घरातला पसारा कमीच होत नाही ? मग करा या गोष्टींचा विचार

Decluttering
आजकाल ‘होम ऑर्गनायझेशन’ची संकल्पना खूपच लोकप्रिय होत चालली आहे. आपले घर अनेक सुंदर शोभेच्या वस्तूंनी सजविताना घरातील रोजच्या उपयोगामध्ये आणल्या जाणाऱ्या वस्तू नीटनेटक्या पद्धतीने ठेवल्या गेल्यास घराचे सौंदर्य आणखी वाढतेच, त्याशिवाय आवश्यकता असते तेव्हा वस्तू चटकन सापडून उपयोगामध्येही आणता येते. घरामध्ये नेहमी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूंची नेटकी मांडणी करण्यासोबतच निरुपयोगी वस्तू कमी करणे ही तितकेच महत्वाचे असते. अनेकदा एखादी वस्तू आवडते म्हणून आणली जाते, आणि उपयोग होत नसतानाही भविष्यामध्ये कधी तरी कामी येईल म्हणून जतन करून ठेवली जाते. त्याचबरोबर अनेकदा खराब झालेल्या किंवा जुन्या वस्तूही घरामध्ये जतन करून ठेवल्या जातात. अशा प्रकारे घरामध्ये वस्तूंचा साठा होत जात असताना कितीही घर आवरले तरी पसारा कमीच होत नाही अशी बहुतेक गृहिणींची तक्रार नेहमीच असते. त्यामुळे घर नीटनेटके करण्यासाठी आणि ते तसे राहावे यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे असते.
Decluttering1
खास समारंभांसाठी किंवा खास मेजवान्यांसाठी आवर्जून खरेदी केलेली क्रोकरी किंवा भांडी फारशी वापरात नसल्यास ती इतर कोणाला तरी देऊन टाकण्याचा विचार अवश्य करावा. अनेकदा आपण एखादी वस्तू अतिशय हौशीने घेतली असल्याने ती वस्तू आपल्या उपयोगाची नसूनही ती तशीच साठवून ठेवण्याचा मोह आवरायला हवा. अनेकदा आपल्याला आपल्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या भेटवस्तू आपण केवळ भावनेच्या आहारी जाऊन घरामध्ये आपल्याला आवश्यकता नसतानाही साठवून ठेवतो. अशा वेळी भावनांच्या आहारी न जाता व्यवहारीपणाने विचार करीत वस्तूची खरोखर आवश्यकता आहे किंवा नाही याचा विचार करणे आवश्यक आहे.
Decluttering2
क्रोकरी, भांडीकुंडी, भेटवस्तू यांच्यासोबत घरामध्ये साठून राहणारी गोष्ट म्हणजे कपडे. एखाद्या दिवशी कपाट आवरायला काढले, की महिनोंमहिने दृष्टीसही न पडलेले कपडे अचानक प्रकट होतात. किंबहुना बाजरातून आणलेला किंवा तत्कालीन फॅशनबरहुकुम ऑनलाईन मागविलेला एखादा पोशाख आपल्याकडे आहे याचाच मुळी आपल्याला विसर पडलेला असतो. हा पसारा कमी करण्यासाठी एक सूत्र अतिशय उपयोगी पडते. सुप्रसिद्ध होम ऑर्गनायझर मारी कोंडो हिच्या मते एखादी वस्तू किंवा पोशाख जर सहा महिन्यांच्या अवधीमध्ये एकदाही वापरला गेला नसेल, तर त्या वस्तूची किंवा पोशाखाची आपल्याला खरोखर आवश्यकता आहे का याचा अवश्य विचार केला जावा, आणि वस्तूची आवश्यकता नसल्याचे लक्षात आले, तर ती वस्तू घरातून कमी करून टाकायला हवी.
Decluttering3
अनेकदा घरामध्ये ठिकठिकाणी जुनी पुस्तके, मासिके, वर्तमान पत्रासोबत आलेले जाहिरातींचे हँड आउट्स, जुनी अनावश्यक बिले अशा वस्तू साठविल्या जात असतात. तसेच बाहेरून खाद्य पदार्थ मागविल्यानंतर त्यांच्या पॅकेजिंग साठी वापरण्यात आलेले प्लास्टिकचे डबे, पिशव्या इत्यादी वस्तूही आपल्या कळत नकळत घरामध्ये साठविल्या जात असतात. या वस्तूही वेळोवेळी घरातून कमी करणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरामध्ये आपल्याला आवश्यक नसलेल्या अनेक वस्तूंचा साठा असतो. कधीही न वापरलेली विद्युत उपकरणे, डबे, इत्यादी वस्तू इतर कोणाच्या कामी येणार असल्यास देऊन टाकाव्यात. अनेकदा आपण एखाद्या वस्तूसाठी भरपूर पैसे खर्च केलेले असल्याने ती वस्तू आपल्याला आवश्यक नसतानाही घरामध्ये साठवून ठेवली जाते. अशा वेळी त्या वस्तूची ज्यांना आवश्यकता असेल अशा मंडळींना ती वस्तू दिल्याने त्यांची मदत तर होईलच शिवाय नुसतीच वस्तू पडून राहण्यापेक्षा ती उपयोगातही आणली जाईल. अशा प्रकारे घरामधील अनावश्यक वस्तूंची योग्य प्रकारे वेळोवेळी विल्हेवाट लावल्यास आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी जागा आपोआप तयार होत असते, आणि त्याचबरोबर पसारा ही आटोक्यात राहतो.

Leave a Comment