लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेरे नाम’चा सीक्वल

tere-naam
अभिनेता सलमान खानच्या आजवरच्या सर्व चित्रपटांपैकी महत्त्वाचा चित्रपट असलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटामध्ये त्याने सादर केलेल्या अभिनयाला अनेकांनी दाद दिली. ‘तेरे नाम’ या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये तब्बल २४ नामांकने मिळाली असून, सात पुरस्कार या चित्रपटाने पटकावले होते. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. सतीश कौशकने २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’चे दिग्दर्शन केले असून तेच आगामी सीक्वलचे दिग्दर्शन देखील करणार आहेत. त्यामुळे १६ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या संदर्भातील वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘तेरे नाम २’ची स्क्रिप्ट सतीश कौशिक यांनी पूर्ण केली आहे. पण सध्या ते पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेल्या कागज चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. ते या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर ‘तेरे नाम २’च्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. या वृत्ताला सतीश कौशिक यांनी देखील दुजोरा दिला आहे. या चित्रपटावर मी सध्या काम करत असल्यामुळे या चित्रपटाविषयी अधिक काही सांगता येणार नसल्याचे सतीश यांनी सांगितले.

दरम्यान, सतीश कौशिक यांनी या सीक्वलसाठी काही दिवसांपूर्वी सलमान खानशी संपर्क साधला होता. पण या चित्रपटाला सलमानने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश कौशिक सलमानच्या नकारानंतर दोन नव्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट करणार आहेत. मात्र सलमान या चित्रपटामध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसू शकतो अशी चर्चा होत आहे.

Leave a Comment