतील एक पत्रकार सुनीलकुमार यांने काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्यावर 6 जून 2011 रोजी बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वर्षी, 18 ऑक्टोबर रोजी जलाऊं जिल्ह्यातील जितेंद्र पाठक नावाच्या एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकला होता.

काँग्रेसचे तेव्हा सरचिटणीस असलेल्या राहुल गांधी यांनाही या बूटफेकीचा सामना करावा लागला होता. देहरादूनमधील निवडणूक प्रचार सभेत 23 जानेवारी 2012 रोजी एकाने हे कृत्य केले होते.

केवळ भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणातहीअशा घटना घडल्या आहेत. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यावर इराकमधील बगदाद येथे 14 डिसेंबर 2008 रोजी मुंतधर अल जैदी या पत्रकाराने जोडे फेकले होते. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना लास वेगास येथे भाषण देत असताना एका स्त्री निदर्शकाने बूट फेकून मारला होता. इराक युद्धाचा निषेध करणार्‍या एका व्यक्तीने इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यावर 2010 मध्ये डब्लीन येथील एका पुस्तक समारंभात बूटफेक केली होती. चीनचे तत्कालीन अध्यक्ष वेन जिआबो हे इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये भाषण देत असताना त्यांच्या दिशेने एका निदर्शकाने पादत्राण फेकले होते.

युरोप, उत्तर अमेरिका, भारत, चीन आणि हाँगकाँगमध्येही यांसारख्या अनेक घटना घडल्या आहेत. शेजारील पाकिस्तानमध्येही माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर बूट भिरकावण्यात आला होता. सिंध उच्च न्यायालयात जामिनासाठी मुशर्रफ आले असताना एका अज्ञात व्यक्तीने मुशर्रफ यांच्यावर बूट भिरकावला होता.

एखाद्याचा निषेध करण्यासाठी शांततामय निदर्शने किंवा आंदोलन करणे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य मार्ग आहेत. मात्र लोकांचा संयम दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे ते चपला आणि बूट हातात घेत आहेत. एखाद्या राजकारण्यावर लोकांनी चप्पल किंवा बूट फेकण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यातील काही घटनांची तात्पुरती चर्चा होती आणि काही दिवसांनी त्या इतिहास बनतात. आता या घटनांचे प्रमाण एवढे वाढले आहे, की काही दिवसांनी बूटफेक हा निषेधाचा राजमार्ग म्हणून मानला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही.

Leave a Comment