असा आहे इतिहास महाबळेश्वरचा

mahabaleshwar
महाबळेश्वर म्हटले की निळ्याशार पर्वतरांगा, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगरातून वाहणारे पाण्याचे सुंदर धबधबे, आणि अर्थातच रसाळ स्ट्रॉबेरी या सर्वच गोष्टी नजरेसमोर उभ्या राहतात. ब्रिटीशकालीन ‘बॉम्बे प्रेसिडन्सी’चे ‘समर कॅपिटल’, म्हणजेच उन्हाळ्याच्या काळातली ‘राजधानी’ असलेल्या महाबळेश्वरमध्ये ब्रिटीश उच्चपदस्थ अधिकारी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येऊन राहत असत आणि त्या दिवसांपुरता सर्व कारभार इथूनच चालविला जाई. आता ब्रिटीशांचे भारतावर अधिपत्य काही दशकांपूर्वीच संपुष्टात आले असले, तर महाबळेश्वर मात्र अजूनही ‘समर कॅपिटल’ म्हणून लोकप्रिय आहे. समुद्रसपाटीपासून ४,४३९ मीटरच्या उंचीवर असलेले हे थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून २५० किलोमीटरच्या अंतरावर असून, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि खास स्ट्रॉबेरीच्या मोसमामध्ये महाबळेश्वरला पर्यटकांची नेहमीच भरपूर गर्दी होत असते. मात्र केवळ एक उत्तम पर्यटनस्थळ इतकीच या ठिकाणाची ओळख नाही. या गावालाही स्वतःचा खास इतिहास आहे. येथे असलेल्या प्राचीन मंदिरांपासून ते गावातल्या मध्यवर्ती पेठेपर्यंत, अनेक गोष्टी या गावाच्या इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत.
mahabaleshwar1
महाबळेश्वरशी निगडीत अनेक रोचक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. एका आख्यायीकेच्या अनुसार सृष्टीचे आणि मनुष्यप्राण्याचे निर्माण केल्यानंतर भगवान ब्रह्मांना पश्चात्ताप होऊ लागला. आपल्या कृत्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी महाबळेश्वरच्या अरण्यांमध्ये ब्रह्मांनी कठोर तप सुरु केले. जेव्हा ब्रह्मा ध्यानस्थ बसले होते, तेव्हा महाबली आणि अतिबली या दोन असुरांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा चंग बांधला. हे पाहून भगवान विष्णू ब्रह्माच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अतिबलीचा वध केला. महाबलीला मात्र इच्छामृत्यूचे वरदान असल्याने त्याचा वध करणे अशक्य होते. म्हणूनच देवी महामायेची मदत विष्णूंनी मागितली. देवी महामाया सौंदर्यवती असल्याने तिच्या रूपाने महाबलीला भुरळ पडली. तिला मिळविण्यासाठी ती जे काही मागेल ते देण्यास महाबली तयार झाला. महामायेने ही संधी घेऊन महाबलीकडे, त्याचा मृत्यू मागितला. महामाया जे काही मागेल ते तिला देण्यासाठी महाबली वचनबद्ध असल्याने आपल्या मृत्यूचा स्वीकार त्याला करावाच लागला, पण तत्पूर्वी आपले नाव श्री शंकराशी जोडले जावे असा वर महाबलीने महामायेकडे मागितला. म्हणूनच या ठिकाणाचे नाव महाबळेश्वर पडले असल्याची आख्यायिका आहे.
mahabaleshwar2
चौदाव्या शतकापर्यंत या ठिकाणावर यादव राजांचे आधिपत्य होते. त्यानंतर मात्र अनेक निरनिराळ्या वंशांच्या राजकर्त्यांचे आधिपत्य या ठिकाणी होते. यांमध्ये दिल्लीच्या मुघल दरबाराचे प्रतिनिधित्व करणारे मुस्लीम राजे, बहामनी वंशाचे राजे, व बहामनी राज्यांपासून वेगळे झालेल्या बिजापूर आणि अहमदनगरच्या राज्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता. जेव्हा महाबळेश्वरवर अहमदनगरच्या निझामांचे आधिपत्य होते, तेव्हा महाबळेश्वरची जबाबदारी निझामांनी शिर्के कुटुंबीयांवर सोपविली. पण आपापसात काही मतभेद झाल्याने शिर्के आणि निझामांचे संबंध बिनसले आणि त्यानंतर महाबळेश्वरची जबाबदारी शिर्के मंडळींकडून काढून घेऊन मोरे कुटुंबियांना देण्यात आली. हेच मोरे कुटुंब पुढे जावळी आणि महाबळेश्वरचे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर मोऱ्यांच्या पुढील सात पिढ्यांचे महाबळेश्वरवर आधिपत्य राहिले.
