वाचाळवीरांवर अंकुश उत्तम, पण…

leader
देशातील तीन महत्त्वाच्या पक्षांच्या चार प्रमुख नेत्यांना काही काळापुरते का होईना, पण प्रचारबंदी करून निवडणूक आयोगाने एक उत्तम पाऊल टाकले आहे. मात्र या कारवाईनंतरही नेत्यांचे बरळणे काही थांबत नाही. त्यामुळे ही कारवाई कितपत फायदेशीर ठरते, हा एक प्रश्नच आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मनेका गांधी व योगी आदित्यनाथ, बहुजन समाज पक्षाच्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे आझम खान यांना 48 ते 72 तास भाषण करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. आपल्या बेताल विधानांमुळे या नेत्यांनी ही वेळ ओढवून घेतली आहे. यातील योगी आदित्यनाथ व खान यांच्यावर 72 तासांची तर मायावती आणि मनेका गांधी यांच्यावर 48 तासांची भाषण बंदी घालण्यात आली आहे. मनेका गांधी यांच्या रूपाने पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर देशव्यापी प्रचार अभियानात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर आझम खान यांना प्रचारात भाग घेण्यास मनाई करण्याची ही दुसरी वेळ आहे.

आयोगाने सोमवारी या संदर्भातील आदेश जारी केला. अर्थात त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची कान उघाडणी करून प्रचाराच्या काळात जीभ मोकळी सोडणाऱ्या नेत्यांवर अंकुश लावण्यास सांगितले होते. त्यानंतर घटनेतील कलम 324 अंतर्तग मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आयोगाने ही कारवाई केली. यापूर्वी एप्रिल 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या काळातच आयोगाने भाजप नेते (सध्या केंद्रीय मंत्री) गिरिराज सिंह यांना झारखंड आणि बिहारमध्ये प्रचार करण्यास मनाई केली होती. तसेच भाजपाध्यक्ष अमित शाह आणि आझम खान यांना उत्तर प्रदेशात प्रचार करण्यास बंदी घातली होती.

अर्थात या कारवाईचा कितपत उपयोग होतो,हे संदिग्धच आहे. कारण हे नेते कुत्र्याच्या शेपटीसारखे असतात. त्यांच्याकडून सुधारण्याची आशा करणे व्यर्थ आहे. बेताल विधानांमुळे ही मंडळी कायम विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होतात. किंबहुना त्यातच त्यांना आनंद वाटतो की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. अन्यथा या लोकांनी वारंवार हे उद्योग केले नसते.

उदाहरणार्थ आझम खान यांना घ्या. उत्तर प्रदेशात तर त्यांची हाडे नसलेली जीभ चालतेच परंतु इतरत्रही ती अनाठायी चालते. मध्य प्रदेशात आले असताना सोमवारी त्यांनी हाच उद्योग केला. यावेळी त्यांनी चक्क पत्रकारांसाठीच खालची भाषा वापरली.राज्यसभेचे माजी खासदार मुनव्वर सलीम यांच्या अंतिम संस्कारात भाग घेणासाठी खान हे विदिशाला आले होते. यावेळी अनेक पत्रकारही अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी भाजप नेत्या आणि रामपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार यांच्याबद्दल खान यांना प्रश्न विचारला. याच जयाप्रदा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे खान यांच्यावर कारवाई झाली आहे. या प्रश्नावर खान कमालीचे संतप्त झाले. पत्रकारांना उत्तर देण्याऐवजी ते एकदम भडकले. “तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून येथे आलो होतो,” असे ते म्हणाले. यामुळे सगळे पत्रकार अवाकच झाले.

सर्वच पक्षांकडे अशा वाचाळ नेत्यांची फौज आहे. भाजपकडे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा, आमदार संगीत सोम आणि साक्षी महाराज ही काही नावे आहेत. त्यांना तर बोलताना तारतम्य बाळगा, स्वत:च्या तोंडाला आवर घाला, अशी तंबीच अमित शहा यांनी मागे दिली होती. मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद,कपिल सिब्बल आणि दिग्विजय सिंह ही काँग्रेसची मंडळीही त्यातलीच. शिवेसेनेकडून संजय राऊत एकटेच सर्वांना पुरतात.

त्यांचे सोडा, आयोगाच्या ताज्या कारवाईची बातमी जुनी व्हायच्या आत आणखी एका नेत्याने तोंडाचा पट्टा चालवला.उत्त.र प्रदेशातील बसपचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आपले प्रतिस्पर्धी राज बब्बलर यांच्यावर पातळी सोडून टीका केली.फतेहपूर सिकरी येथील प्रचारादरम्यान गुड्डू पंडित यांनी राज बब्बसर आणि त्यांाच्या समर्थकांना एकप्रकारे धमकी दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओही गाजत आहे.

थोडक्यात म्हणजे निवडणूक आयोगाने आपली सुस्ती झटकून अशा नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पाऊल सरसावले आहे, ही कौतुकाचीच गोष्ट आहे. परंतु त्यातून ही मंडळी सुधारतील अशी आशा करण्यात फारसा अर्थ नाही. निवडणूक ही या नेत्यांसाठी एक युद्ध आहे आणि युद्धात नैतिकता पाळण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे निवडणूक संपेपर्यंत अशा प्रकारच्या बत्तीशी वाजविण्याच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment