हे आहेत जयपुरचे युवराज – राजकुमार पद्मनाभ सिंह


एकोणीस वर्षीय राजकुमार पद्मनाभ सिंह हे जयपुरचे राजे महाराज सवाई मानसिंह (दुसरे) यांचे पणतू आहेत. जयपुरच्या आलिशान राजमहालामध्ये राजकुमार पद्मनाभ सिंह यांचे वास्तव्य असून, त्यांना ‘महाराजा’ या उपाधीने संबोधित केले जाते. अलीकडच्या काळामध्ये राजकुमार पद्मनाभ यांना एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅशन हाउस तर्फे आयोजित केल्या गेलेल्या फॅशन शो मध्ये रँपवर चालतानाही पाहिले गेले आहे. मिलॅन येथे आयोजित, ‘डोल्चे अँड गबाना’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडतर्फे सादर केल्या गेलेल्या ‘स्प्रिंग 2019 मेन्सवेअर कलेक्शन’ साठी मॉडेलिंग करण्यासाठी पद्मनाभ या फॅशन शो मध्ये सहभागी झाले होते. या पूर्वी ही अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंट्समध्ये पद्मनाभ सहभागी झाले आहेत.

पद्मनाभ यांनी पोलो या खेळामध्ये ही प्राविण्य मिळविले असून, २०१७ साली लंडनमधील हर्लिंगहॅम पार्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पोलो सामन्यांमध्ये त्यांनी भारताच्या पोलो संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यावेळी पद्मनाभ यांना ब्रिटीश राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी यांच्यासोबत पोलो खेळण्याची संधी मिळाली होती.

सध्या पद्मनाभ न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये ‘लिबरल आर्ट्स’ या विषयाचे शिक्षण घेत असून, अनेक आंतरराष्ट्रीय मॅगझीन्स आणि फॅशन वेबसाईट्सवर पद्मनाभ यांची छायाचित्रे वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. पद्मनाभ यांचे स्वतःचे इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. याद्वारेही पद्मनाभ स्वतःची अनेक छायाचित्रे आणि रोचक पोस्ट्स ‘शेअर’ करीत असतात.

Leave a Comment