निर्लज्ज ब्रिटनचा अडेलतट्टूपणा

britain
अमृतसर येथील जालियानवाला बाग हत्याकांड हे जगातील सर्वात निर्घृण आणि अत्याचारी हत्याकांडापैकी एक मानले जाते. यंदा या हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ब्रिटनने या कत्तलीबद्दल माफी मागावी, अशी मागणी अनेक जण करत आहेत. मात्र ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी हे हत्याकांड म्हणजे ब्रिटनच्या इतिहासावरील काळाकुट्ट डाग असल्याचे सांगून वेळ निभावली आहे. या निर्घृण हत्याकांडाबद्दल त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही. यातून ब्रिटनचा निर्लज्जपणा आणि अडेलतट्टूपणा हे दोन्हीही दिसून येतात.

ब्रिटिश संसदेच्या चर्चांमध्ये गेली अनेक वर्षे हा मुद्दा गाजत आला आहे. संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधानांच्या साप्ताहिक प्रश्नोत्तरांमध्ये मे यांना या संबंधात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी या घटनेवर केवळ ‘खेद’ व्यक्त केला आणि या हत्याकांडाचे वर्णन वरील प्रकारे केले. मात्र औपचारिक माफीचे त्यांनी नावही काढले नाही.

जालियांवाला बाग नरसंहार 13 एप्रिल 1919 रोजी झाला होता. ‘‘ही घटना ब्रिटिश भारतीय इतिहासातील लज्जास्पद डाग आहे. भारतासोबतच्या आमच्या इतिहासातील हे दुःखद उदाहरण आहे, असे महारानी एलिझाबेथ द्वितीय यांनी 1997 मध्ये भारताच्या दौऱ्यावर जाताना म्हटले होते. तेच आजही लागू आहे,’’ असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटिश सरकारने माफी मागावी, असा ठराव पंजाब विधानसभेने यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच एकमताने संमत केला आहे. अमृतसरमधील जालियानवाला बागेत झालेले निष्पाप निदर्शकांचे हे दुर्दैवी हत्याकांड ही ब्रिटिशांच्या भारतातील वसाहतवादी राजवटीच्या अत्याचाराचे प्रतीक होऊन राहिलेली आहे. ब्रिटिश सरकारच्या जुलमी रौलेट कायद्याविरुद्ध शांततेने निदर्शने करीत असलेल्या नागरिकांवर जनरल डायर याच्या आदेशावरून सैनिकांनी गोळ्या झाडल्या होत्या. जनरल डायर याच्या हुकुमावरून सैनिकांनी निशस्त्र लोकांवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. सरकारी आकड्यानुसार या हत्याकांडामधे 379 लोकांचा मृत्यू झाला, मात्र प्रत्यक्षात मृतांचा आकडा 1,000 हून अधिक होता. लाल रक्ताचे पाट वाहिले.

आणखी संतापजनक म्हणजे या नरसंहाराबद्दल सरकारने खेद किंवा खंतही व्यक्त केला नव्हता. उलट गोळ्या संपल्यामुळे आमचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारली असती, असे उद्दाम वक्तव्य डायर याने केले होते.

भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी या हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली होती. तसेच या हत्याकांडामधे जखमी झालेल्या हुतात्मा उधम सिंग यांनी तब्बल 21 वर्षांनी 13 मार्च 1940 रोजी जनरल ओ’डायर याला यमसदनी पाठवून या हत्याकांडाचा बदला घेतला होता.

“या दु:खद घटनेची शताब्दी आम्ही साजरी करत असताना ब्रिटिश सरकारने भारताच्या लोकांची औपचारिक माफी मागितली तरच त्याची योग्य पोचपावती मिळू शकेल. त्यामुळे जालियानवाला बागेतील निष्पाप लोकांच्या कत्तलीची माफी मागण्याबाबत ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी हे सभागृह राज्य सरकारला एकमताने शिफारस करत आहे,” असे पंजाब विधानसभेच्या ठरावात म्हटले होते. सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दल- भाजप, आप आणि लोक इन्साफ पार्टी या पक्षांनीही या ठरावाला पाठिंबा दिला होता.

इतकेच नव्हे तर लंडनचे तत्कालीन महापौर सादिक खान हे दोन वर्षांपूर्वी अमृतसर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनीही जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी ब्रिटन सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यालाही ब्रिटन सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सादिक खान हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. तसेच ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून 2013 मध्ये भारत दौऱ्यावर असताना त्यांनीही जालियनवाला बाग हत्याकांड ही अत्यंत लाजिरवाणी घटना असल्याची कबुली दिली होती.

दर वेळेस 13 एप्रिल किंवा बैसाखीच्या दरम्यान हा मुद्दा समोर येतो. यंदा या नरसंहाराला 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे” त्याला आणखी महत्त्व आले आहे. मंगळवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या विषयावर चर्चा चालू असताना आर्थिक कारणावरून माफी मागायला नकार देत असल्याचे ब्रिटिश सरकारने सांगितले. ब्रिटिश सत्तेशी निगडीत घटनांबद्दल वारंवार माफी मागितल्याने नवीन समस्या उद्भवू शकतात, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री मार्क फील्ड म्हणाले.

म्हणजेच आपण भारतावर राज्य केले, हा गंड ब्रिटिशांच्या मनातून अजून गेला नाही म्हणायचा. म्हणूनच इतक्या लज्जास्पद कृत्याबद्दलही माफी मागण्यास ब्रिटिश सरकार कचरत आहे. म्हणूनच म्हणावे वाटते, “ब्रिटिशर्स, शेम ऑन यू!”

Leave a Comment