चीनमधील हे ‘स्टोन पिलर्स’ ठरले ‘अवतार’ चित्रपटातील दृश्यांसाठी प्रेरणा

avtar
काही वर्षांपूर्वी जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ या चित्रपटाने केवळ हॉलीवूडमधेच नाही, तर आंतरराष्ट्रीय चित्रसृष्टीमध्ये अपार लोकप्रियता मिळविली. परग्रहावरील सृष्टी या चित्रपटामध्ये दर्शविण्यात आली असून, पृथ्वीचा नाश करून आता परग्रहावर आधिपत्य स्थापित करू इच्छिणाऱ्या पृथ्वीवासियांपासून आपल्या ग्रहाचे संरक्षण करू पाहणारी आदिवासी जमात आणि आपल्या ग्रहाच्या संरक्षणार्थ पृथ्वीवासियांविरुद्ध दिलेला निकराचा लढा या चित्रपटामध्ये दर्शविण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये परग्रहावरील सृष्टी निर्माण करताना निरनिराळी झाडे, वृक्ष, निरनिराळे प्राणीही दर्शविण्यात आले असून अधांतरी तरंगत असल्याप्रमाणे भासणारे मोठमोठे पहाडही या चित्रपटामध्ये दर्शविण्यात आले आहेत.
avtar1
चित्रपटामध्ये दर्शविण्यात आलेल्या या पहाडांची कल्पना वास्तविक चीनमधील हुनान प्रांतातील अरण्यांमध्ये उभ्या असलेल्या पहाडांवरून घेण्यात आली आहे. हे पहाड क्वार्ट्झाइट सँडस्टोन या पाषाणाने बनले असून, हजारो वर्षांपासून होत असलेल्या भू-क्षरणामुळे या पहाडांना एखाद्या स्तंभांप्रमाणे रूप प्राप्त झाले आहे. हे पहाड झांगजीयाजी अभयारण्यामध्ये असून, हे एक अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दर वर्षी हजारो पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. याच पहाडांवरून प्रेरणा घेऊन जेम्स कॅमरून यांनी ‘अवतार’ या चित्रपटातील पहाड दर्शविले आहेत.
avtar3
‘अवतार’ चित्रपट अतिशय गाजल्यानंतर २०१० साली चीनमधील या पहाडांचे ‘अवतार हालेलुया माउंटन’ असे नामकरण करण्यात आले असून, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, हे पहाड पाहण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावू लागले आहेत. ‘झांगजीयाजी’ हे चीनमधील पहिले अभयारण्य असून, १९८२ साली या अरण्याला ‘अभयारण्य’ घोषित करण्यात आले होते. या अभयारण्यामध्ये एक हजार निरनिराळ्या दुर्मिळ वनस्पती असल्याचे समजते.

Leave a Comment