काही देशांमध्ये आहेत अशा ही अजब परंपरा

tradition
विविधता ही जगामध्ये सर्वच बाबतीत आढळते. मग ही विविधता देशा-देशांच्या खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतली असो, सांस्कृतिक व भाषिक असो, किंवा पेहरावाची असो, या सर्व विविधातांमुळेच आपले जग सुंदर झाले आहे. जशी प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी, तशा तेथील परंपराही निराळ्या. परंपरा या त्या त्या देशांतील जीवनशैलीला अनुसरून असल्या तरी काही देशांमधील परंपरा मात्र काहीशा विचित्र म्हटल्या तरी वावगे ठरणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर पिवळ्या गुलाबाचे देता येईल. बहुतेक सर्व देशांमध्ये पिवळा गुलाब देणे हे मैत्रीचे प्रतीक असले, तरी इटली आणि मेक्सिकोमध्ये मात्र पिवळा गुलाब हा अंत्यविधीच्या वेळी उपस्थित असताना दिला जाण्याची परंपरा आहे. अशाच काही अजब परंपरांची ओळख करून घेऊ या.
tradition1
इंडोनेशियामधील तिडोंग जमातीमध्ये नव्याने विवाहबद्ध झालेल्या जोडप्याला तीन दिवस आणि तीन रात्री बाथरूमचा वापर न करू दिला जाण्याची परंपरा आहे. ही बाब आपल्याला जरी भलतीच विचित्र आणि अशक्यप्राय वाटत असली, तरी तिडोंग जमातीच्या लोकांसाठी मात्र ही परंपरा सवयीची आणि सामान्य आहे. किंबहुना या परंपरेचे पालन न करणाऱ्या नवदाम्पत्याला जन्मभर दुःखाला आणि अडचणींना तोंड द्यावे लागते अशी समजूत येथे रूढ आहे. त्यामुळे या परंपरेचे पालन करणे प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी बंधनकारक असून, घरातील नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या देखरेखीखाली या परंपरेचे पालन केले जात असते.
tradition2
‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने मैत्रीची भावना दर्शविणारा पिवळा गुलाब आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. ही प्रथा बहुतेक सर्वच देशांमध्ये रूढ असली, तरी मेक्सिको, इटली, चीन या देशांमध्ये पिवळा गुलाब कोणाला भेट देणे असभ्यपणाचे वर्तन समजले जाते. फ्रांस सारख्या देशांमध्ये परस्परांशी असलेले प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचे दर्शविण्यासाठी पिवळा गुलाब देण्याची पद्धत आहे. जर्मनी देशामध्ये ‘पोल्टरआबेंड’ नामक एक परंपरा खास विवाहसोहळ्यांच्या वेळी पाळली जाते. विवाहसमारंभासाठी उपस्थित असलेले सर्व पाहुणे या विधीमध्ये सहभागी होतात. या परंपरेअंतर्गत उपस्थित सर्व पाहुणे नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोर्सेलेनच्या प्लेट्स फोडतात. जितकी जास्त क्रोकरी फुटेल तितके नवविवाहित दाम्पत्याचे भाग्य उजळेल अशी मान्यता येथे आहे.
tradition3
डेन्मार्क देशामध्ये एक विचित्र परंपरा आढळून येते. येथे जर एखादी व्यक्ती वयाची पंचविशी उलटून गेल्यानंतरही ‘सिंगल’ असेल, तर अशा व्यक्तीला तिच्या पंचविसाव्या वाढदिवशी नातेवाईक आणि मित्र मंडळी दालचिनीच्या पावडरने माखून टाकतात. किंबहुना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडला जात असल्याने, दालचिनीने माखलेली व्यक्ती अजूनही ‘सिंगल’ असल्याचे सर्वांनाच समजते. जर एखादी व्यक्ती तिशी ओलांडून गेल्यानंतरही ‘सिंगल’ असेल, तर अश्या व्यक्तीला दालचिनीच्या ऐवजी काळ्या मिरीच्या पावडरने माखून टाकले जाते. व्हेनेझुएला देशामध्ये एखाद्या कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराने येणे ही सर्वमान्य परंपरा आहे.
tradition4
व्यवसायाच्या निमित्ताने होत असणाऱ्या मीटींग्ज एखाद्या कंपनीच्या बोर्डरूममध्ये किंवा हॉटेल्समधील कॉन्फरन्स रूम्समध्ये आयोजित होण्याची परंपरा जगमान्य आहे. मात्र फिनलंड या देशामध्ये व्यवसायाशी निगडीत महत्वाच्या मीटींग्ज चक्क ‘सौना'(sauna)मध्ये आयोजित होतात. महत्वाच्या मीटींग्जच्या वेळी सर्वांनी तणावरहित असणे आवश्यक असून, त्यामुळेच वार्तालाप व्यवस्थित होऊन योग्य निर्णय घेतले जातात अशी येथे मान्यता असल्यामुळे सौना किंवा आलिशान स्पा मध्ये व्यावसायिक मीटींग्ज आयोजित केल्या जाण्याची परंपरा येथे आहे.

Leave a Comment