ममतांची भाजपशी एकहाती लढत फळणार?

mamta-banerjee
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता सर्व पक्ष आपला पूर्ण जोर लावून उरलेल्या टप्प्यांतील प्रचारात मग्न आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात जी धुमश्चक्री पाहायला मिळत आहे, तशी अन्यत्र क्वचितच पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या संक्रमणाची अवस्था सुरू असून आता जो पक्ष प्रबळ ठरेल तो भविष्यातही वर्चस्व गाजविणार आहे.

बंगालच्या राजकारणातून डावे पक्ष आता दिसेनासे झाले आहेत किंवा होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष हिरीरीने पुढे आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकांतून ही गोष्ट दिसून आली आहे. तेथे भाजपने चंचुप्रवेश केला आहे, मात्र ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व अगदी अलीकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिसून आले आहे. आणि झुंजार राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅनर्जी आपले राज्य सहजासहजी सोडणाऱ्यांपैकी नाहीत.

राज्यात लोकसभेच्या महाराष्ट्राखालोखाल 42 जागा आहेत. यंदा राज्यात भाजपची थेट लढत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांनी मोदी हटाओची घोषणा दिली आहे, तर भाजपने त्यांच्या कुशासन आणि भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेतून बाहेर खेचले पाहिजे आणि त्यांचे तोंड सर्जिकल चिकटपट्टीने बंद केले पाहिजे, अशी जळजळीत टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भाजप हटाव देश बचाव ही मोहीमही त्यांनी सुरू केली होती तसेच नोटबंदीनंतरही त्यांनी केंद्राच्या विरोधात आघाडी उघडली होती.

पश्चिम बंगालमध्ये एकमेकांशी सामना करणाऱ्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी), नागरिकता (सुधारणा) विधेयक आणि घुसखोरी हे प्रमुख मुद्दे आहेत. रोजगार निर्मिती, अल्पसंख्यकांचे लांगुलचालन, भ्रष्टाचार, केंद्रातील पुढील सरकार बनविण्यात तृणमूल काँग्रेसची भूमिका, बालाकोटमधील हवाई कारवाई हे विषयही प्रमुख मुद्यांर च्या स्वरूपात पुढे आले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा सत्तेत आल्यास देशभरात एनआरसी आणि नागरिकता विधेयक लागू करण्याचे वारंवार आश्वासन देत आहेत. एनआरसी संपूर्ण देशात लागू करून हिंदू, शीख व बौद्ध वगळता सर्व घुसखोरांना हाकलण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे. अमित शाह यांनी गुरुवारी राज्यात प्रचार करताना घुसखोरीचा हाच मुद्दा पुन्हा मांडला. बांगलादेशातून येणारे बेकायदेशीर नागरिक हे वाळवी असल्याचे त्यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही मुद्द्यांना निकराने विरोध केला आहे. अनेक दशकांपासून आसाममध्ये राहणाऱ्या सुमारे 40 लाख लोकांची नावे अंतिम मसुद्यातून गहाळ झाली, तेव्हा एनआरसीचा मुद्दा सर्वप्रथम राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला. एनआरसीमुळे मुळात भारतीय नागरिकच आपल्या देशात शरणार्थी होतील, हा बॅनर्जी यांच्या प्रचाराचा प्रमुख दावा आहे. त्यांच्या या प्रचाराला अलीकडे आणखी धार आली आहे. एनआरसी, नागरिकता (सुधारणा) विधेयक आणि घुसखोरीचे हे मुद्दे राज्यातील तळागाळातही प्रभावी ठरत आहेत. भारत-बांगलादेशाला लागून असलेल्या सीमेजवळील राजगंज, कूचबिहार, बालुरघाट, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, ब्रह्मपूर, मुर्शिदाबाद, जलपायगुडी, जयनगर, बशीरहाट, बनगांव अशा मतदारसंघात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे मतदार तृणमूल काँग्रेसचे हक्काचे मतदार मानले जातात आणि एनआरसीच्या नावावर भाजप मुस्लिमांना निशाणा बनवत आहे, हे ममता बॅनर्जी त्यांच्या मनावर ठसवत आहेत.

दुसरीकडे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे, की पक्ष सत्तेत आला तर अवैध मदरशांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यात येतील आणि राज्यात अल्पसंख्यकांचा अनुनय करण्यात येणार नाही. भाजपने सारदा आणि रोज व्हॅली चिटफंड गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचारालाही निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवला आहे.

दुसरीकडे राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यांचा भर रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा मुद्दयांवर आहे. तरीही ममता बॅनर्जी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हेलिकॉप्टर उतरवण्यास सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे राहुल यांची सिलिगुडी येथे प्रस्तावित सभा रद्द करण्यात आलीत.

म्हणजेच भाजपशी लढताना ममता यांना कोणीही भागीदार नको आहे. आपण एकहाती भाजपशी टक्कर देऊ, किंबहुना भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व आपण करू हा आत्मविश्वास त्यांना आहे. त्यांचा हा आत्मविश्वास कितपत फळतो, ते बघायचे!

Leave a Comment