ज्युलियन असांजे – हॅकर, पत्रकार ते गुन्हेगार

julian-assange
फार नाही, उणीपुरी दहा वर्षेही झाली नाहीत. गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि संभाषणांना वाचा फोडून अमेरिकेसह अनेक देशांतील राजकारण्यांची एका माणसाने झोप उडवली होती. या एका माणसाच्या मागे सीआयएसह अनेक गुप्तचर यंत्रणा लागल्या होत्या. त्याच माणसाला, विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याला, अखेर बेड्या ठोकण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

ब्रिटिश पोलिसांनी गुरुवारी असांजेला अटक केल्याचे जाहीर केले. विकिलिक्स या आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून असांजेने भल्या-भल्या नेत्यांची आणि देशांची बिंगे फोडली होती. त्यामुळे असांजेला अटक करण्यात यावी, अशी मागणी अनेक देशांच्या सरकारांनी केली होती. अशा प्रकारे पोलिसांचा ससेमिरा असल्यामुळेच असांजेला दिवाभीतासारखे लपून राहावे लागत होते. गेल्या सात वर्षांपासून तो इक्वेडोरच्या दूतावासात राहत होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इक्वेडोरने त्याला नागरिकत्वही दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर इक्वेडोर सरकारने असांजेला दिलेले संरक्षण मागे घेण्याचा निर्णय केला. त्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी त्याला दूतावासातूनच अटक केली.

असांजेवर जगभरातील विविध सरकारांचा हा रोष होण्यास कारणीभूत ठरले ते विकिलिक्स हे संकेतस्थळ. जुलै 2010 मध्ये विकिलिक्स या संकेतस्थळाने अफगाणिस्तानमधील युद्धाशी संबंधित 90,000 दस्तावेज संकेतस्थळावर आणून अमेरिकी प्रशासनाची भंबेरी उडविली होती. ही कागदपत्रे प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याची माहिती जगप्रसिद्ध अशा मोजक्या वर्तमानपत्रांकडे पोचविण्याची खबरदारी या संकेतस्थळाने घेतली. त्या वर्तमानपत्रांनीच मग संकेतस्थळावरील दस्तावेजांबाबत लोकांमध्ये औत्सुक्य निर्माण केले.

या एकूण प्रकरणामुळे ज्युलियन असांजे या माणसाची भरपूर चर्चा झाली. ते साहजिक होते. आपल्या या कार्यपद्धतीला असांजेने दिलेले नाव होते – शास्त्रीय पत्रकारिता. असांजे हा मुळात एक हॅकर! त्याचे स्वत:चे घर नाही. जगभरातील त्याच्या मित्रांसमवेत तो राहतो. विविध देशांमध्ये पसरलेल्या 800 अर्ध-वेळ स्वयंसेवक आणि 10,000 समर्थकांच्या आधारावर त्याचे हे बिंगफोडीचे काम चालते.

ऑस्ट्रेलियात 1971 मध्ये जन्मलेल्या असांजेचे बालपण अगदी भटकेपणात गेले. वयाची 15 वर्षे पूर्ण करण्याआधी त्याच्या आईने त्याला घेऊन 37 गावे बदलली होती. या परिस्थितीत पारंपरिक शिक्षण घेणे त्याला शक्यच नव्हते. त्यामुळे वाचनालयांमध्ये जाऊन तो लिहिणे-वाचणे शिकला. त्यानंतर त्याने थेट संगणक आज्ञावली लिहिण्यास सुरूवात केली. घरात इंटरनेट आल्यानंतर त्याचा मोहरा हॅकिंगकडे वळला.

थोडक्याच काळात विविध सरकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांत घुसखोरी करण्याचे कौशल्यही त्याने आत्मसात केले. हॅकिंगच्या त्याच्या या नादापायी 1991 मध्ये त्याला अटक झाली आणि त्याच्यावर 30 गुन्हे नोंदविण्यात आले. न्यायालयात त्याने स्वत:चे गुन्हे कबूल केले. मात्र न्यायाधीशांनी त्याला शिक्षा देण्याऐवजी केवळ दंड ठोठावला. कोणाचेही मुकसान करण्याच्या हेतूने त्याने हॅकिंग कले नाही. त्याने जे केले ते शोधाशोध करण्याच्या स्वभावातून केले, असे न्यायाधीशांनी सांगितले.

याच भोचकपणाची परिणती म्हणजे त्याचे विकिलिंक्स हे संकेतस्थळ. जून 2010 मध्ये न्यू यॉर्कर या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत असांजेने स्वतःच्या या संकेतस्थळाला शास्त्रीय पत्रकारिता (scientific journalism) असे नाव दिले. “पत्रकारिता ही विज्ञानासारखी असली पाहिजे. त्यातील वस्तुस्थिती जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तपासून पाहता आल्या पाहिजेत,” असे त्याने मुलाखतीत सांगेितले.

असांजेच्या या संकेतस्थळामागे कुठल्याही एका विचारसरणीचा आधार नाही. याच संकेतस्थळावर अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमध्ये झालेला मेलव्यवहार प्रकाशित झाला होता. त्यातून हे शास्त्रज्ञ जागतिक तापमानवाढ विरोधी संशोधन दडपून टाकण्यात मग्न असल्याचे सूचित होत होते. अशा प्रकारच्या मोठा परिणाम करणाऱ्या गौप्यस्फोटांसाठी कायदेशीर संरक्षण मिळेल, अशा देशांमध्ये त्याचे सर्व्हर आहेत. क्राऊडसोर्सिंग (सामुदायिक संकलन) या नावाने ओळखल्या जाणाच्या पद्धतीने मेलांजे व त्याचे सहकारी माहिती एकत्र करतात. या पद्धतीत विविध पातळ्यांवर काम करणारी माणसे आपापल्या पद्धतीने माहिती एकत्र करून ती इतरांपुढे आणतात.

विकीलिक्समुळे अमेरिकेने अफगाणिस्तान व इराकमध्ये केलेले अत्याचार जगासमोर आले. त्याचे लोण अन्य देशांपर्यंतही पसरले. त्यामुळे ‘विकीलीक्स’ची आर्थिक कोंडी करणे, असांजेवर लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवणे असे प्रकार सुरू झाले. आता झालेली अटक ही त्याचीच परिणती आहे. पत्रकारिता व माध्यमांना नवे वळण देणारा असांजे आता गुन्हेगार म्हणून उभा आहे. त्याच्या भवितव्यावर पत्रकारितेचेही भवितव्य बरेचसे अवलंबून आहे.

Leave a Comment