मतदान 2019 – पहिल्या चाचणीत मतदार पास!

election
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांतील पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले.य संपूर्ण देशात या टप्प्यात 66 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सात जागांसाठी सरासरी 56 टक्के टक्के मतदान झाले. एकुणात पाहता सार्वत्रिक निवडणुकांचा हा आरंभ शुभ झाला, असे म्हणावे लागेल. लोकसभेसाठीचे पंचवार्षिक मतदान ही एक परीक्षा मानली तर पहिला टप्पा ही चाचणी म्हणावी लागेल आणि या चाचणीत मतदार उत्तीर्ण झाल्याचे एकंदर चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. याठिकाणी सरासरी 61 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत आकडेवारीनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 53.13 टक्के, वर्ध्यात 55.36 रामटेकमध्ये 55.61 टक्के, भंडारा-गोंदियात 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूरमध्ये 61 टक्के आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 55 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार झाला नाही, हेही महत्त्वाचे. चंद्रपुरात तर सर्वाधिक तापमान असतानाही मतदारांनी रांगा लावून मतदान केले. आपला मताधिकार बजावला. या मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 62 टक्के मतदान झाले.

संपूर्ण देशात पहिल्या टप्प्यात 91 जागांसाठी मतदान झाले. या 91 जागांचा भूगोल अत्यंत मोठा आहे आणि भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मतदान झाले आहे. काश्मिरपासून पश्चिम उत्तर प्रदेश व उत्तराखंड आणि बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगडपासून दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगाणा तसेच शेजारील ओडिशातही मतदान झाले. यातील काही ठिकाणी अगदी अलीकडे बर्फवृष्टी झाली आहे आणि काही ठिकाणी उन्हाचा कडाका जाणवत आहे.

एवढी विविधता असूनही आणि या सर्व जागा एकमेकांपासून दूर असूनही तेथून येणाऱ्या बातम्या एकाच गोष्टीचा निर्देश करतात. ते म्हणजे आपल्या भविष्याचा निर्णय करण्याचा लोकांचा उत्साह एकसारखा होता. काश्मिरमधील दहशतवादग्रस्त भागांतील मतदानकेंद्रांबाहेर नागरिकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा म्हणजे फुटीरवाद्यांच्या थोबाडात लगावलेली सणसणीत चपराक होती. सर्वसामान्य जनता कोणाच्या बाजूने उभी आहे, याचा यापेक्षा ढळढळीत पुरावा कोणता पाहिजे?

आंध्र प्रदेश आणि ओडिशात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. त्यामुळे तेथील मतदारांना आपले दुहेरी कर्तव्य बजावले. अनेक ठिकाणी विक्रमी मतदान झाले. निवडणुकांच्या निमित्ताने या भागांचा दौरा करणारे तथाकथित पत्रकार व तज्ञ म्हणत आहेत, की सध्याच्या वातावरणात कोणाचीही लाट किंवा हवा नाही. असे असेल तर रांगांमध्ये लागलेले हे लोक कोणासाठी उभे आहेत? मतदानाच्या दिवशी या लोकांमध्ये दिसलेला उत्साह हा खरे तर मतदारांच्या परिपक्वतेचे खरे दर्शन आहे. या मतदारांच्या मनात काय दडले आहे, याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत. हे असे मतदार आहेत, म्हणूनच भारतातील लोकशाही टिकून आहे. कितीही संकटे आली तरी तिला बाधा पोचलेली नाही.

या पहिल्या टप्प्यातील मतदान हे राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि ईशान्य भारताने गेल्या वेळेस सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आंध्र प्रदेशात गेल्या वेळेस चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग होता. आज तो भाजपच्या कट्टर विरोधकांपैकी एक आहे. त्यामुळे कोणाला नुकसान होईल का किंवा नक्की किती होईल, हा औत्सुक्याचा भाग असेल. अशीच परिस्थिती ओडिशातही आहे. तिथेही मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल आणि एडीएने वेगवेगळे मार्ग पत्करले आहे. त्यामुळे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ या न्यायाने काँग्रेसला फायदा होतो का, हे कळण्यासाठी एक महिना वाट पाहावी लागेल.

अर्थात निवडणुकीचा रोमांचच असा असतो, की हा एक महिनाही बघता बघता जाईल. शिवाय उरलेल्या जागांचा रणसंग्राम अजून चालू आहेच. परंतु पहिल्या टप्प्यातील मतदारांनी आपली जबाबदारी बऱ्यापैकी पार पडली आहे, हे मात्र नक्की. आता अन्य मतदारांनीही त्यांचे अनुकरण करावे, म्हणजे लोकशाहीच्या या उत्सवाचे खरे पारणे होईल.

Leave a Comment