मोदी, शहा आणि गुजरात – प्रश्न अर्ध्या प्रतिष्ठेचा!

combo
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 115 मतदारसंघात मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यातील सर्वात जास्त जागा या टप्प्यात असणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये एकूण 188 जागांसाठी मतदान झाले आणि आता एकाच टप्प्यात 115 जागांवर बाजी लागली आहे. त्यामुळे हा तिसरा टप्पा सर्वाधिक रंजक ठरणार आहे.

मंगळवारच्या टप्प्यात 14 राज्यांमध्ये मतदान होत आहे, मात्र त्यातील सर्वात महत्त्वाचे राज्य गुजरात हे आहे. राज्यातील सर्व 26 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. याशिवाय केरळच्याही सर्व 20 जागांवर मंगळवारीच मतदान आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी 14 जागांसाठीही मतदान आहे, मात्र या सर्वांमध्ये खरी चुरस गुजरातमध्येच असणार आहे. याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या दोघांचेही हे गृहराज्य आहे. भाजपमध्ये सध्या कर्तेधर्ते किंवा सर्वेसर्वा हे मोदी आणि शाह हेच आहेत. या दोघांचीही राजकीय कारकीर्द सुरू झाली गुजरातेत आणि गुजरातमधूनच हे दोघे राष्ट्रीय राजकारणात प्रस्थापित झाले. आता राष्ट्रीय राजकारणात भले ही रूळले असतील, मात्र आपल्या घरच्या राज्यात त्यांचा वट अजूनही आहे का नाही, याची परीक्षा या निमित्ताने होणार आहे.

गुजरात हा अनेक वर्षांपासून भाजपचा गढ आहे. राजस्थान व मध्य प्रदेशसारखे भाजपचे अन्य गढ ढासळले, मात्र हा गढ अद्याप कायम आहे. भाजपने 1989 च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होण्याची कामगिरी केली आहे. जागा भलेही कमी-जास्त झाल्या असतील, मात्र वर्चस्व भाजपचेच आहे. त्या दृष्टीन पाहिले तर गेल्या तीन दशकांपासून राज्यात भाजपचा दबदबा आहे आणि हा दबदबा निर्माण करण्यात नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे.

तसेच मोदी यांनी 2014 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून दिले तेव्हा त्या कामगिरीत ज्या राज्यांचा महत्त्वाचा वाटा होता त्यात गुजरात हेही एक होते. राज्यातील सर्वच्या सर्व 26 जागा भाजपने जिंकल्या होत्या. तीच कामगिरी करण्याचे भले मोठे आव्हान भाजपपुढे आहे आणि हे आव्हान ते पेलू शकतात का नाही, हे पाहण्यात संपूर्ण देशाला रस आहे.

भाजपने भलेही त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा दावा केला असेल, मात्र प्रत्यक्षात हे डोंगराएवढे कठीण काम आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून राज्यातील नद्यांमध्ये भरपूर पाणी वाहून गेले आहे. भाजप अजिंक्य नाही, हे दीड वर्षांपूर्वी झालेल्या 2017च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. आताच्या परिस्थितीत भाजपला 20 जागा मिळवतानाही दमछाक होईल, अशी परिस्थिती आहे. या उलट काँग्रेसने 15 जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

स्थानिक विश्लेषकांच्या मते, गुजरातेतील सध्याच्या समीकरणांनुसार भाजप 13 जागांवर सहज विजय मिळवू शकतो. पक्षानेही या जागांवर फारशी मेहनत घेतलेली नाही आणि तरीही या जागी विजय सहजसाध्य आहे. यापैकी बहुतांश जागा शहरी भागांत आहेत, हे सांगायला नको. अहमदाबाद पूर्व, अहमदाबाद पश्चिम, गांधीनगर, वडोदरा, सूरत, नवसारी, भरूच, कच्छ, भावनगर, जामनगर, खेडा, दाहोद आणि पंचमहाल या जागांवर भाजपचा विजय पक्का मानला जात आहे. काँग्रेसनेही या ठिकाणी जे उमेदवार दिले आहेत ते भाजपचा विजय सुकर व्हावा, याच पद्धतीने. अर्थात काँग्रेसला दोष देऊनही फायदा नाही, कारण या ठिकाणी काँग्रेसचे मुळात संघटनच नाही.

मात्र उरलेल्या 13 ठिकाणी भाजपच्या नाकी नऊ येतील, अशी परिस्थिती आहे. या जागा बहुतांश सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातच्या आहेत. या ठिकाणी ग्रामीण मतदार जास्त आहेत आणि त्यातही शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. आणंद, अमरेली, सुरेन्द्रनगर, पाटण, बनासकांठा आणि जुनागढ या ठिकाणी भाजपला सर्वात जास्त झुंजावे लागणार आहे. यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारही तोडीस तोड दिले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले, तर नवल नाही. आणंदमध्ये भरतसिंह सोलंकी, अमरेलीत परेश धानाणी, सुरेन्द्रनगरमध्ये सोमाभाई पटेल, पाटणमध्ये जगदीश ठाकोर, बनासकांठात परथी भटोळ आणि जुनागढमध्ये पूंजाभाई वंश यांना काँग्रेसने रिंगणात उतरवले आहे. हे नेते गुजरातेत भाजपच्या वादळापुढेही पाय रोवून उभे राहिलेले नेते आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवारही कमजोर आहे म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसच्या विजयाची शक्यता जास्त आहे.

अन्य ठिकाणी शर्थीजी झुंज होईल, अशी चिन्हे आहेत. महेसाणा, बारडोली, वलसाड, छोटा उदेपुर, पोरबंदर, राजकोट आणि साबरकांठा या ठिकाणी अंदाज वर्तवणे कठीण आहे.

थोडक्यात म्हणजे अर्ध्या जागांवर हमखास यशाची खात्री असली तरी अर्ध्या जागांवर प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात भाजपच्या जागा जास्त असतील हे नक्की, मात्र पक्षाला फटका बसेल हेही नक्की. हा फटका जेवढा कमी करता येईल तेवढे भाजप नेत्यांची – त्यात मोदी आणि शाहही आले – प्रतिष्ठा कायम राहील.

Leave a Comment