ब्रिटीश राजघराण्याचा राजकुमार प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन २०११ साली भव्य शाही सोहोळ्यामध्ये विवाहबद्ध झाले. विवाहानिमित्त राणी एलिझाबेथ हीने प्रिन्स विलियम आणि त्याच्या पत्नीला ‘अन्मर हॉल’ ही भव्य वास्तू भेट म्हणून दिली. त्यानंतर काही काळ विलियम आणि केट यांचे वास्तव्य अन्मर हॉल येथे असले, तरी आता राजनैतिक जबाबदाऱ्या वाढल्याने व त्यांच्या अपत्यांचे शालेय शिक्षण सुरु झाले असल्याने विलियम आणि केट यांनी त्यांचा मुक्काम लंडन मध्ये कायमस्वरूपी हलविला असून, केन्सिंग्टन पॅलेस हे त्यांचे औपचारिक निवासस्थान आहे. मात्र अजूनही सुट्टीच्या दिवसांमध्ये विलियम आणि केट त्यांच्या अपत्यांसह अन्मर हॉल येथे जाणे पसंत करतात. हे आता त्यांचे आवडते ‘हॉलिडे होम’ बनले आहे.
ही भव्य वास्तू, राणी एलिझाबेथची खासगी मालमत्ता असलेल्या नॉरफोक येथील ‘सँड्रींगहॅम इस्टेट’चा भाग आहे. जॉर्जियन धाटणीनुसार बनविली गेलेली ही भव्य वास्तू १८०२ साली बांधविली गेली. या वास्तूमध्ये इतर कक्षांच्या जोडीने दहा शयनकक्ष असून, या ठिकाणी एक टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूलही आहे. एके काळी विलियमचे वडील प्रिन्स चार्ल्स यांचे जवळचे मित्र ह्यु वॅन कस्तेम यांचे येथे काही वर्षांसाठी वास्तव्य असल्याने लहान असताना प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी त्यांच्या वडिलांसमवेत अनेकदा अन्मर हॉल येथे येत असत. आता ह्यु वॅन कस्तम आणि त्यांचे वंशज येथे राहत नसले, तरी आजही प्रिन्स विलियमचे या परिवाराशी उत्तम संबंध आहेत.
राणी एलिझाबेथने अन्मर हॉल विलियम आणि केट यांना विवाहानिमित्त भेट दिल्यानंतर या दाम्पत्याच्या गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या वास्तूच्या आत तसेच बाहेरच्या परिसराचे देखील नूतनीकरण करण्यात येऊन यासाठी दोन मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले. नूतनीकरण झाल्यानंतर आता ही वास्तू सर्व अद्ययावत सुविधांनी आणि आधुनिक धाटणीच्या सजावटीने परिपूर्ण बनली आहे.