पाकिस्तानातील अल्पसंख्यकांचा वाली कोण?

minority
पाकिस्तानातील तथाकथित स्वायत्त मानवाधिकार संघटनेने त्या देशातील हिंदू व ख्रिस्ती मुलींच्या बळजबरी धर्मांतर आणि विवाहावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे गेले काही दिवस सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांच्या वर्तुळात चर्चेत असलेला एक विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या एका वर्षात एकट्या सिंध प्रांतात अशा प्रकारच्या 1000 घटना समोर आल्या आहेत, अशी माहिती या आयोगानेच दिली आहे. त्यामुळे या समस्येची गंभीरता समजून यायला हरकत नाही.

पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने (एचआरसीपी) आपला वार्षिक अहवाल सादर केला आहे. हा अहवाल 335 पानांचा असून ‘2018 मधील मानवाधिकाराची स्थिती’ असे त्याचे शीर्षक आहे. उमरकोट, थरपारकर, मीरपुरखास, बदीन, कराची, टंडो अल्लाहयार, कश्मोर आणि घोटकी या शहरांमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडल्याचे यात नमूद केले आहे. तसेच पाकिस्तान सरकारने असे बळजबरी विवाह थांबविण्यासाठी क्वचितच प्रयत्न केल्याचा स्पष्ट ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. तसेच हे प्रकार थांबविण्यासाठी संसद सदस्यांनी प्रभावी कायदा बनवावा, अशी शिफारसही केली आहे. सिंध प्रांतातील एक हजार घटनांचा उल्लेख करतानाच पाकिस्तानातील जबरदस्ती धर्मांतर आणि बळजबरी विवाहाची अधिकृत आकडेवारी नसल्याचेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

हा अहवाल येण्याच्या एक आठवडा आधीच रवीना आणि रीना या मुलींच्या धर्मांतराचे प्रकरण गाजले. यातील रवीना ही 13 वर्षांची तर रीना ही 15 वर्षांची मुलगी आहे. होळीच्या सणाच्या आदल्या दिवशी या दोन्ही अल्पवयीन मुलींचे सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्याचा तसेच बळजबरी त्यांचा विवाह लावण्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण इस्लामाबाद उच्च न्यायालयापर्यंत पोचले होते. मात्र न्यायालयाने त्यांचा विवाह वैध ठरविला आणि त्यांना त्यांच्या ‘पतीं’सोबत राहण्याची मुभा दिली.

ही तर केवळ एक झलक झाली. पाकिस्तान सरकारने एक ईश्वर निंदाविरोधी कायदा केला आहे. या कायद्यामुळे कट्टरवादी धर्मगुरू व दहशतवाद्यांच्या हातात एक कोलितच मिळाले असून त्याचा वापर अल्पसंख्याकांच्या विरोधात करण्यात येतो. या कायद्याचा आधार घेऊन गरीब व निरुपद्रवी हिंदू, ख्रिश्चन नागरिकांना फाशी देण्यात येत आहे. कुराणाचा अनादर केला या तथाकथित खोटय़ा आरोपावरून फैसलाबादमधील पाच चर्च, २५ ख्रिश्चन कुटुंबे, तीन शाळा, हॉस्पिटलला मुस्लिम गुंडांनी आग लावून नेस्तनाबूत केले.खंडणीसाठी हिंदूंचे अपहरण करणे आणि मागितलेली रक्कम मिळाली नाही तर अपहृत व्यक्तीची हत्या करायची ही तर नित्याची बाब झाली आहे.

भारताची फाळणी होण्याआधी एक दिवस म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली. रक्ताचे पाट वाहिले आणि जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश जन्माला आला. तेव्हापासून पाकिस्तानात गैर-इस्लामी जनतेचा उपहास, हेटाळणी आणि कत्तल सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे. इतकेच नव्हे तर अहमदियासारख्या समुदायालाही गैर-इस्लामी ठरवून त्यांच्यावरही अतोनात अत्याचार करण्यात येत आहेत.

पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा देशात हिंदू-शीख समाजाची लोकसंख्या 22 टक्के होती तर 12 ख्रिस्ती जनता होती. आज हे हे प्रमाण 1.7 टक्के एवढे खाली आले आहे. पाकिस्तानातील पोलिस व न्यायालय या यंत्रणाही अत्याचाऱ्यांचीच साथ देतात. त्यामुळे तुम्हाला संरक्षण देतो असे सांगत हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. आजच्या घडीला कराचीमध्ये केवळ 60 ते 70 हजार हिंदू उरले आहेत. पाकिस्तानची लोकसंख्या 13 कोटी आहे मात्र त्यात हिंदूंची संख्या जेमतेम 30 लाखच आहे.

ख्रिस्ती समुदायाची स्थितीही काही वेगळी नाही. आसिया बिबी हिचे प्रकरण तर अलीकडेच गाजले. मोहम्मद पैगंबर यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली आसिया बिबी यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसिया बिबी यांनी 2015 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने मंजूर करून त्यांची शिक्षा निर्दोष रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात कट्टरवादी संघटनांनी निदर्शने केली आहेत. त्यावरून तीन दिवस देशांत अशांतता होती. आसिया बिबीचा खटला न्यायालयात लढणारे वकील सैफुल मुलूक यांनी जीवाला धोका असल्यामुळे देशातून पलायन केले होते. त्यामुळे आसिया बिबीचे पती आशिक मसीह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली होती. पाकिस्तानात आमच्या जीवाला धोका आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्ता हाती घेतल्यावर अल्पसंख्यकांचे रक्षण करण्याच्या मोठमोठ्या बाता केल्या होत्या. इतकेच नव्हे तर भारताने आमच्याकडून शिकावे, असा शहाजोग सल्लाही दिला होता. मात्र आता त्यांच्याच मानवाधिकार आयोगाने त्यांचा मुखभंग केला आहे. तरीही पाकिस्तानातील अल्पसंख्यकांचा वाली कोण,हा प्रश्न अजूनही सुटण्याच्या प्रतीक्षेत आहे.

Leave a Comment