अवयव चुकीच्या ठिकाणी असूनही तब्बल ९९ वर्षे जगली ही महिला !

organ
अमेरिकेतील ओरेगन राज्यामधील पोर्टलंडची निवासी असलेली रोझ मारी बेंटली ही महिला वयाच्या ९९व्या वर्षी मरण पावली. २०१७ साली ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये रोझ मारीचा मृत्यू झाला. तत्पूर्वी आपला देह पोर्टलंड विद्यापीठाच्या वैद्यकीय शास्त्र विभागाला दान करण्यात यावा अशी इच्छा रोझने व्यक्त केली असल्यामुळे तिच्या इच्छेनुसार तिच्या मुलांनी तिचा देह वैद्यकीय विभागाला दान केला. त्यानंतर अॅनॅटमीच्या विद्यार्थ्यांनी रोझच्या देहाचे शवविच्छेदन केले असता, त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
organ1
रोझच्या देहाचे शवविच्छेदन केले गेले असता, तिच्या शरीरातील अनेक अवयव चुकीच्या ठिकाणी असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला आले. मानवी शरीरामध्ये सामान्यतः प्रत्येक अवयवाची जागा निसर्गानेच ठरवून दिलेली असते. रोझच्या बाबतीत मात्र निसर्गाने चमत्कार घडवून आणला होता. सामान्यतः मानवी शरीरामध्ये लिव्हर, पॅनक्रिया हे अवयव डाव्या बाजूला झुकलेले असतात, तर रोझच्या शरीरामध्ये मात्र हे अवयव उलट्या बाजूला, म्हणजेच उजव्या बाजूला होते. या व्यतिरिक्त रोझचे अपेंडिक्सही विरुद्ध दिशेला असून, जेव्हा रोझ जिवंत असताना शस्त्रक्रियेद्वारे अपेंडिक्स काढले गेले होते, तेव्हा देखील वैद्यकीय तज्ञांनी अपेंडिक्स ‘चुकीच्या’ ठिकाणी असल्याची नोंद रोझच्या केस पेपर्समध्ये केलेली होती.
organ2
शरीरातील अवयव चुकीच्या ठिकाणी असणे हा एक दुर्मिळ विकार असून, याला ‘सायटस इंव्हर्सस’ म्हटले जाते. हा विकार अतिशय दुर्मिळ असून, पन्नास मिलियन व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या बाबतीत हा विकार आढळून येतो. हा विकार जन्मजात असूनही रोझ तब्बल ९९ वर्षे निरोगी आयुष्य कशी जगली या बद्दल वैद्यकीय तज्ञ मंडळींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ९९ वर्षांच्या आयुष्यामध्ये रोझला कोणताही मोठा आजार झाला नसून, तिला उतारवयामध्ये संधिवाताचा त्रास जाणवू लागला असल्याचे रोझच्या मुलांचे म्हणणे आहे. रोझच्या शरीरातील अवयव चुकीच्या ठिकाणी असल्याची कल्पना तिच्या मुलांनाच काय, तर खुद्द रोझला ही नसल्याचे समजते. आजवरच्या वैद्यकीय इतिहासामध्ये केवळ दोन इतर व्यक्तींमध्ये हा विकार आढळून आला असून, या व्यक्तींनीही आपल्या आयुष्याची सत्तरी पार केली असल्याचे तज्ञांनी सांगितले.

Leave a Comment