इम्रानची गुगली, पण मोदी काय करणार?

imran-khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे भारतातील अगोदरच तापलेल्या राजकीय वातावरणात नवी भर पडली आहे. तसेही भारतातील निवडणुकांमध्ये या ना त्या निमित्ताने पाकिस्तानचा उल्लेख होतोच. याला लोकसभा तर काय पण बिहारसारख्या राज्यातील विधानसभा निवडणूकही अपवाद नाही. मात्र प्रत्यक्ष पाकिस्तानने या निवडणुकांमध्ये दखल देण्याचा प्रकार सहसा घडत नाही. यंदा तो घडला आणि म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला तर काश्मिर मुद्द्याचे निराकरण होऊ शकते, अशा आशयाचे वक्तव्य इम्रान यांनी परदेशी पत्रकारांशी बोलताना केले. सध्या विरोधी असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा करणे अशक्य होईल. राजकीय पक्षांकडून टीका होण्याच्या भीतीने काँग्रेस चर्चा करणार नाही, असे इम्रान यांनी म्हटले आहे. वरवर पाहता इम्रान यांचे हे वक्तव्य नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे वाटते, मात्र प्रत्यक्षात त्याला खोलवर अर्थ आहे. क्रिकेटच्या मैदानावर इम्रान हे वेगवान गोलंदाज असले तरी राजकीय क्षेत्रात त्यांनी फिरकी गोलंदाजांसारखी ‘गुगली’ टाकली आहे. त्यातून भारतातील निवडणुकांवर असर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

इम्रान खान यांच्या या वक्तव्याला लष्करी चालीचा वास आहे. पाकिस्तानात मोदी यांच्याबद्दल जी सर्वत्र तिटकारा व द्वेषाची भावना आहे, ती जगजाहीर आहे. केवळ सेना किंवा सरकारी क्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही मोदी यांची प्रतिमा खलनायकाचीच आहे. खुद्द इम्रान खानच्या यापूर्वीच्या वक्तव्यांमधूनही हा द्वेष झळकला होता. “मी आयुष्यभर अशा छोट्या लोकांशी भेटलेलो आहे जे मोठ्या कार्यालयांतील मोठ्या पदांवर बसलेले आहेत मात्र त्यांच्याकडे दूरदर्शीपणा नाही,” असे ट्वीट त्यांनी गेल्या वर्षी केले होते. त्याचे लक्ष्य मोदी हेच होते. इम्रान यांच्या ताज्या वक्तव्यातही त्यांनी मोदींची तुलना इस्राएलचे नवनिर्वाचित पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी केली आहे.

एकीकडे हा द्वेष तर दुसरीकडे पाकिस्तानला मोदी यांची भीतीही वाटते. मोदी हे पंतप्रधानपदी कायम राहिले तर ते कोणते पाऊल उचलतील, ही पाकिस्तानला चिंता आहे. भारतात अन्य एखाद्या पक्षाचे सरकार बनले तर त्याच्याशी चर्चा करणे सोपे जाईल, असे पाकिस्तानातील सरकार व प्रशासनाचे मत आहे.

त्यामुळे मोदी यांची स्तुती करून इम्रान यांनी मोदींवर भरवसा असलेल्या भारतीय मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. एक प्रकारे हे मानसिक युद्ध (‘सायकोलॉजिकल ऑपरेशन’) आहे. सध्याचे आपल्याकडचे एकूणच वातावरण असे आहे, की पाकिस्तानबद्दल मवाळ धोरण असलेले नेते हे राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे इम्रान जेव्हा मोदींची तुलना करतात तेव्हा मोदी आणि इम्रान यांची जवळीक असल्याचे चित्र निर्माण होते. त्यातून सामान्य जनतेतही गोंधळ निर्माण होतो आणि विरोधकांनाही हल्ला करण्याची संधी मिळते.

आणि झालेही तसेच! विरोधकांनी या वक्तव्यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात जराही उशीर केला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आम आदमी पक्षा’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यात आघाडी घेतली. ‘पाकिस्तानला मोदींना का जिंकवायचे आहे? मोदी यांनी देशाला सांगायला हवे. ती पाकिस्तानबरोबर त्यांचे नाते किती दृढ आहे? सर्व भारतीयांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की मोदी जिंकले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील,’ असे केजरीवाल यांनी ट्विटरवरुन प्रश्‍न विचारले. अन्यपक्षीय नेत्यांनीही थोड्या फार फरकाने असेच प्रश्न विचारले, अशीच टीका केली. यातून पाकिस्तानचे अर्थातच फावले.

याचा अर्थ स्पष्ट आहे. इम्रान खान यांच्या वक्तव्याचा अर्थ ते दाखवत आहेत त्यापेक्षा खूप वेगळा आहे. त्यामागे एक डाव आहे. एक तर त्यांचे हात बांधलेले आहेत, त्यांना सेनेचे बाहुले असेच म्हटले जाते. त्यामुळे पाकिस्तानी सेनेला मंजूर नसलेले एकही पाऊल ते उचलू शकत नाहीत. त्यांचा बोलवता धनी वेगळाच आहे. असो.

सेनेच्या सांगण्यावरूनच का होईना, पण इम्रान यांनी गुगली तर टाकली आहे. आता मोदी हा चेंडू निव्वळ तटवतात का कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्याच्यावर षटकार ठोकतात, याची उत्सुकता नक्कीच असणार आहे.

Leave a Comment