मुले लठ्ठ होऊ द्यायची नसतील तर…


मुलांना लठ्ठ होऊ द्यायचे नसेल तर काय करावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार त्यांना टीव्ही आणि मोबाईलच्या पडद्यापासून दूर ठेवायला हवे. एका वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना इलेक्ट्रॉनिक स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवायला हवे आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना दिवसातून एका तासापेक्षा जास्त वेळ स्क्रीनजवळ ठेवता कामा नये, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

जागतिक पातळीवर बालकांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी डब्ल्यूएचओने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये हा सल्ला देण्यात आला आहे. छोटी बालके सुदृढ राहावीत आणि विशेषतः पहिल्या पाच वर्षांमध्ये त्यांचा विकास उत्तमरीत्या व्हावे जेणेकरून आजीवन ते निरोगी राहावेत, यासाठी या सूचना करण्यात आल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या तज्ञांच्या एका पॅनलने ही मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. पुरेशी झोप न मिळणे, स्क्रीन पाहण्यात किंवा खुर्चीत बसून मुलांनी घालवलेला वेळ यांचा बालकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास त्यांनी केला.

संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संघटना असलेल्या डब्ल्यूएचओने पाच वर्षांपेक्षा छोट्या मुलांसाठी खास या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहे. जगभरात सुमारे चार कोटी बालकांचे वजन सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे आणि एकूण बालकांमध्ये त्यांचे प्रमाण सहा टक्के आहे. त्यातील अर्धी बालके हे आफ्रिका आणि आशिया खंडात आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमधील बालकांच्या वर्तनाचा अभ्यास यात करण्यात आला. यातील गोळा केलेल्या माहितीनुसार, 75 टक्के मुलांची जीवनशैली निरोगी नाही.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी स्क्रीन पाहण्यात अत्यंत कमी वेळ घालवावा. निरोगी राहण्यासाठी पूर्ण झोप घ्यायला हवी आणि सक्रिय खेळांमध्ये अधिक वेळ घालवावा. शिशुंनी (एका वर्षापेक्षा कमी) दिवसातून अनेक वेळा शारीरिक क्रिया केल्या पाहिजेत, खासकरून जमिनीवर खेळासारख्या क्रिया कराव्यात. त्यांना एका वेळी एका तासापेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवू नये. त्यांनी स्क्रीनसमोर बिल्कुल वेळ घालवू नये. दोन वर्षांच्या लहान मुलांसाठी, टीव्ही किंवा व्हिडीओ पहाण्याचा वेळ 60 मिनिटांपेक्षा जास्त नसावा आणि जेवढा कमी वेळ लागेल तेवढे चांगले. तीन ते चार वर्षे वयोगटातील मुलांनी विविध प्रकारच्या शारीरिक क्रियांमध्ये कमीतकमी 180 मिनिटांचा वेळ घालवावा, अशा शिफारसी या अहवालात करण्यात आल्या आहेत.

‘‘सर्व लोकांनी निरोगी राहावे याचा अर्थ लोकांच्या जीवनाच्या सुरूवातीपासूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आहे,’’ असे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अडनॉम गॅब्रियेसस यांनी सांगितले. ‘‘बालपणातील आरंभीच्या काळात बालकांचा विकास झपाट्याने होतो आणि याच वेळेस निरोगी राहण्यासाठी त्याला अनुकूल अशी कुटुंबाची जीवनशैली घडविता येते,’’ असे ते म्हणाले.

“शारीरिक क्रिया सुधारणे, झोपेत घालवलेला वेळ कमी करणे आणि लहान मुलांना उत्तम झोप मिळेल हे सुनिश्चित करणे यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे बालपणातील लठ्ठपणा आणि नंतरच्या आजारांना रोखण्यास मदत होईल,” असे डब्ल्यूएचओमधील तज्ञ डॉ. फिओना बुल यांनी सांगितले. सध्याच्या जीवनशैलीमुळे शारीरिक क्रियाकलापांची पूर्तता होत नाही आणि त्यामुळे दरवर्षी जगभरात सर्व वयोगटातील 50 लाखांपेक्ष अधिक मृत्यू होतात, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

मुलांसाठी व किशोरांसाठी अतिवजन आणि लठ्ठपणा ही मोठी समस्या झाली आहे. अमेरिकेसारख्या देशात जवळजवळ एक तृतीयांश बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींना जादा वजन किंवा लठ्ठपणाची समस्या आहे. जी मुले जास्त वजनदार किंवा लठ्ठ आहेत त्यांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या काळात तासंतास टीव्हीसमोर बसलेली मुले आणि घरातील मोठी मंडळी, कार्टूनमध्ये गर्क झालेली मुले किंवा मोबाईलशी खेळणारी मुले हे चित्र सर्रास झाले आहे. त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक नुकसानीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. लहान मुले व कुमारवयीनु मुलांमध्ये हे प्रमाण मोठे आहे. हा एक मोठा धोका आहे आणि डब्ल्यूएचओसारख्या संघटना वारंवार या धोक्याच्या चिन्हांकडे आपले लक्ष वेधत आहेत. त्याकडे आपण लक्ष देणार का नाही, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.

Leave a Comment