राजधानी दिल्लीतील या ‘इटिंग जॉईंंट्स’ चे बॉलीवूड सेलिब्रिटीजही आहेत फॅन


राजधानी दिल्ली ही येथील खाद्यसंस्कृती करिता देखील ओळखली जाते. अगदी महागड्या, आलिशान रेस्टॉरंट्स पासून ते चांदनी चौकमधील ‘परांठेवाली गली’ पर्यंत काही खास इटिंग जॉईन्ट्समध्ये खवैय्यांची गर्दी नेहमीच पाहिली जाते. चटपटीत चाट पासून आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ उपलब्ध असणाऱ्या या इटिंग जॉईन्ट्सनी बॉलीवूड सेलिब्रिटीजना ही आपले फॅन करून घेतले असल्याने, चित्रीकरणाच्या निमित्ताने किंवा अन्य कुठल्याही निमित्ताने हे कलाकार राजधानीमध्ये आल्यास आपल्या आवडत्या इटिंग जॉईंटमध्ये हजेरी आवर्जून लावतात.

अभिनेत्री कतरिना कैफ हिला दिल्लीतील महागड्या, आलिशान रेस्टॉरंट्स बरोबरच दिल्लीचे खास स्ट्रीट फूडही विशेष आवडते. दिल्लीतील बंगाली मार्केटमधील चाट आणि चांदनी चौकमधील ‘परांठेवाली गली’मधील चविष्ट पराठे कतरीनाच्या विशेष आवडीचे आहेत. तर अभिनेत्री सोनम कपूर दिल्लीतील बंगाली मार्केटमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘नाथू गोलगप्पे’ची जबरदस्त फॅन आहे. पाणीपुरीच्या या प्रकाराला दिल्लीमध्ये ‘पुचका’ ही म्हटले जाते. दीपिका पदुकोन दिल्लीमध्ये आली की ‘ ऑलिव्ह बार अँड किचन’ येथे आवर्जून भेट देते. या रेस्टॉरंटची एक शाखा मुंबईमध्येही असून हे रेस्टॉरंटही दीपिकाच्या पसंतीचे आहे.

अभिनेता सैफ अली खानला दिल्लीतील ‘वासाबी’ येथे भोजन घेण्यास आवडते. येथे मिळणारे जपानी खाद्य पदार्थ आणि सुशी सैफच्या विशेष आवडीचे आहेत. सुशांत सिंह राजपूत हा मूळचा दिल्लीवासीच असल्याने येथील खाद्यसंस्कृती त्याच्या परिचयाची आहे यात नवल ते काहीच नाही. सुशांतला ताजच्या ‘द मिंग हाऊस’मध्ये भोजन घेणे आवडते, तर अभिनेता रणवीर सिंह दिल्लीमध्ये असला की ‘ला सिर्के’ रेस्टॉरंटला आवर्जून भेट देत असतो. किंग खान शाहरुखही मूळचा दिल्लीवासी असून, दिल्लीची खासियत असलेले छोले भटुरे शाहरुखच्या विशेष आवडीचे आहेत, तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला दिल्लीचे लोकप्रिय स्ट्रीट फूड राज कचोरी आणि आलू टिक्की विशेष आवडतात.

Leave a Comment