पाटणा – भाजप सोडून नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा बंडखोरी करण्यापासून थांबलेले नाहीत. ते आता काँग्रेस विरोधात बंडखोरी करत असल्याची चर्चा असून त्यांच्या उमेदवारीवरही या वागणुकीमुळे गदा येण्याची शक्यता आहे.
शॉटगनची काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी
शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये ३ दशक काम केल्यानंतर काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये असताना पक्षाच्या कार्यप्रणालीवरून अनेकदा टीका केल्यामुळे ते भाजपमध्ये बंडखोर नेते म्हणून ओळखले जात होते. पण आता त्यांचा हा बंडखोरी स्वभाव काँग्रेसमध्ये असतानाही दिसून येत आहे.
बिहारच्या पाटणा साहिब येथून शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर, समाजवादी पक्षाच्या तिकीटावर त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौ येथून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसनेही लखनौ येथून उमेदवारी दिली आहे. पण पूनम सिन्हांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी ते समाजवादी पक्ष आणि बसपच्या रॅलीमध्ये उपस्थित होते. त्यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला.
दरम्यान मायावती या पुढील पंतप्रधान होतील, असे पूनम सिन्हांच्या एका जनसभेत शत्रुघ्न यांनी म्हटले. बिहार काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या या वक्तव्यामुळे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष त्यावरून सिन्हांची उमेदवारी रद्द करू शकतात, असे म्हटले जात आहे. अध्यक्ष मदन मोहन झा यांनी एका वक्तव्यात स्पष्ट केले आहे की सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नसल्यामुळे वेळ आल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आपण कोणताही निर्णय घेऊ शकतो.