काँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुकेश अंबानी मैदानात

mukesh-ambani
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक उमेदवार आपण केलेल्या कामांचा किंवा भविष्यातील योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवत असून काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट मुंबईमधील महत्वाच्या लढतीपैकी एक असणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात लढत होणार आहे. ही लढत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा विरुद्ध सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यामध्ये होणार असून एकमेकांविरुद्धात दोन्ही उमेदवारांनी दंड थोटपले आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी देवरा यांच्या प्रचारासाठी चक्क मैदानात उतरले आहेत. मुकेश अंबानी देवरा यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडीओमध्ये देवरांची स्तृती करताना दिसत आहेत. मिलिंदच दक्षिण मुंबईसाठी सर्वोत्तम असल्याचे मत अंबानी यांनी या व्हिडीओत मांडले आहे.

दक्षिण मुंबई म्हणजे व्यवसाय असे समिकरणच असल्याचे मिलिंद देवरा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपल्याला उद्योग व्यवसाय आणण्याची गरज असून तरुणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे देवरा यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दक्षिण मुंबईतील छोटी पानाची टपरी चालवणाऱ्यांपासून ते मुकेश अंबानींसारख्या अब्जाधीशांचे मालक असणाऱ्यांपर्यंत लहान-मोठ्या सर्वच उद्योजकांचा या व्हिडीओमध्ये समावेश करण्यात आला आहे.


दक्षिण मुंबईमधील सहा वेगवेगळ्या उद्योजकांनी व्हिडीओमध्ये आपली मते मांडली आहेत. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, कोटक ग्रुपचे उदय कोटक, लघुउद्योजक क्रिश रामणानी, किराणामालाचे दुकान चालवणाऱ्या सुषमा ताई, दुध डेअरीचे मालक फारकुद्दीन चित्तलवाला, पानाची टपरी चालवणारा राजू अशा लोकांनी यामध्ये मते मांडली आहेत. मुकेश अंबानी यांनी या व्हिडीओमध्ये बोलताना, १० वर्ष मिलिंदने दक्षिण मुंबईचे नेतृत्व केले आहे. दक्षिण मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिकचे मिलिंदला सखोल ज्ञान असल्याचे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना मुंबईची भरभराट मुंबईमधील छोट्या तसेच मोठ्या उद्योगांनी झाली असल्याने अधिक तरुण लोकांना आपण येथे नोकऱ्यांची संधी देण्याची गरज असल्याचे अनिल अबांनी म्हणाले आहेत.

Leave a Comment