mahabaleshwar3
त्यानंतरही महाबळेश्वर वर निरनिराळ्या सत्त्ताधीशांचे अधिपत्य राहिले. कधी यावर पेशव्यांचे आधिपत्य होते, तर कधी हे गाव सातारकर छत्रपतींच्या अधीन होते. एकोणिसाव्या शतकामध्ये मात्र महाबळेश्वरचे रूप पालटले, ते ब्रिटीश अधिकारी जनरल लोड्विक यांच्या आगमनाने. १८२४ साली इथे आलेल्या जनरल साहेबांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर आपले अनुभव कथन करणारे, येथील सुंदर निसर्गाचे वर्णन करणारे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवापालट म्हणून हे ठिकाण अतिशय योग्य असल्याचे पत्र त्यांनी ‘बॉम्बे कुरियर’ या वृत्त पत्रामध्ये प्रसिद्ध केले.
१९२५ साली कर्नल ब्रिग्स यांनी महाबळेश्वरला भेट दिल्यानंतर भारतामध्ये निरनिराळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या युरोपियन मंडळींच्या करिता विश्रांतीस्थळ येथे बनविण्याची कल्पना त्यांना सुचली. आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कर्नल ब्रिग्स यांनी सातारकर छत्रपतींची भेट घेऊन महाबळेश्वरपर्यंत सहज पोचता येणे शक्य व्हावे यासाठी चांगला रस्ता बांधाविण्यासाठी त्यांना राजी केले. १८२६ साली ब्रिग्स स्वतः महाबळेश्वर येथे येऊन राहिले आणि स्वतःसाठी त्यांनी येथे लहानसेच पण आरामदायी कॉटेज बांधवून घेतले. आपल्या अधिकाऱ्यांच्या समोर ब्रिग्स यांनी महाबळेश्वरचे इतके सुंदर वर्णन केले होते, की १८२८ साली तत्कालीन ‘गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ असलेले सर जॉन माल्कम यांनी ही या हिल स्टेशनला आवर्जून भेट दिली. सर माल्कम यांना हे ठिकाण इतके पसंत पडले, की महाबळेश्वर आपल्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी छत्रपतींना राजी केले आणि त्या बदल्यात त्यांनी छत्रपतींना वाई देऊ केले.
mahabaleshwar4
सर माल्कम यांना महाबळेश्वर बद्दल वाटणारी आपुलकी राजांना माहिती होती, त्यामुळे सर माल्कमच्या प्रस्तावाला राजांनी मंजुरी दिलीच, पण त्याशिवाय गावातील मध्यवर्ती पेठेला सर माल्कम यांचे नावही दिले. आजतागायत महाबळेश्वरमधील मध्यवर्ती पेठ ‘माल्कम पेठ’ या नावानेच ओळखली जाते. १८२९ साली महाबळेश्वर हे ‘बॉम्बे प्रेसिडन्सी’चे ‘समर कॅपिटल’ असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. सरकारी कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिटीश सरकारच्या आर्थिक मदतीने अनेक मोठ्या सार्वजनिक इमारतींचे निर्माण येथे केले गेले. महाबळेश्वरमध्ये जसजशा सोयी उपलब्ध होत गेल्या तशा अनेक नामांकित पारशी व्यापाऱ्यांनी येथे जमिनी खरेदी केल्या. याच व्यापाऱ्यांच्या आर्थिक सहाय्याने महाबळेश्वर मध्ये प्रवाश्यांसाठी धर्मशाळा आणि एक मोठे इस्पितळही उभे राहिले. आजच्या काळामध्ये ही या इमारती, आणि सुंदर टुमदार बंगले या गावाची शोभा वाढवीत आहेत. १८३४ ते १८६४ या काळाच्या दरम्यान ब्रिटीशांच्या कैदेमध्ये असलेल्या मलाय आणि चीनी कैद्यांना कामाला लावून ब्रिटीशांनी महाबळेश्वरमध्ये बटाटे, इतर भाज्या आणि स्ट्रॉबेरीची लागवड सुरु करविली. हे कैदी येथून स्थलांतरित झाल्यानंतर स्थानिक लोकांनी या बागा आपल्या ताब्यात घेऊन भाज्यांची लागवड सुरु ठेवली. अशा रीतीने महाबळेश्वरची खासियत असेलेली स्ट्रॉबेरीची लागवड येथे सुरु झाली.

Leave a Comment