‘लाव रे व्हिडिओ’च्या माध्यमातून राज ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

bjp
भाजपची पोलखोल करणारे व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून दाखवल्यानंतर भाजपनेही आता मनसेवर ट्विटरवरुन पलटवार केला आहे. मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसंदर्भात प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे व्हिडिओ भाजपने ट्विट केले आहे. भाजपने काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरे का, असे म्हणत मनसेला थेट आवाहन दिले आहे.

राज्यातील राजकीय वातावरण मागील आठवड्याभरापासून ढवळून काढणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा ठरत आहे. राज यांनी पुराव्यांसकट केलेले ‘स्मार्ट’ भाषण लोकांना आकर्षित करत आहे. हे व्हिडिओ सभांमध्ये मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. भाजपनेही आता यावरुन मनसेवर पलटवार केला आहे.


गुरुवारी रात्री पहिला व्हिडिओ भाजपने ट्विट केला. मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर डोंबिवलीत फेरीवाल्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भातील बातमी भाजपने ट्विट केली आहे. फेरीवाल्यांकडून डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक मंदार हळबे हे हप्ते घेतात, असा आरोप फेरीवाला संघटनांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. भाजपने हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे की, आमच्याकडे देखील काही व्हिडीओ आहेत बरे का …! फेरीवाल्यांकडून मनसे नगरसेवक घेतो हप्ते #लावरेव्हिडीओ


शुक्रवारी दुपारी भाजपने आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात मनसेची पदाधिकारी साडी चोरतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. साडी चोरताना मनसे कार्यकर्ते #लावरेव्हिडिओ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment