झोरोस्ट्रियन धर्मामध्ये अग्नी मंदिराला मोठे महत्व असून, झोरोस्ट्रियन धर्मियांचे हे प्रमुख प्रार्थनास्थळ समजले जाते. याच अग्नीमंदिराला पर्शियन भाषेमध्ये ‘दर-ऐ-मेहर’ आणि गुजराती भाषेमध्ये ‘आग्यारी’ म्हटले जाते. या धर्मामध्ये अग्नीला महत्वाचे स्थान असून, हे पवित्रतेचे प्रतीक मानले गेले आहे. सध्याच्या काळामध्ये जगभरामध्ये एकूण १६७ अग्नीमंदिरे असून, यातील पंचेचाळीस आग्यारी मुंबईमध्ये आहेत, आणि इतर १०७ आग्यारी भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आहेत. १७ आग्यारी भारताबाहेर, इतर देशांमध्ये आहेत. ही अग्नीमंदिरे अतिशय पवित्र मानली जात असून, मंदिरातील गर्भगृहामध्ये कोणी प्रवेश करायचा आणि कोणी नाही याचे निश्चित नियम आहेत. झोरोस्ट्रियन महिलांनी जर परधर्मियाशी विवाह केला, तर त्यांना या आग्यारीच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याची मुभा नसते.
भारताशिवाय इतर देशांमध्ये ज्या आग्यारी आहेत, त्यांपैकी एक आग्यारी इराण देशामध्ये याझ्द येथे असून, या आग्यारीला ‘याझ्द आतष बेहराम’ म्हटले जाते. ‘याझ्द येथील अग्नी मंदिर’ असा या नावाचा अर्थ आहे. सोळा प्रकारचे दिव्याग्नी एकत्र आणून ही दिव्यज्योत बनली असून, इ.स ४७० सालापासून ही ज्योत अखंड प्रज्वलित आहे. इ.स ४७० साली ‘पार्स कार्यान’ मंदिरामध्ये सर्वप्रथम प्रज्वलित करण्यात आलेली ही ज्योत त्यानंतर ‘आक्दा’ नामक शहरामध्ये स्थलांतरित करण्यात आली. या ठिकाणी ही ज्योत सुमारे सातशे वर्षे प्रज्वलित ठेवल्यानंतरही अनेकदा ही ज्योत स्थलांतरित झाली. अखेरीस १९३४ साली ही अग्नीज्योत याझ्द येथे आणली गेली असून, तेव्हापासून येथे विटांचा वापर करून बांधल्या गेलेल्या आग्यारीमध्ये हा अग्नी आजतागायत प्रज्वलित आहे.
वर्तमानकाळामध्ये हा अग्नी एका तांब्याच्या पात्रामध्ये प्रज्वलित असून, या पात्राच्या संरक्षणार्थ सभोवताली काचेची भिंत उभारण्यात आली आहे. ही ज्योत प्रज्वलित ठेवण्याची कामगिरी बजाविणाऱ्याला ‘हिरोब’ म्हटले जात असून, दिवसभरातून अनेकदा या अग्नीमध्ये लाकडांची भर घालून हा अग्नी प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी हिरोबची असते. या अग्नी मंदिराच्या परिसरामध्ये फळांची मोठी बाग असून, येथे अग्नीमंदिराच्या छायाचित्रांचे एक संग्रहालयही आहे. या मंदिरामध्ये परधर्मियांना प्रवेश असला, तरी मंदिराच्या गर्भगृहामध्ये, जिथे हा पवित्र अग्नी प्रज्वलित आहे, तिथे प्रवेश करण्याची मुभा मात्र परधर्मियांना नाही.