विवाहापश्चात असे बदलले मेघन मार्कलने प्रिन्स हॅरीचे जीवन

meghan-markel
विवाहानंतर एकमेकांच्या सहवासात राहताना पती-पत्नी नकळत एकमेकांच्या किती तरी सवयी आत्मसात करीत असतात, तसेच आपल्या जोडीदाराला न भावणाऱ्या काही सवयी सोडून देण्याचा प्रयत्नही मनापासून करीत असतात. असेच काहीसे सध्या ब्रिटनच्या नवपरिणीत शाही दाम्पत्याच्या बाबतीत घडत आहे. ब्रिटीश शाही घराण्याचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झाले असून, मेघनच्या सहवासामध्ये हॅरीची संपूर्ण जीवनशैलीच बदलून गेली असल्याचे म्हटले जात आहे. या बाबतीत निरनिराळ्या प्रतिक्रिया पहावयास मिळत असून, हॅरीमध्ये घडून आलेल्या या नव्या बदलांचे काहींनी कौतुक केले आहे, तर काहीच्या मते हॅरीने आपल्या सवयींमध्ये केलेले हे बदल अनावश्यक आहेत.
meghan-markel1
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलला आता लवकरच अपत्य होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हॅरीने आपल्या जीवनशैलीमध्ये काही परिवर्तन करावयास हवे असे मेघनला वाटत असल्याने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हॅरीने मेघनचा सल्ला पूर्णपणे स्वीकारल्याचे दिसत आहे. मेघनच्या अनुसार हॅरीला काही अपायकारक सवयी असून, तिच्या आग्रहाखातर हॅरीने या सवयी सोडल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर ब्रिटनमध्ये दर वर्षी होणाऱ्या ‘अॅन्युअल बॉक्सिंग डे फेसंट शूट’चे देता येईल. या दिवशी शाही परिवाराचे सदस्य पक्ष्यांच्या शिकारीमध्ये सहभागी होत असतात. प्रिन्स हॅरी गेली वीस वर्षे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे, पण यंदाच्या वर्षी मात्र हॅरी या कार्यक्रमाला अनुपस्थित होता. मेघन ही प्राणीप्रेमी असून, प्राण्यांना अपाय होईल, किंवा प्राण्या-पक्ष्यांची शिकार, अशा कोणत्याही कार्यक्रमामध्ये हॅरीने सहभागी होऊ नये अशी तिची इच्छा असल्याने हॅरीने देखील यापुढे अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी न होणाचे ठरविले आहे.
meghan-markel2
मेघनने संतुलित आणि आरोग्याला पूरक आहाराचे महत्व हॅरीला पटवून दिले असून, आता हॅरीने देखील मेघन प्रमाणेच ‘जंक फूड’चा त्याग करून शाकाहारावर भर देत ताज्या भाज्या, फळे आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर समाविष्ट केली आहेत. त्याचसोबत कॅफीन युक्त सर्व पेयांचा हॅरीने त्याग केला असून, आता कोणत्याही प्रसंगी इतर कोणत्याही पेयाच्या ऐवजी हॅरी साधे पाणी पिणे पसंत करत असतो. एरव्ही ब्रिटिशांना अतिप्रिय असलेल्या ‘इंग्लिश टी’ला देखील हॅरीने आपल्या दिनक्रमातून वर्ज्य केले असल्याचे समजते. त्याचप्रमाणे धूम्रपान व मद्यपानही हॅरीने त्यागले असल्याचे समजते. योग्य आहाराच्या सोबत नियमित व्यायाम देखील हॅरीने आपल्या दिनक्रमामध्ये समाविष्ट केला असून, मेघनसोबत योग आणि मेडिटेशन करणे त्याला आवडू लागले असल्याचे समजते.

Leave a Comment