१९९० च्या दशकामध्ये गाजलेल्या या चित्रपटांनी दिली या पर्यटनस्थळांना नवी ओळख

movie
बॉलीवूड चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर १९९०च्या दशकामध्ये निरनिराळ्या कथानाकांवर आधारित अनेक चित्रपट या काळामध्ये खूप लोकप्रिय झाले. केवळ या चित्रपटांची कथानाकेच चांगली होती असे नाही, तर या चित्रपटांमध्ये कलाकारांचे अभिनय, संगीत, नृत्यरचना आणि अर्थातच अतिशय निसर्गरम्य ठिकाणी केले गेलेले चित्रपटाचे चित्रीकरण या सर्वच गोष्टींमुळे हे चित्रपट लोकप्रिय ठरले होते. या चित्रपटांचे चित्रीकरण ज्या ठिकाणी केले गेले, ती ठिकाणे वास्तविक लोकांच्या थोड्याफार परिचयाची असली, तरी या ठिकाणांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती चित्रपटांमुळे. हे चित्रपट लोकप्रिय झाल्याने ज्या ठिकाणी या चित्रपटांचे चित्रीकरण झाले, ती ठिकाणेही लोकप्रिय झाली, आणि पर्यटनस्थळे म्हणून अधिक नावारूपाला आली.
movie1
१९९०च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख-काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला अमाप लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन खरे तर वीस वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे, पण तरीही या चित्रपटाची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटाने दर्शकांना इंग्लंड आणि इतर युरोपियन देशांपासून पंजाब पर्यंतची भ्रमंती करविली. आता ही सर्वच ठिकाणे लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला आली आहेत. तबू आणि चंद्रचूड सिंह अभिनीत ‘माचीस’ या चित्रपटामध्ये हिमाचाल प्रदेशातील मनाली या पर्यटनस्थळाला आणखी लोकप्रियता मिळवून दिली.
movie3
‘मैंने प्यार किया’ या सलमान आणि भाग्यश्रीच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील ‘दिल दिवाना..’ या गीताचे चित्रीकरण उटीमध्ये झाले होते. हे गीत गाजल्यानंतर उटी पर्यटकांसाठी पसंतीचे ठिकाण ठरले होते. त्याचप्रमाणे तमिळ नाडूतील कुन्नूर या ठिकाणी असलेल्या हिरव्यागार चहाच्या मळ्यांमध्ये ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटातील ‘ये मौसम का जादू..’ हे गाणे चित्रित करण्यात आले असून, हे गीतही अतिशय गाजले होते. आमिर खान अभिनित अतिशय गाजलेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाचे चित्रीकरण देहरादून आणि कोडाई कॅनाल येथे झाले होते. ही दोन्ही ठिकाणे आता पर्यटनस्थळे म्हणून लोकप्रिय आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने भूज या ठिकाणाची ओळख प्रेक्षकांना करवून दिली, तर प्रीती झिंटा आणि शाहरुख अभिनीत ‘दिल से’ या चित्रपटाने केरळची लोकप्रियता वाढविली.

Leave a Comment