जॉर्डन देशामध्ये आता ठिकठिकाणी उघडल्या ‘अॅक्स रेज रूम्स’

axe
आपल्याला एखाद्या कारणामुळे संताप, किंवा मानसिक तणाव अनावर, असह्य झाला, की आपला सगळा राग त्याक्षणी आपल्या समोर असलेल्या वस्तूवर किंवा अनेकदा एखाद्या व्यक्तीवरही निघत असतो. रागाच्या भरामध्ये आपल्या हातून अनेकदा अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे काही काळाने आपला राग तर निवळतो, मनावरील तणावही कमी होतो, पण आपल्यावर क्वचित पस्तावण्याची वेळही येते. असे होऊ नये म्हणून राग आवरता घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांनाच जमते असे नाही. अशा मंडळींसाठी जॉर्डन देशामध्ये आणि त्याचबरोबर जगामध्ये इतरत्रही अनके ठिकाणी ‘अॅक्स रेज रूम्स’ची संकल्पना अस्तित्वात आणली गेली आहे.
axe1
जॉर्डन देशातील अम्मान या ठिकाणी ‘अंडरग्राउंड अॅक्स रेज रूम’ तयार करण्यात आली असून, या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या खोलीमध्ये ठेवेल्या गेलेल्या अनेक निरुपयोगी वस्तूंवर मोठ्या हातोड्यांनी किंवा कुऱ्हाडींनी वार करून आपल्या मनातील सर्व राग, तणाव या वस्तूंवर काढून, संपूर्णपणे तणावमुक्त होण्याची संधी ग्राहकांना दिली जाते. या ठिकाणी ग्राहकांना जुन्या निरुपयोगी वस्तूंच्या बरोबरच जुन्या काचेच्या वस्तू, प्लेट्स, ग्लासेस अशा वस्तूंची मनसोक्त मोडतोड करून आपल्या मनावरील तणाव कमी करण्याची संधी मिळते.
axe2
अनेकांसाठी हा अनुभव अगदीच नवा असून, काहीतरी नवे करून पाहण्याच्या उद्देशाने देखील लोक येथे येत असतात. आजकाल अशा प्रकारच्या ‘रेज रूम्स’ अनेक देशांमध्ये सुरु झाल्या आहेत. अम्मान येथे असलेल्या ‘रेज रूम’मध्ये जाण्यासाठी ग्राहकांना सतरा डॉलर्स इतकी रक्कम मोजावी लागत असून, ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी संरक्षक ‘सूट्स’, गॉगल्स आणि हेल्मेट घालणे ग्राहकांसाठी बंधनकारक असते. ही रेज रूम सुरु झाल्यापासून एका महिन्यामध्ये किमान दहा ग्राहक तरी आवर्जून येथे येत असल्याचे येथील व्यवस्थापकांचे म्हणणे आहे, तर येथे येऊन जुन्या वस्तूंची मनसोक्त मोडतोड केल्यानंतर मनातील नकारात्मक भावना, राग, मानसिक तणाव खचितच कमी होत असल्याचे येथे येत असणाऱ्या ग्राहकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment