जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर हिमालयातील माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम देण्यासाठी या शिखराची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला असून त्यासाठी चार गिर्यारोहकांचा समावेश असलेले पथक बुधवारी एव्हरेस्टवर रवाना होत आहे. हे चारही जण शिखराचे सर्व्हेक्षण करणार आहेत. नेपाळ आणि चीन यांच्या सीमेवर हिमालय क्षेत्रात हे ८८४८ मीटर म्हणजे २९०२९ फुट उंचीचे एव्हरेस्ट शिखर असून १९५४ साली या शिखराची उंची भारतीय सर्व्हेक्षण टीमने नोंदविली होती. त्यानंतरही अनेकदा या शिखराची उंची मोजली गेली मात्र आजही १९५४ साली मोजलेली उंचीच जगात प्रमाण मानली जाते.
माउंट एव्हरेस्टची उंची नेपाळ सरकार पुन्हा मोजणार
२०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भुकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा जगभरात होते आहे. त्यावर पूर्णविराम द्यावा यासाठी नेपाळ सरकारने २०१७ साली एव्हरेस्ट पर्वतारोहण अभियानाची घोषणा करून सर्व्हेक्षण दल पाठविण्यास मंजुरी दिली होती असे संयोजक सुशील दंगोल यांनी सांगितले. ते म्हणाले, भूकंप झाल्यापासून एव्हरेस्टच्या उंचीबाबत सतत शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने चार जणांची टीम नियुक्त केली होती. या सर्वाना दोन वर्षे शिखर उंची मोजण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले गेले आहे तसेच टॉपवर विपरीत हवामानात हे काम असे करायचे, त्यासाठी नेलेली अत्याधुनिक उपकरणे कशी वापरायची याचेही प्रशिक्षण दिले गेले आहे. ते ग्राउंड लेव्हलपासूनच नोंदी घेणार आहेत.
सर्वेक्षण टीमचे प्रमुख गौतम म्हणाले हे काम सोपे नाही याची जाणीव आहे. मात्र तरीही ही मोहीम यशस्वी होईल याचा विश्वास आहे. गौतम यांनी २०११ मध्ये एकदा एव्हरेस्ट सर केलेले आहे. नेपाळ साठी एव्हरेस्ट ही अभिमानाची बाब असली तरी नेपाळ सरकारकडून प्रथमच एव्हरेस्टची उंची मोजली जाणार आहे. मे १९९९ मध्ये अमेरिकन टीमने जीपीएसचा वापर करून या शिखराची उंची मोजली होती आणि ती २ मीटरने वाढली असल्याचे जाहीर केले होते तरीही १९५४ साली मोजली गेलेली उंचीच आजही व्यापक स्वरुपात स्वीकारली जाते असे समजते.