आंबेडकरांचा मोठेपणा


भारतीय जनता युवा मोर्चाच्या चंदिगढ येथील एका नेत्याने पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सध्या भारतीय जनता पार्टीच्या हातात केंद्रातली आणि अनेक राज्यातली सत्ता आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात आलेल्या सत्तेचा अर्थ सेवेची संधी असा घेत आहेत आणि अनेक ठिकाणी अतीशय नम्रपणे बोलताना आपण प्रधानमंत्री नसून आपण देशाचे प्रधानसचिव आहोत असे प्रतिपादन करत आहेत. परंतु सत्तेचा जो अर्थ मोदींना कळला आहे तो त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळलेला नाही. महिनाभरापूर्वी मध्य प्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकाने अशाच पध्दतीने केरळाच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. सत्तेचा आणि संधीचा असा अर्थ लावण्याचा मोह व्हावा एवढे सत्तेच्या संदर्भातील संस्कार या लोकांवर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या तोंडी अशी उद्दामपणाची भाषा येत आहे. आपण जो विचार मानतो तो पूर्णपणे निर्दोष आहे, त्याशिवाय जगात दुसरा कोणताही विचार नाही आणि आपण मानतो तो विचार ज्याला मान्य नाही त्याचे मुंडके कापणे योग्य आहे असा दर्प अशा लोकांच्या विचारातून प्रकट होत असतो.

सुप्रसिध्द नाटककार राम गणेश गडकरी यांच्या मूर्तीची विटंबना करणारे लोकही याच उद्दामपणाचे द्योतक आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करत असताना नेमक्या या उद्दामपणाचा आणि सत्तेच्या दर्पाचा संदर्भ लक्षात येतो. कारण भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकवेळ अशी आली की देशातल्या दलितांना सामाजिक न्याय दिला पाहिजे अशी एकमुखी मागणी पुढे आली. त्याचवेळी भारताची घटना तयार होत होती. ती तयार करण्याचे भाग्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाभले आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आंबेडकर म्हणतील ती कल्पना स्वीकारली जाऊ शकते अशी एक वेळ आली. मात्र ज्या वेळी देशातल्या अस्पृश्य समाजामध्ये ही विचारांची जागृती होत होती तेव्हा त्या संघटित विचारांच्या आधारावर आपण उद्दामपणा करावा असे आंबेडकरांना कधी वाटले नाही. आज कोणत्या का निमित्ताने होईना पण दलितांचा आवाज ऐकला जात आहे. अशावेळी शतकानुशतके आपल्यावर अन्याय करणार्‍या सवर्णांविषयी अपमानास्पद उद्गार काढावेत आणि शतकानुशतकाच्या अन्यायाचा सूड घ्यावा असा विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात कधी आला नाही.

आपल्या प्रचंड व्यासंगाच्या आधारावर बाबासाहेबांनी सवर्णांचे तथाकथित अन्याय्य समर्थन खोडून काढले. त्यांनी सवर्णांशी विचारांनी दोन हात केले आणि दलित समाजाच्या प्रगतीचा सकारात्मक विचार मांडला. त्यामुळे या समाजात काही प्रमाणात का होईन पण परिवर्तन घडलेले दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे फार दूरदृष्टी होती. त्यांनी समाजाच्या परिवर्तनाचा विचार मांडताना तत्कालीक चीड, सुडाची भावना आणि शत्रुत्वाची कल्पना यांना थारा दिला नाही. म्हणून आज त्यांच्या विचारांवर चालताना परिवर्तनाचे नवे नवे कांेंब समाजात फुटताना दिसत आहेत. डॉ. आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठीच सारा आटापिटा केला तेव्हा ते दलितांचे नेते होते असे म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु डॉ. आंबेडकर हे केवळ दलितांच्या उध्दारासाठीच नव्हे तर दलित, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि समाजाच्या सर्व वर्गातील स्त्रिया यांच्या उध्दारासाठी तळमळत होते. ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १९४६ च्या पहिल्या नियुक्त मंत्रिमंडळात कायदामंत्री होते. त्यांची ही नेमणूक होण्यापूर्वी पंडित नेहरु यांनी वरील सर्व वर्गांच्या प्रगतीसाठी आयोग नेमण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ते पाळले नाही.

नेहरुंनी केलेला हा वचनभंग आंबेडकरांना रुचला नाही. पंडित नेहरु यांनी केेवळ आंबेडकरांना दिलेले वचनच मोडले असे नाही तर मागासवर्गीयांच्या संदर्भात त्यांनी नेहमीच उदासीनता दाखवली. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला हा राजीनामा केवळ दलितांसाठी नव्हता. दलितांसाठी आरक्षण तर मंजूर झालेले होते. पण समाजातील अन्य उपेक्षित घटक हे त्यांच्या डोळ्यासमोर होते आणि त्यांनी मंत्रिपदाचा त्याग या लोकांसाठी केला होता. म्हणजे डॉ. आंबेडकरांना केवळ अनुसूचित जाती जमातींचे नेते मानणे हे कसे चूक आहे हे लक्षात येईल. डॉ. आंबेडकर यांनी तेव्हा या उपेक्षित वर्गांसाठी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यासाठी मंडल आयोग नेमून त्याची अंमलबजावणी व्हायला १९९० हे वर्ष उगवले. म्हणजे आपल्या देशातले मागासवर्गीयांच्या प्रगतीचा वेग किती मंद असतो याचा अंदाज येईल. परिवर्तन हे धीम्या गतीने होत असते. त्यामुळे परिवर्तनाची आस असणार्‍या तरुणांना धीर धरवत नाही. त्यांना सशस्त्र क्रांतीशिवाय परिवर्तन घडणे शक्य नाही असे वाटायला लागते. परंतु आंबेडकर यांनी वारंवार शांततामय परिवर्तनाचाच आग्रह धरलेला आहे. कारण हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही. उलट त्या मार्गाचा अवलंब करणारे परिवर्तनवादी लोक हिंसेमुळे अडचणीत येत असतात.

Leave a Comment