मायावती व मुलायम – अस्तित्वासाठीचे ऐतिहासिक पाऊल!

combo
अखेर मायावती आणि मुलायमसिंह यादव हे दोन प्रतिस्पर्धी एका व्यासपीठावर आले. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेले मुलायमसिंह यादव यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या वरवंट्यापुढे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, हे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पूरेपूर माहीत आहे. त्यामुळेच परस्परांचे सर्व मतभेद विसरून हे दोन नेते शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले. अनेक निरीक्षकांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.

मुलायमसिंह यांच्या प्रचारार्थ मैनपुरी येथे झालेल्या सभेत मायावतींनी हजेरी लावली. यावेळी बोलताना मायावती यांनी मुलायमसिंह हे खरे अन्य मागासवर्गीय (ओबीसी) नेते असून मोदी हे खोटे ओबीसी नेते असल्याचे प्रशस्तीपत्रही देऊन टाकले. “मायावती यांचे हे उपकार आपण आयुष्यभर विसरणार नाही,” अशा शब्दांत मुलायम सिंग यांनी मायावती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना त्यांचा योग्य तो सन्मान राखण्याचे आवाहनही केले.

मुलायमसिंह आणि मायावती यांचे संबंध हे एखाद्या हिंदी चित्रपटातील मैत्रीचे-शत्रुत्वाचे आणि आता पुन्हा मैत्रीचे अशा प्रकारचे राहिले आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नीतीशकुमार हे दोन असेच नेते. त्यांच्यातही आधी मैत्री होती, मग वितुष्ट आले आणि मोदी-शहा जोडगोळीच्या विरोधात ते दोन नेते आपापला अहंकार बाजूला ठेवून एकत्र आले. त्यांच्या त्या मैत्रीच्या परिणामी बिहारमध्ये भाजपला जंग जंग पछाडूनही विजय मिळवता आला नाही. अगदी याचप्रमाणे समाजवादी पक्ष व बसप एकत्र येऊन भाजपला आसमान दाखवू शकतात, असा विचार उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर पुढे आला. त्यासाठी अखिलेश यादव यांनी पुढाकार घेतला आणि मायावतींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. गोरखपूर येथे लोकसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे अखिलेश यांचा हा डाव यशस्वी ठरल्याचेही दिसले. मात्र ती युती सार्थक ठरण्यासाठी गरज होती ती मुलायम आणि मायावती यांनी आपापला अहंकार बाजूला ठेवण्याची.

मुलायम हे धूर्त राजकारणी तर मायावती महत्त्वाकांक्षी. त्यांच्यातील वैयक्तिक हेवेदावे पराकोटीला पोचलेले. त्यामुळे ते जुनी कटुता विसरतील का आणि खरे सांगायचे म्हणजे राजकीय परिपक्वता दाखवतील का, हा महत्वाचा प्रश्‍न होता. मैनपुरीतील सभेने या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे. बिरबलाच्या कथेतील मांजराप्रमाणे, जेव्हा हौदातील पाणी नाकातोंडाशी येते तेव्हा प्रत्येकाची प्राथमिकता आपला जीव वाचवणे हेच असते. आज भाजपच्या विजयरथापुढे सर्वच पक्षांना आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. त्यासाठी ही हातमिळवणी झाली आहे आणि कोणी कितीही नाकारले तरी लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार हे निश्‍चित. वरकडी म्हणजे या दोन्ही पक्षांचा शेजारच्या बिहार व मध्य प्रदेशातही थोडा-फार प्रभाव आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

एक म्हणजे सप आणि बसप यांनी एकमेकांच्या उमेदवारांना एकमेकांची मते फिरवायची, हा स्पष्ट संदेश या घटनेतून गेला. शिवाय उत्तर प्रदेशात महाआघाडीला व्यापक मान्यता मिळण्याच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व आहे. तसेच या दोन पक्षांकडे केवळ आपला जातीगत मतदारवर्गच आहे, असे नव्हे राज्याच्या काना-कोपऱ्यात त्यांचे जाळे आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याने भाजपच्या कपाळावरील आठ्या वाढल्या असतील तर यात नवल नाही. या परिस्थितीत निवडणुकीत वापसी करण्यासाठी पक्षाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

फक्त भाजपच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट एकच आहे ती म्हणजे बिहारमध्ये भाजपला हरविण्यासाठी एकत्र आलेल्या नीतीश कुमार आणि लालूप्रसाद यांचे रस्ते लवकरच वेगळे झाले. त्यातील नीतीशकुमार तर आता थेट भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. तशीच फाटाफूट उद्या सप-बसपमध्ये होणार नाही कशावरून? आणखी एक गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडण्यासारखी आहे, ती म्हणजे स्वतंत्रपणे लढत असलेली काँग्रेस. मात्र काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचे बळ तसेच पक्ष संघटना नाही त्यामुळे तिच्याकडे फारशी ताकद नाही, असा या दोन पक्षांचा होरा आहे. त्यामुळे सप-बसपची मते ती खाईल, अशी शक्यता फारशी नाही.

परंतु ही झाली जर-तरची गोष्ट. आज भाजपच्या दृष्टीने सर्वात मोठा विषय आहे तो लोकसभा निवडणुकीचा. त्यात देशातील सर्वात मोठ्या राज्यातील दोन सर्वात मोठ्या पक्षांचे एक होणे आणि तेही केवळ भाजपला धूळ चारायची या एकमेव मुद्द्यावर, ही भाजपसाठी चिंतेची बाब खरी.

Leave a Comment