प्रियंका चतुर्वेदी – काँग्रेसच्या गळतीत ताजी भर!

priyanka-chaturvedi
तब्बल 10 वर्षे काँग्रेसमध्ये काढल्यानंतर अखेर पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला आणि लगोलग शिवसेनेत प्रवेशही केला. हा राजीनामा देण्याआधी पक्षाने दिलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती.

उत्तर प्रदेशातील मथुरा हे प्रियंका चतुर्वेदी यांचे माहेरघर. तेथे काही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून या नेत्यांना पक्षातून काढण्यात आले होते, मात्र त्यांना परत घेण्यात आले. त्यामुळे चतुर्वेदी खट्टू झाल्या.

प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या सर्वात प्रखर प्रवक्त्यांपैकी एक होत्या. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया संकेतस्थळावर काँग्रेसचा बचाव करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या. त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्याही मिळाल्या होत्या, मात्र त्या मागे हटल्या नाहीत. परंतु स्वपक्षीयांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे मात्र त्या बिथरल्या. अशा प्रकारे काँग्रेसला जर गळती लागत असेल तर राहुल गांधी यांच्या दृष्टीने ती काळजीची गोष्ट ठरावी.

एकीकडे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी सार्वजनिक जीवनात प्रेम आणि सभ्यतेविषयी बोलतात. लोकसभेत अविश्वास ठरावावर भाषण केल्यानंतर राहुल यांनी स्वतः उठून जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलिंगन दिले. त्यांचे हे कृत्य प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या राजकारणाचे प्रतीक होते, असे सांगण्यात आले. मात्र त्यांचे अनुयायी त्यांच्या या मार्गावरून चालण्यास नाखुश असल्याचे दिसते. त्यातूनच हे घडले आहे.

खरे तर गेल्या एका वर्षात काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांची यादी खूप मोठी आहे. काश्मिरपासून केरळपर्यंत अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात आसरा घेतला आहे. यातील अनेक नेते तर कित्येक दशकांपासून पक्षात सक्रिय आहेत. मात्र नव्या नेतृत्वाकडून संधी मिळत नसल्यामुळे हे लोक नाराज होऊन जात असल्याचे सांगितले जाते. प्रियंका चतुर्वेदी यांनाही नैऋत्य मुंबईतून उमेदवारी हवी होती, परंतु पक्षाने ती दिली नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला, असे म्हटले जाते. तसे असले तरी चतुर्वेदी यांच्यासारख्या खंद्या प्रवक्त्याची समजूत घालून त्यांना थांबवणे हे पक्षाचे कर्तव्य होते. त्यात काँग्रेस नेतृत्व कमी पडले ही वस्तुस्थिती आहे.

नुसत्या महाराष्ट्रातच प्रियंकांच्या आधी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पक्षाला रामराम केला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. इकडे नगरमध्ये विखे पाटील यांचे चिरंजवी भाजपचे उमेदवार आहे तर खुद्द राधाकृष्ण विखे पाटील केव्हाही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आपण नाराज असल्याचे व्हायरल झालेल्या क्लिपमधून पक्ष नेतृत्वाला कळवले होते.

अशाच प्रकारे तेलंगाणात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आणि ज्येष्ठ नेते पी. सुधाकर रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाने तिकिट मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तब्बल पाच वेळेस मेघालयचे मुख्यमंत्री राहिलेले डोनवा देथवेल्सन लपांग यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ज्येष्ठ नेत्यांकडे पक्षात दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओडिशात माजी केंद्रीय मंत्री चंद्रशेखर साहू व ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विक्रम कुमार पांडा यांच्यासहित अनेक स्थानिक नेत्यांना पक्षाला टाटा केला आहे. पंजाबमधील वजनदार नेते असलेले माजी खासदार जगमीत बराड यांनी  शिरोमणि अकाली दलात प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये दलित चेहरा म्हणून पुढे आलेल्या आमदार अल्पेश ठाकोर यांच्यासह दोन आमदारांनी काँग्रेस सोडली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा मुस्लिम चेहरा मानल्या जाणाऱ्या फुरकान अली यांनी राजीनामा दिला आहे. बिहारमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते शकील अहमद यांनी पक्ष सोडला, तर केरळमध्ये माजी केंद्रीय मंत्री एस. कृष्णा कुमार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणार्‍या टॉम वडक्कन यांनी भाजपमध्ये प्रवेश करून धक्का दिला.

आसाम विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील एक वजनदार नेते असलेले हेमंत विश्व शर्मा यांनी अशा पद्धतीनेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. दोन दशके काँग्रेसमध्ये असलेले शर्मा हे तब्बल 15 वर्षे तरुण गोगोई यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.  त्यांनी 2015 काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पुढच्याच वर्षी काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपला पहिल्यांदाच तेथे स्थान मिळाले. केंद्रीय पातळीवर याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेस नेतृत्वाला डोळ्यात तेल घालून काळजी करावी लागणार आहे. त्यात प्रियंका यांच्यासारख्यांचे जाणे पक्षाला परवडणारे नाही.

Leave a Comment