अबब! 70अब्ज डॉलरची ‘मादक’ घराणेशाही!

alcohole
राजकारणातील घराणेशाहीची आपल्याकडे सातत्याने आणि जोरदार चर्चा होते. परंतु राजकारणाच्याही पलीकडे घराणेशाही अस्तित्वात आहे. त्याची चर्चा होत नाही. परंतु या ना त्या कारणाने एखादा विषय पुढे येतो आणि डोळे विस्फारायला लावणारी माहिती उघडकीस येते.

आता हेच पाहा ना. दारूच्या धंद्यातही एक घराणेशाही नांदते आहे आणि काही घराणी तर तीनशे-चारशे वर्षांपासून या धंद्यावर राज्य करत आहेत. बॅकार्डी, मार्टिनी आणि जॅक डॅनियल्स यांसारखे ब्रँड्स एकाच कुटुंबाला वंश परंपरागतरीत्या फायदा मिळवून देत आहेत. या सर्व कुटुंबाचे मिळून तब्बल 70 अब्ज डॉलरची (4831 अब्ज 68 कोटी रुपये) कमाई या पेयांच्या विक्रीतून होते. विशेष म्हणजे भारतातही काही कंपन्यांची घराणी होती आणि या जागतिक घराण्यांनी त्यांची सद्दी संपविली आहे.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बॅकार्डी. जगातील सर्वोत्कृष्ट रम म्हणून बॅकार्डी ओळखली जाते. सुमारे 100 देशांमध्ये कंपनीच्या दरवर्षी 200 दशलक्षांपेक्षा अधिक बाटल्या विकल्या जातात, तर 2017 या एका वर्षात कंपनीच्या 17 दशलक्ष केसेस विकल्या गेल्या. स्पॅनिश वाईन व्यापारी बॅकार्डी मासो याने या ब्रँडची स्थापना केली असून 1862 पासून बॅकार्डी कुटुंबातील शेकडो सदस्य या एका मद्यामुळे श्रीमंत झाले आहेत. हीच कंपनी जगप्रसिद्ध मार्टिनी तसेच बॉम्बे जिन, ग्रे गूज व्होडका, डेव्हर्स आणि स्कॉच अशा मद्यांचीही निर्मिती करते. इतकेच नव्हे तर बॅकार्डीच्या पोर्टफोलिओमध्ये 200 पेक्षा जास्त ब्रँड आहेत.

त्याच प्रमामे नेग्रोनी या मद्याची मालकी इटालीच्या ग्रॅराव्होग्लिया कुटुंबाकडे आहे, तर जीम बीम या मद्याची मालकी जपानमधील साजी आणि तोरी या कुटुंबांकडे आहे. जगात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या जोस कुएर्वो या टकिला मद्याची मालकी बेकमान कुटुंबाकडे आहे. आपल्याकडे प्रसिद्ध असलेल्या जॅक डॅनियल्स या मद्याची मालकी अमेरिकेच्या ब्राऊन परिवाराकडे आहे.

यातील काही कुटुंबांचे मूळ 1,300 वर्षांपूर्वीपर्यंत मागे जाते. त्यांच्या कंपन्या शेअर बाजारात उतरल्यालाही आता अनेक वर्षे झाली. तरीही या उद्योगावर आजही त्यांचे मजबूत नियंत्रण आहे. इतर व्यवसायांच्या तुलनेने मद्य व्यवसायात कुटुंबांची मालकी आजही घट्ट आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या अंदाजानुसार, जगातील सर्वात श्रीमंत मद्य उत्पादकांकडे सुमारे 70 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीची मालकी आहे.

भारतापुरते बोलायचे झाले तर देशात दरवर्षी 300 दशलक्षांपेक्षा अधिक केसेस विकल्या जातात (एका केसमध्ये सुमारे 9 लिटर्स मद्य असते). या उद्योगावर सरकारी संस्थांची कडक नियंत्रणे आहेत, तरीही 2007 आणि 2016 दरम्यान वार्षिक 9.4 टक्के या गतीने या उद्योगाची वाढ झाली. आज भारतातील अर्ध्यापेक्षा अधिक बाजारपेठ दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात आहे. मूळ फ्रान्समधील पर्नोड रिकार्ड (अब्सोल्युट व्होडका, रिकार्ड पास्टिस, शिवास रिगल, रॉयल सॅल्युट इ. ची उत्पादक) आणि जागतिक दिग्गज कंपनी दियागो पीएलसी (मॅक्डॉवेल, व्हॅट 69, बॅगपायपर, सिग्नेचर इ. मद्यांचे उत्पादक). यातील पर्नोड रिकार्डने तळापासून आपले ब्रँड विकसित केले असून दियागो पीएलसीने भारतातील सर्वात मोठी मद्य कंपनी युनायटेड स्पिटिट्स लिमिटेडमधील (यूएसएल) काही भाग विकत घेतले आहेत. किशोर छाब्रिया यांच्या नेतृत्वाखालील अलाईड ब्लेंडर आणि डिस्टिलर्स ही एकमेव भारतीय कंपनी बाजारपेठेत त्यांच्यासमोर टिकून आहे. ही अलाईड ब्लेंडर म्हणजे प्रसिद्ध अशा ऑफिसर चॉईस व्हिस्कीची उत्पादक कंपनी.

एकेकाळी मोहन मीकिन आणि जगजित इंडस्ट्रीज या कंपन्यांकडे क्रमशः ओल्ड मॉन्क रम व ब्लॅक नाइट व्हिस्की आणि अरिस्टोकॅट व्हिस्की अशा दिग्गज ब्रँडची मालकी होती. मात्र आर्थिक उदारीकरणानंतर देशात मद्याच्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी प्रवेश केला आणि या ब्रँड्सना उतरती कळा लागली. मोहन मीकीन ही कंपनी मोहन मीकीन ब्रेवरीज म्हणून ओळखली जात होती. इ. स. 2001 मध्ये बॅकार्डी आणि टँड्यूए यानंतर ओल्ड मंकने जगातील तिसऱ्या क्रमांकाची विक्री करणारा रम ब्रँड म्हणून नोंद केली होती. त्यावेळी ओल्ड मंकच्या 8 दशलक्षांहून अधिक केसेसची विक्री झाली होती. वाढती स्पर्धा, प्रचंड आर्थिक ताकद असलेल्या परदेशी कंपन्यांचा प्रवेश आणि अन्य कारणांमुळे ओल्ड मंकची विक्री 2016 मध्ये 3.8 दशलक्ष केसेसपर्यंत घसरली. ब्लॅक नाईट हा ब्रँड तर आता कोणाच्या खिजगणतीतही नाही.

मात्र आता मोहन मीकीन, जगजित इंडस्ट्रीज आणि अमृत डिस्टिलरीजसारख्या काही कंपन्यांच्या मालकांची तिसरी पिढी या कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला कितपत यश येते हे काळ ठरविल, मात्र सध्या तरी हे काम अशक्यप्राय दिसते.

Leave a Comment