भरकटलेली मनसे आणि ‘शहा’णी शिवसेना!

combo
यश माणसाला केवळ अंधश्रद्ध बनवते, मात्र अपयश माणसाला नवे काही शिकवते, असे एक प्रसिद्ध वचन आहे. याची प्रचिती सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाहून येते. पदार्पणातच भरदार राजकीय यश मिळालेल्या मनसेत आपसूक सुस्ती आली आणि त्यानंतर पक्षकार्य थांबले. केवळ शिवसेनेला विरोध एवढ्यापुरती मनसेची भूमिका मर्यादित झाली आणि प्रत्यक्ष कामाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम म्हणून लोकसभा, विधानसभा व स्थानिक संस्था अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांत मनसेला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यातून पक्षाला सावरण्यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली असून आता ते प्रचाराला निघाले आहेत. मात्र आजही मनसेचा गोंधळ दूर झालेला दिसत नाही. त्या तुलनेत मनसेची प्रतिस्पर्धी शिवसेना चतुराईने आपली पावले टाकताना दिसत आहे.

मनसेच्या स्थापनेला आता 12 वर्षे होऊन गेली आहेत. माध्यमांतून आजपर्यंत त्यांना आधार मिळत आहे. वादग्रस्त विधाने करून मीडियाच्या केंद्रस्थानी राहण्याची कला राज यांना साधली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वैयक्तिक करिष्मा आणि मीडियाकडून मिळणारी मदत यांच्या जोरावर पक्षाने आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्याच्या जोडीला तरुणांचीही त्यांना साथ मिळाली. एरवी अन्य एखादा पक्ष या वावटळीत कुठल्या कुठे उडून गेला असता.

गेल्या 13 वर्षांतील मनसेची कारकिर्द एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. स्थापनेनंतर दोन वर्षांच्या झालेल्या पहिल्याच निवडणुकीत या पक्षाने अत्यंत घवघवीत यश मिळविले. सुरुवातीची काही वर्षे या यशाचा आलेख चढता राहिला. मात्र राज ठाकरे यांच्याशिवाय पक्षाकडे सांगण्यासारखे काहीही नव्हते. पक्षातील नेत्यांची दुसरी फळी उभीच राहिली नाही. आपल्या पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणी प्रयत्नही केले नाहीत. एकीकडे पक्ष गावागावांत वाढत होता, तर दुसरीकडे पक्षाला स्वतःचा काही कार्यक्रमच नव्हता.

दुसऱ्या फळीतील नेते निकामी ठरल्याने मनसेची पक्ष म्हणून बांधणी झालीच नाही. केवळ राज ठाकरेंचा जयजयकार केला की काम झाले, असे कार्यकर्त्यांना वाटू लागले. खूशमस्कर्यां ची फौज राज यांच्या भोवती गोळा झाली. शिवाय या ना त्या कारणाने त्यांचे अनेक जवळचे सहकारी त्यांना सोडून गेले. शिवसेनेने त्यांचे सहा नगरसेवक फोडून तर षटकारच मारला. वर टोलविरोधी आंदोलनानंतर स्वतः राज ठाकरे यांच्या वर्तनात धरसोडपणा दिसू लागला. त्यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल अविश्वापसाची भावना निर्माण झाली आणि त्यांचे जवळचे सहकारी त्यांना सोडून जाऊ लागले. यापैकी अनेक जण तऴागाळातील कार्यकर्ते होते, मतदारांशी त्यांची नाळ जुळलेली होते. उदाहरणार्थ राम कदम. त्यामुळे आजच्या घडीला एक भाषणबाज नेत्याचा पक्ष अशी मनसेची अवस्था झाली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मते मागण्याची वेळ मनसे नेतृत्वावर आली आहे.

आता मनसेने लोकसभा निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वतः राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात प्रचार करत आहेत. राज्यात ते आठ ते नऊ प्रचारसभा घेणार आहेत. महाआघाडीच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन राज ठाकरे मोदीविरोधी प्रचार करणार आहेत. यापैकी नांदेडची सभा अगोदरच झाली आहे. त्याचबरोबर सोलापूर, बारामती इत्यादी मतदारसंघांत ते प्रचारसभा घेतील.

दुसरीकडे आहे शिवसेना! भाजपच्या आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर लोकसभेत भरघोस यश मिळाल्यानंतर शिवसेनेचा विधानसभेच्या वेळेस काडीमोड झाला. भाजपच्या झंझावातापुढे पड न खाता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा गड राखला. विधानसभेत बर्याभपैकी यश मिळवले. राजकीय मजबुरीतून सत्तेत सामील झाले तरी त्यांनी सरकारशी जुळवून घेतले नाही – सत्तेतील विरोधी पक्ष म्हणूनच त्यांनी काम केले. मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुका भाजपच्या विरोधात लढून त्यांनी त्या कशाबशा राखल्या. आज तेच उद्धव ठाकरे मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. ज्यांना अफझाल खान म्हटले त्या नरेंद्र मोदी व अमित शहांसाठी मते मागतात. मोठा भाऊ का छोटा भाऊ म्हणून वाद घातलेल्या भाजपच्या नरेंद्र मोदींनी छोटे भाई म्हटले तरी चालवून घेतात. याला राजकीय ‘शहा’णपणा म्हणतात. जेव्हा आपला हात दगडाखाली असतो तेव्हा थोडासा कमीपणा घेतला तरी हरकत नाही, याचे भान उद्धवनी ठेवले.

आपल्या स्थापनेनंतर दहा वर्षे राज यांनी शिवसेनेच्या नाकी नऊ आणले. परंतु आज शिवसेना मनसेची दखल घ्यायलाही तयार नाही. हे घडले ते उद्धव ठाकरेंची चिकाटी आणि राज ठाकरेंच्या सुस्तीमुळे. किमान विधानसभेच्या वेळेस तरी राज ठाकरेंवर ही वेळ येऊ नये, म्हणजे बस!

Leave a Comment