रजनीकांतचे राजकारण – दोन पाऊल पुढे, एक पाऊल मागे

rajanikanth
तमिळनाडूचे राजकारण नेहमीच चित्रपट तारे-तारकांनी रंगतदार बनलेले असते. त्यात आधी जयललिता आणि नंतर एम. करुणानिधी यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून काढण्यासाठी कमल हासन आणि रजनीकांत या दोन सुपरस्टारनी राजकारणात उडी घेतली. तेव्हा हे राजकारण आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा होती. मात्र आपापल्या परीने हे दोन्ही सुपरस्टार धडपडत असून त्यांना राजकारणाचा सूर सापडलेला नाही. म्हणूनच राजकीय भूमिका घेताना या दोघांचीही तारांबळ उडत आहे. त्यातही रजनीकांत यांचे राजकारण दोन पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे या पद्धतीने चालू आहे, असे दिसते.

दोन वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी राजकारणात धमाकेदार एंट्री घेतली होती. मात्र त्यावेळी यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही, हे स्पष्ट केले होते. आपले लक्ष्य केवळ तमिळनाडू विधानसभा निवडणूक आहे हेही त्यांनी तेव्हाच सांगितले होते. मात्र मंगळवारी त्यांनी आपल्या भूमिकेला मोडता घालत भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याचे स्वागत केले आणि राजकीय चर्चेला एकच उधाण आले.भाजपच्या जाहीरनाम्यात नदीजोड़ प्रकल्पाचा वायदा केलेला आहे आणि त्याचे स्वागत रजनीकांत यांनी केले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नदीजोड प्रकल्पाची कल्पना
सर्वात आधी मांडण्यात आली होती. “त्याही वेळी मी त्या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तरी या योजनेला भगीरथ योजना असे नाव द्यावे असे त्यांच्याकडे सुचविले होते,” असे रजनीकांत यांनी चेन्नईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नद्यांचे एकत्रिकरण महत्त्वाचे आहे, असे रजनीकांत यांचे म्हणणे आहे. याबद्दल त्यांनी जे ट्विट केले त्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाबद्दल ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. ईश्वराच्या आशीर्वादाने किंवा जनतेच्या पाठिंब्याने रालोआचे सरकार आले तर त्यांनी सर्वात आधी या योजनेची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यावरून त्यांना भाजपचा विजय हवा आहे असे निष्कर्ष काढण्यात आले. वास्तविक पाहता रजनीकांत यांनी राजकारणात उडी घेतल्यापासूनच त्यांचा कल भाजपकडे असल्याचे बोलले जात आहे. किंबहुना भाजपचा राज्यातील चेहरा म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचे कोणाला आश्चर्य वाटायचे कारण नव्हते. मात्र आपल्याला अध्यात्मिक राजकारण करायचे आहे असे सांगणाऱ्या रजनीकांत यांच्या या पवित्र्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली नसती तरच नवल.

याचे कारण म्हणजे तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका 2021 मध्ये होणार आहेत आणि तोपर्यंत आपण कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. ‘मी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला पाठिंबा देणार नाही’ ही रजनीकांत यांची भूमिका आहे.
रजनीकांत यांचे मित्र, चित्रपट क्षेत्रातील स्पर्धक आणि आता राजकारणातील विरोधक कमल हासन यांनी त्यांच्याकडे मदतीची याचना केली होती. “ते निवडणूक लढवणार नाहीत तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा,” असे हासन यांनी बोलून दाखवले होते. मात्र कोणालाही समर्थन द्यायचे नाही या भूमिकेमुळे रजनीकांत यांनी त्यालाही नकार दिला होता. पत्रकारांनी याबाबत छेडले तेव्हा आपल्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी “दोन मित्रांमध्ये वितुष्ट आणू नका,” असे सांगितले होते.

त्याच रजनीकांत यांनी भाजपच्या मुद्द्याचे स्वागत करावे हे राजकीयदृष्ट्या लक्षणीय आहे. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल मतप्रदर्शन करण्यास रजनीकांत तयार आहेत. मात्र पूर्णपणे राजकीय क्षेत्रात उतरून आपला पाठिंबा द्यायला अजूनही त्यांची तयारी नाही. नदीजोड प्रकल्पाचे स्वागत करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यातही त्यांनी हात राखूनच भूमिका मांडली. “माझ्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नसून आजही माझा पाठिंबा कोणत्याही पक्षाला नाही,” असे त्यांनी सांगितले. एवढेच कशाला तर रजनी मण्ड्रम या आपल्या संघटनेचे अजून त्यांनी राजकीय पक्षात रूपांतरही केलेले नाही. अधिकृत असा राजकीय पक्ष त्यांनी अजूनही काढलेला नाही.

याचाच अर्थ स्पष्टपणे आपल्याला राजकारणात काय करायचे आहे याचा आराखडा अद्यापही त्यांच्याकडे तयार नाही. राजकारणात तर यायचं आहे पण राजकारणात करायचं काय आहे, याचा मसुदा त्यांच्याकडे तयार नाही. त्यामुळे अशाप्रकारे दोन पाऊल पुढे एक पाऊल मागे या पद्धतीने त्यांना वाटचाल करावी लागत आहे!

Leave a Comment