हिंदू दहशतवाद विरूद्ध धर्मयुद्ध!

sadhavi-pragya1
भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एक नवी ठिणगी टाकली आहे. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरे यांच्याबद्दल सुतक गेल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. “त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले,” असे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने साहजिकच नवीन वादाला तोंड फुटले आहे.

साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून भाजपची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांचे लक्ष्य कोण होते, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही सर्व जण राष्ट्रधर्मासाठी एकत्र येऊन लढू आणि हे धर्मयुद्ध आम्ही जिंकणारच, असा दावा साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे. जी मंडळी राष्ट्राविरुद्ध षडयंत्र रचत आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही लढू, असे सांगतानाच ‘धर्मयुद्ध’ सुरू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा यांचा मुकाबला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याशी आहे. काँग्रेसने सिंह यांना तीन आठवड्यांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. मात्र दिग्विजय सिंह हे दुर्बळ उमेदवार आहेत कारण ते धर्माच्या मार्गावरून चालत नाहीत, असा शेरा त्यांनी मारला. दिग्विजय सिंह यांनी भगवा रंग आणि हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी म्हणून आपला छळ कसा झाला, हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपण सांगू असे त्यांनी सांगितले. यावरून त्यांचा इरादा स्पष्ट होतो. त्यांचे ताजे वक्तव्य ही त्याचीच चुणूक आहे.

हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग वापरात आणला काँग्रेसने. संयुक्त लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात या शब्दाची जोरदार चर्चा होती. साध्वी प्रज्ञा आणि इंद्रेश कुमार यांना हिंदू दहशतवादाचे प्रतीक बनवण्यात आले. हा शब्द चर्चेच्या केंद्रस्थानी ज्यांनी आणला त्यांमध्ये दिग्विजय सिंग यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे एकप्रकारे हिंदू दहशतवाद या कल्पनेचे जनक आणि या संकल्पनेचे प्रतीक असा हा लढा असणार आहे. भोपाळमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून मतदान 12 मे रोजी आहे. तोपर्यंत ही जुगलबंदी रंगणार आहे.

लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार इत्यादी नेते भाजपच्या हिंदुत्ववादाचा चेहरा म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते. ही मंडळी आता बव्हंशी निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर आहे. त्यांची जागा नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि आता साध्वी प्रज्ञा यांनी घेतली आहे. अर्थात निवडणूक म्हटली की प्रत्येक पक्ष आपल्याला सोयीचे राजकारण आणि विचार पुढे आणणार हे स्वाभाविक आहे. कोणाला उमेदवारी द्यायची किंवा नाही, हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असतो. अंतिम निर्णय हा मतदारांचा असतो. त्यामुळे भाजपने साध्वींची निवड केली त्यावर फारसा आक्षेप घेता येत नाही.

साध्वी प्रज्ञा यांची मुख्य ओळख आहे ती मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी म्हणून. त्या सध्या जामीनावर बाहेर आहेत. मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी स्फोट झाला होता. त्यात सहा जण ठार झाले व सुमारे 100 जण जखमी झाले होते. त्या घटनेनंतर ऑक्टोबरमध्ये सर्वप्रथम अटक झाली होती ती प्रज्ञा यांनाच. साध्वी प्रज्ञा यांच्या रूपाने नवा चेहेरा भाजपने मैदानात उतरवला असून एक मोठी जोखीम घेतली आहे. साध्वी प्रज्ञा उर्फ प्रज्ञासिंह ठाकुर यांना भाजपने उमेदवारी देण्यापूर्वी खूप खल केला. त्यामुळे हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, यात शंका नाही.

प्रज्ञासिंह या गुन्हेगार नसून काँग्रेसच्या ‘यूपीए’ सरकारने रचलेल्या कटाच्या त्या बळी आहेत, हे दाखवण्याची एक संधी यानिमित्ताने भाजपने घेतली आहे. इतकेच नाही तर त्यांचा विजय झाला तर ते हिंदू दहशतवादाला लोकांनी नाकारल्याचे निर्विवाद लक्षण म्हणून दाखवण्यात येईल. काँग्रेसचे राजकारण हे मुस्लिमांच्या मतपेढीचे व अनुनयाचे आहे, असा भाजपचा आक्षेप असून प्रज्ञासिंह त्या राजकारणाला थेट आव्हान देतील, असा पक्षाचा होरा आहे.

दुसरीकडे “मालेगावात मशिदीबाहेर स्फोट वापरलेले दुचाकी वाहन प्रज्ञा यांचेच होते, स्फोटाआधीही भोपाळमध्ये कट रचण्यासाठी झालेल्या बैठकीत त्या सहभागी झाल्या होत्या,” असे आरोप महाराष्ट्राच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने न्यायालयात केले होते. त्यांच्यावर अजूनही बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंदलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याचे मत मुंबईच्या विशेष न्यायालयाने गेल्या वर्षीच व्यक्त केले होते. त्यांची ही पार्श्वभूमी पुढे आणून आपला दावा योग्य असल्याचे काँग्रेसला सांगावे लागेल.

भोपाळमध्ये भाजप 1989 विजय मिळवत आहे. त्यामुळे प्रज्ञासिंह यांचा विजय तसा सोपा मानला पाहिजे. मात्र या निमित्ताने हिंदू दहशतवाद विरूद्ध धर्मयुद्ध या दोन संकल्पनांचा सामना रंगणार एवढे नक्की!

Leave a Comment