वाराणसीमध्ये आघाडीच्या शालिनी यादव देणार मोदींना आव्हान

shalini-yadav
लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मोदी विरोधात शालिनी यादव या वाराणसीतून निवडणूक लढतील. काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांच्या शालिनी यादव या कन्या आहेत. ७व्या टप्प्यात १९ मे रोजी वाराणसीमध्ये मतदान होणार आहे.

शालिनी यादव यांच्याव्यतिरिक्त संजय चौव्हान यांना चंदौली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीमध्ये जागा वाटपाच्या वेळी वाराणसी समाजवादी पक्षाच्या पारड्यात पडल्यामुळे या जागी मोदींविरोधात शालिनी यादव यांना लढावे लागेल. लोकसभेच्या ८० जागा उत्तर प्रदेशात असून पंतप्रधान मोदीसारखेच माजी पंतप्रधान चंद्रशेखर, काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठी आणि दिवंगत पंतप्रधान लालबादुर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनीही येथून निवडणूक लढवली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही २००९च्या निवडणुकांमध्ये निवडणूक जिंकली होती.

अरविंद केजरीवाल यांनी मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. ते त्यामध्ये २ लाख मत घेऊन दुसऱ्या स्थानावर होते. पण २००९च्या आकड्यांवर नजर टाकली तर, सपा आणि बसप यांना एकूण मुरली मनोहर जोशी यांच्यापेक्षा जास्त मतदान मिळाले होते. पण वेगवेगळी निवडणूक दोघांनी लढवल्यामुळे मुरली मनोहर जोशी निवडून आले होते. यावेळी मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे मोदींसमोर आव्हान उभे राहू शकते. तर, प्रियंका गांधीही या जागेवरुन निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे.

Leave a Comment