कथा अचानक गायब झालेल्या ‘ड्रमर बॉय’ची

drummer
इंग्लंड येथील उत्तरी यॉर्कशायर भागामध्ये रिचमंड नामक एक लहानसे शहर आहे. एक अतिशय सुंदर, भव्य राजवाडा, टुमदार बाजारपेठा आणि ‘अॅलिस इन वंडरलँड’ व इतर लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक लुईस कॅरोल यांचे प्राथमिक शिक्षण झालेले शहर म्हणून रिचमंड गावाची ख्याती आहे. पण या शिवाय या गावाची आणखी एका गोष्टीसाठी ख्याती आहे. ती गोष्ट आहे रिचमंड गावातील एका ‘ड्रमर बॉय’ची. रिचमंडमध्ये असलेल्या मोठ्या राजवाड्याला आणि गावातील ‘इस्बी अॅबी’ नामक प्रार्थनास्थळाला जोडणारे, जमिनीखाली एक भुयार असल्याची आख्यायिका या गावमध्ये सर्वश्रुत आहे. या गावमध्ये असलेल्या स्वेल नदीच्या कडेने हे भुयार असल्याचे म्हटले जात असे.
drummer1
या भुयाराशी निगडित आख्यायिका मोठी रोचक आहे. अठराव्या शतकामध्ये काही सैनिकांना अगदी योगायोगानेच या जमिनीच्या खाली खोलवर दडलेल्या भुयाराचा शोध लागल्याचे म्हटले जाते. मात्र ते भुयार कैक वर्षे बंद असल्याने त्यामध्ये पडझड होऊन भुयारातील मार्ग अगदी जेमतेमच शिल्लक होता. भुयाराचे तोंड लहान असल्याने आणि आतमधील मार्गही फारसा मोकळा नसल्याने सैनिकांना भुयारामध्ये शिरणे अवघड होऊ लागले. त्यावेळी ड्रम्स वाजविणाऱ्या एका लहान मुलाने या भुयारामध्ये शिरून सैनिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आनंदाने उचलली. या मुलाने भुयारामध्ये शिरायचे, आणि भुयाराच्या आत चालत असताना त्याचे ड्रम्स सातत्याने वाजवीत राहायचे व सैनिकांनी ड्रम्सच्या आवाजाचा मागोवा घेत भुयाराच्या वरून जमिनीवरून वाट काढत भुयाराच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायचे असे ठरले.
drummer2
ठरल्याप्रमाणे ‘ड्रमर बॉय’ भुयारामध्ये शिरला आणि ड्रम्स वाजवीत चालू लागला. त्याच्या ड्रम्सच्या आवाजाचा मागोवा घेत सैनिक भुयाराच्या वर, जमिनीवर चालू लागले. भुयाराचा मार्ग राजवाड्यापासून सुरु होऊन नदीच्या किनाऱ्याने बाजारपेठ ओलांडून प्रार्थनास्थळाच्या दिशेने चालला असल्याचे सैनिकांच्या लक्षात आले. अचानक इस्बी अॅबी पासून सुमारे एक मैलाच्या अंतरावर असताना भुयाराच्या आतून येणारा ड्रम्सचा आवाज बंद झाला. सैनिकांनी काही वेळ ड्रम्सचा आवाज पुन्हा सुरु होण्याची वाट पाहिली, मात्र ड्रम्सचा आवाज काही पुनश्च सैनिकांच्या कानी पडला नाही, आणि ड्रम्सच्या आवाजाबरोबर ‘ड्रमर बॉय’ ही नाहीसा झाला.
drummer3
घडल्या प्रकाराने सैनिक इतके अस्वस्थ झाले, की भुयाराचा शोध त्यांनी अर्ध्यावरच थांबविण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रमर बॉय’चे पुढे नेमके काय झाले याबद्दल अनेक अंदाज वर्तविले जाऊ लागले. काहींच्या मते आधीच जर्जर झालेल्या त्या भुयारी मार्गातून जात असताना भुयाराचे छत कोसळून त्यामध्ये ड्रमर बॉयचा मृत्यू झाला असावा, तर ड्रम्सचा आवाज ऐकून भुयारामध्ये असलेल्या एखाद्या जंगली श्वापदाने या मुलाची शिकार केली असल्याचा अंदाजही अनेकांनी वर्तविला. यातली कोणती कहाणी खरी आणि कोणती खोटी हे जरी सांगता येत नसले, तरी हा ‘ड्रमर बॉय’ पुन्हा कधीच कोणाच्या दृष्टीला पडला नाही ह मात्र खरे. भुयारामध्ये ज्या ठिकाणी तो ‘ड्रमर बॉय’ अचानक अदृश्य झाला, त्या ठिकाणी भुयाराच्या वर, जमिनीवर एक स्मारक आताही अस्तित्वात असून, ‘रिचमंड ड्रमर बॉय’ला हे स्मारक समर्पित आहे.

Leave a Comment