ब्रिटीश शाही परिवार आणि या शाही घराण्याशी संबंधित सर्वच सदस्य केवळ ब्रिटनमधेच नाही, तर जगभरामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यांची जीवनशैली असो, किंवा निरनिराळ्या देशांमध्ये हे सदस्य करीत असणारे राजकीय दौरे असोत, किंवा अनेक समाजकल्याणकारी कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होणे असो, हे सर्वच सदस्य नेहमीच प्रसिद्धीच्या झोतामध्ये असतात. विशेषतः खुद्द राणी एलिझाबेथ, तिचे थोरले सुपुत्र प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला, आणि ब्रिटीश शाही घराण्याचे राजकुमार प्रिन्स विलियम व प्रिन्स हॅरी, आणि त्यांच्या पत्नी केट मिडलटन आणि मेघन मार्कल यांची लोकप्रियता अमाप असल्यामुळे या मंडळींपैकी कोणी जर एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असतील, तर त्यासाठी करण्यात येणारी व्यवस्था देखील तितकीच भव्य असते.
खरे तर कोणत्याही कार्यक्रमासाठी, मग तो खासगी असो, किंवा औपचारिक असो, त्यासाठी जाण्याकरिता वाहनव्यवस्था कायमच उपलब्ध असते, आणि त्याचबरोबर अनेक वाहनचालक देखील तैनात असतात. पण तरीही अलीकडच्या काळामध्ये ब्रिटीश राजघराण्याचे हे लोकप्रिय सदस्य, अगदी लंडनच्या वाहनांच्या गर्दीमध्ये देखील स्वतःचे वाहन स्वतः चालविणे पसंत करताना दिसत आहेत. खरे तर शाही कार्यालये किंवा निवासस्थानांमध्ये कार्यरत कर्मचारी कोणत्याही कामासाठी नेहमीच तत्पर असून, शाही परिवाराच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्याची खबरदारी घेत असतात. पण तरीही अलीकडच्या काळामध्ये शाही घराण्याचे राजकुमार प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी वाहनचालक बरोबर न घेता स्वतःच वाहन चालविणे पसंत करताना पहावयास मिळतात.
या सर्वच सदस्यांची जीवनशैली, सामान्य नागरिकांच्या जीवनशैलीपेक्षा खूपच वेगळी, असामान्य आहे. त्यामुळे अश्या या जीवनशैलीमध्ये थोडा तरी सामान्यपणा असावा या करिता वाहनचालक बरोबर न घेता स्वतः वाहन चालविण्याच्या पद्धतीचा अवलंब या मंडळींनी केला असल्याचे समजते. अलीकडच्या काळामध्ये केवळ ब्रिटीश राजकुमारच नाही, तर त्यांच्या पत्नी देखील स्वतः वाहन चालविताना पाहिल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर राणी एलिझाबेथ देखील अनेकदा स्वतः वाहन चालवीत असतानाची छायाचित्रे नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहेत.