फिनलंडची शिक्षणव्यवस्था जगामध्ये का ठरत आहे सर्वोत्तम ?

finland
प्रत्येक देशाचे भवितव्य देशाच्या युवा पिढीच्या हातामध्ये असल्याचे म्हटले जात असते. ही युवा पिढी आपली जबाबदारी स्वीकारण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सिद्ध असावी. विचारांनी परिपक्व असावी, यासाठी आवश्यकता असते युवा पिढीला त्यांच्या आवडीनुसार शिक्षणाच्या योग्य संधी मिळण्याची. हीच विचारधारा अनुसरून फिनलंड देशाने तेथील शिक्षण पद्धतीमध्ये काही मूलभूत बदल घडवून आणले आहेत. या बदलांच्या परिणामस्वरूप फिनलंड देशाने आत्मसात केलेली शिक्षण पद्धती सध्या जगामध्ये सर्वाधिक यशस्वी शिक्षणव्यवस्थांपैकी एक ठरत आहे. या आगळ्या शिक्षणपद्धतीबद्दल जाणून घेऊ या.
finland1
फिनलंड देशामध्ये शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अशिकार मानला गेला असून सर्व नागरिकांना शिक्षणाच्या समान संधी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा अधिकार फिनलंडच्या घटनेनुसार नागरिकांना दिलेला आहे. आपल्याकडे मुले अडीच-तीन वर्षांची होतात न होतात तोच त्यांना शाळेमध्ये पाठविण्याची घाई सुरु होते. त्याचबरोबर चांगल्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश मिळावा या करिता तर पालक युद्धपातळीवर तयारी करीत असताना दिसतात. फिनलंडमध्ये मात्र मुले वयाच्या सातव्या वर्षापासून शाळेमध्ये जातात. त्यामुळे शाळेमध्ये जाण्याआधीच मुले बऱ्याच अंशी स्वावलंबी बनलेली असतात. तसेच शिक्षणाची संधी आणि पद्धत सर्वत्र एकसमान उपलब्ध असल्याने एखादी शाळा चांगली किंवा एखादी वाईट, हा प्रश्न मुळातच येथे उद्भवत नाही. तसेच वयाच्या सातव्या वर्षापासून मुले शाळेमध्ये जाऊ लागत असल्याने अगदी लहान वयामध्ये त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे ही लादले जात नाही.
finland2
शाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मुलांसाठी प्री-प्रायमरी प्रोग्रामचा पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये ‘लर्निंग थ्रू प्ले’ पद्धतीवर भर दिला जातो, म्हणजेच निरनिराळ्या खेळांच्या, किंवा रोचक प्रकल्पांच्या माध्यमातून मुलांना मूलभूत शिक्षण दिले जाते. या ठिकाणी पुस्तके वाचायला लावण्याची किंवा काही लिहीण्याची सक्ती मुलांवर केली जात नाही, तर एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यावरून मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडण्याला प्राधान्य दिले जाते. मुलांचे शालेय शिक्षण सुरु झाले, की त्यांच्यावर परीक्षांचा, मार्क जास्त पाडण्याच्या स्पर्धेचा भडीमार केला जात नाही. उच्चशालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर संपूर्ण फिनलंड मधील विद्यार्थ्यांना एकच परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये ‘standardize’ केलेली असते. एरव्ही सर्व वर्गांमध्ये वेगळी परीक्षा न घेता मुलांचे शिक्षक मुलांच्या बुद्धिमत्तेच्या आणि इतर बाबतीत मुलांचे मूल्यांकन करीत असतात.
finland3
शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांना फिनलंडच्या समाजव्यवस्थेमध्ये मानाचे स्थान आहे. तसेच सर्व शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक उच्चशिक्षित असून, सर्व शिक्षकांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे इथे बंधनकारक आहे. फिनलंडच्या शाळांमध्ये मुलांना गृहपाठ किती दिला जावा याबद्दलही निश्चित नियम आहेत. सर्वसाधारणपणे फिनिश मुले आठवड्यातून सरासरी दोन तास गृहपाठासाठी देतात. वयाची सोळा वर्षे ओलांडल्यानंतर शाळेमध्ये शिक्षण सुरु ठेवायचे की एखादा व्होकेशनल कोर्स निवडायचा हे ठरविण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाते. दरवर्षी सुमारे नव्वद टक्के विद्यार्थी पुढे शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतात. फिनलंड मध्ये विद्यापीठामध्येही शिक्षण मोफत असून, प्रौढांनाही नोकरी, किंवा व्यवसाय सांभाळतानाच मनाजोगे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने सर्वच कोर्सेस वर सरकारच्या वतीने मोठ्या सवलती देण्यात येत असतात.

Leave a Comment