संपूर्ण चीन देशामध्ये हा रस्ता बहुधा सर्वाधिक प्रकाशमान असावा असे म्हटल्यास ते खोटे ठरणार नाही. कारण तीन किलोमीटर लांबी असलेल्या या रस्त्यावर तब्बल एक हजार स्ट्रीट लाईट्स लावले गेले आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी, की हा कुठलाही राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग नसून, चीनमधील शियान प्रांतातील ताओजीया गावाच्या बाहेरील कच्चा रस्ता असून, या कच्च्या रस्त्याला चीनमधील सर्वाधिक प्रकाशमान रस्ता म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे. मात्र हा रस्ता अशा प्रकारे दिव्यांनी उजळून टाकण्याचे कारण मात्र काहीसे विचित्र आहे.
‘शांघाईइस्ट’ ने दिलेल्या वृत्तानुसार ताओजीया गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या गावाबाहेरील तीन किलोमीटर लांबीच्या कच्च्या रस्त्यावर एक हजार स्ट्रीट लाईट्स लावले आहेत. या तीन किलोमीटर अंतरापैकी केवळ पाचशे मीटर अंतरामधेच तब्बल दोनशे लाईट्स लावले गेले आहेत. सामान्यतः स्ट्रीट लाईट्स लावले जाताना सुमारे पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावर एक अशाप्रमाणे लावले जाण्याची पद्धत आहे. त्यामुळे इतक्या कमी अंतरामध्ये इतके जास्त स्ट्रीट लावण्याचे नेमके कारण काय असावे असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार ज्या ठिकाणी हा रस्ता आहे, त्या ठिकाणी आता ‘शियान इंटरनॅशनल ट्रेड अँड लॉजिस्टिक्स पार्क’ बनायचे असून त्यासाठी या संपूर्ण भागाचे नूतनीकरण केले जाणार आहे. या भागाचे नूतनीकरण करताना जुन्या सर्व सुविधा हटविल्या जाणार असून, त्या बदल्यात ग्रामस्थांना आर्थिक मोबदला देण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली असल्याने, या एकाच भागामध्ये सर्वाधिक स्ट्रीट लाईट्स लावण्याची युक्ती ग्रामस्थांनी योजिली असल्याचे समजते. त्यांच्या या अजब योजनेच्या अनुसार जितके जास्त स्ट्रीट लाईट्स हटविले जातील, तितका जास्त मोबदला मिळणार असल्याचे गणित ग्रामस्थांनी मांडले आहे. त्यांची ही योजना सफल होणार किंवा नाही हे मात्र सध्या कोणीच सांगू शकत नसल्याचे मतही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे.