ही आहेत जगातील सर्वात धोकादायक पर्यटनस्थळे

destination
उन्हाळ्याच्या किंवा नाताळच्या दिवसांमध्ये सुट्टीसाठी नातेवाईक मंडळींकडे जाण्याच्या ऐवजी वर्षातून एकदा तरी नवनवीन ठिकाणांना भेटी देण्याचा पर्याय अधिकाधिक पर्यटक निवडताना पहावयास मिळत आहेत. पर्यटनस्थळांमध्ये ही अनेक पर्याय उपलब्ध असून जो तो आपपल्या आवडीप्रमाणे पर्यटनास जाऊ शकतो. काहींना निसर्गरम्य हिल स्टेशन्स आवडतात, तर काहींना बर्फाळ डोंगरांतून हायकिंग करण्यास आवडते. काहींना वाइल्ड लाईफ सफारी आवडतात, तर काहींना अथांग समुद्र आणि त्याचे सुंदर दर्शन घडविणारे शांत सागरी किनारे आवडतात. थोडक्यात सांगायचे झाले, तर प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे पर्याय निवडता येणे सहज शक्य झाले आहे. मात्र जगभरातील काही लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी काही स्थळे पर्यटकांसाठी धोकादायक ठरली आहेत.
destination1
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे असलेल्या योसमाईट नॅशनल पार्कमध्ये अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. यातील मुख्य आकर्षण म्हणजे ‘हाफ डोम’ नामक एक उंच डोंगर आहे. ‘अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स’च्या चाहत्यांना हायकिंग करण्यासाठी या डोंगराचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. मात्र या डोंगरावरील हायकिंग ट्रेल अतिशय अवघड असून, अनेक ठिकाणी हायकर्सना वर चढून जाण्यासाठी स्टीलच्या केबल्सची आवश्यकता पडत असते. मात्र या केबल्सवरून वर चढून जाताना जर चुकून हाताची पकड ढिली झाली, तर मात्र होणारा अपघात टाळला जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये आजवर अनेक हायकर्सना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
destination2
एखाद्या बगिच्यामध्ये फेरफटका मारताना, फुलांनी, फळांनी भरगच्च होऊन डवरलेली झाडे पाहताना मन प्रसन्न होते. मात्र इंग्लंड मधील ‘अल्न्विक गार्डन’मध्ये हा अनुभव येत नाही. कारण केवळ विषारी रोपे आणि वनस्पती असलेला हा बगीचा आहे. याला ‘द पॉइझन गार्डन’ या नावाने ओळखले जाते. या बगीच्यामधील झाडांना स्पर्श करणे, यांची पाने हुंगून पाहणे अर्थातच धोकादायक असून, तसे सूचनाफलक या बगीच्यामध्ये सर्वत्र पहावयास मिळतात. या बगीच्यातील सर्वात विषारी आणि धोकादायक झाडांना चक्क पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. ‘किल्फ्स ऑफ मोहेर’ या नावाने ओळखले जाणारे आयर्लंडच्या सागरी किनाऱ्यावरील कडे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. अथांग अटलांटिक महासागराचे सुंदर दर्शन घडविणारे हे कडे असल्याने दर वर्षी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. मात्र या कड्यांना कोणत्याही प्रकारचे कठडे, किंवा लोखंडी रेलिंग नसल्याने या कड्यांवरून पर्यटक खाली कोसळून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अनेकदा वाहणारे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि त्यामुळे कोसळणारे कडे यांमुळेही अनेक अपघात येथे आजवर झालेले आहेत.
destination3
स्विस आल्प्स पर्वतशृंखलेमध्ये सुमारे तीनशे फुट उंचीवर, ५६० फुट लांबीचा ‘ट्रिफ्ट ब्रिज’ आहे. हा जगातील सर्वात मोठ्या आणि अरुंद सस्पेन्शन ब्रिजेसपैकी एक आहे. या ब्रिजवर पोहोचण्यासाठी तीन केबल कार राईड्स कराव्या लागत असून, ट्रिफ्ट हिमनदीच्या वर हा ब्रिज बांधलेला आहे. हा ब्रिज दुरून अगदी कमकुवत भासत असला, तरी भरपूर वजन आणि हादरे पेलू शकेल असा आहे. २००९ साली या ब्रिजचे निर्माण करण्यात आले होते. मात्र ज्यांना उंचीचे भय आहे, त्यांनी या ठिकाणापासून लांबच राहणे चांगले. हवाई द्वीपसमूह पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय लोकप्रिय असला, तरी या ठिकाणी तीन सक्रीय ज्वालामुखीही आहेत. त्यांपैकी एक ‘किलौया माउंटन’ हा ज्वालामुखी सक्रीय असून, याचे सतत उद्रेक होत असतात. गेल्या वर्षी तीन मे रोजी या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन यातील लाव्हा हवाईमधील पाहोआ शहराच्या अगदी जवळ पोहोचल्याने या शहरामध्ये घबराटीचे वातवरण होते.

Leave a Comment