असा आहे राणी एलिझाबेथच्या मौल्यवान आभूषणांचा खजिना

elizabeth
ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसरी) ही जगातील सर्वात धनाढ्य सत्ताधीशांपैकी एक समजली जाते. अपार स्थावर मालमत्तेखेरीज राणी एलिझाबेथच्या संग्रही अनेक मौल्यवान आभूषणेही आहेत. या आभूषणांची किंमत कोट्यवधी डॉलर्सच्या घरात आहे. ब्रिटनवर विंडसर घराण्याची सत्ता कैक शतकांपासून चालत आली असल्याने राणी एलिझाबेथला या राजघराण्यामध्ये कैक पिढ्यांपासून असलेली अनेक मौल्यवान आभूषणे वारसहक्काने मिळाली आहेत. या पैकी अनेक आभूषणे राणीने आता इतर परिवारजनांना भेट दिली असली, तरी राणी एलिझाबेथचा खासगी आभूषणांचा संग्रह आजही मोठा आहे. यापैकी अनेक आभूषणे राणीला वारसहक्काने मिळाली आहेत, तर काही राणीने खास स्वतःच्या पसंतीने तयार करवून घेतली आहेत.
elizabeth1
राणीने राज्याभिषेकाच्या वेळी परिधान केलेला राजमुकुट ‘द इम्पिरियल स्टेट क्राऊन’ म्हणून ओळखला जातो. हा राजुमुकुट राणीचे पिता एडवर्ड(सहावे) यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी, १९३७ साली तयार करण्यात आला होता. चांदीच्या कोंदणात जडविलेले २,८६८ हिरे या राजमुकुटावर असून, सोन्याच्या कोंदणात जडविलेली अनेक मौल्यवान रत्नेही या राजमुकुटावर आहेत. या रत्नांमध्ये सतरा नीलम, अकरा पाचू, आणि २६९ तेजस्वी मोत्यांचा समावेश आहे. राणीच्या संग्रही खास बर्माहून आलेली माणिके असून, ही माणिके राणीला तिच्या विवाहानिमित्त बर्माच्या नागरिकांच्या वतीने भेट देण्यात आली होती. १९७३ साली या माणिकांचा वापर करून राणीने स्वतःसाठी ‘गेरार्ड्स’ या शाही जवाहिऱ्यांंकडून मुकुट तयार करवून घेतला. या मुकुटावर ९६ अतिशय तेजस्वी आणि मौल्यवान माणिके आहेत.
elizabeth2
राणीच्या संग्रही ‘द ग्रँँड डचेस व्लादिमीर टियारा’हा हिरेजडीत मुकुट असून, राणीची आजी क्वीन मेरी यांनी १९२१ साली हा मुकुट स्वतःसाठी बनवविला होता. आता हा मुकुट वारसहक्काने राणी एलिझाबेथच्या संग्रही आहे. राणी एलिझाबेथच्या संग्रही जपानी मोत्यांचा कंठा असून, हा कंठा जपान सरकारच्या वतीने राणीला भेट देण्यात आला होता. या कंठ्याच्या मधोमध एक अतिशय मौल्यवान हिऱ्यांचे पेंडंंट आहे. राणीच्या शिवाय प्रिन्स विलियम ची पत्नी केट मिडलटन हिनेही या कंठा अनेकदा परिधान केलेला पाहिला गेला आहे. एके काळी राणी व्हिक्टोरियाच्या आईच्या संग्रही असलेल्या ‘अॅमेथीस्ट’ रत्नांचा हार आणि कर्णभूषणेही आता राणी एलिझाबेथच्या संग्रही आहेत. त्याचप्रमाणे ‘ ब्राझीलीयन अॅक्वामरीन’ रत्नांचा सुंदर हार आणि कर्णभूषणेही राणीच्या संग्रही आहेत. ही आभूषणे ब्राझीलच्या जनतेच्या वतीने राणीला भेट म्हणून देण्यात आली होती. याच आभूषणांंशी मिळता जुळता मुकुट राणीने बनवून घेतला होता.
elizabeth3
राणीच्या संग्रही असलेला हिरेजडीत ‘ग्रॅनीज् टियारा’ हा राणीची आजी, क्वीन मेरी यांचा असून, यामध्ये सुरुवातीला मौल्यवान टपोरे मोती जडविलेले होते. नंतर हे मोती काढवून घेऊन दुसऱ्या मुकुटामध्ये लावण्यात आले. ‘द केम्ब्रिज लव्हर्स नॉट टियारा’ हा तो मुकुट प्रिन्सेस डायनाच्या खास आवडीचा होता. ‘द रशियन फ्रिंज टियारा’ हा राणीच्या संग्रही असलेला मुकुट राणीने आपल्या विवाहप्रसंगी, १९४७ साली परिधान केला होता. या सर्व आभूषणांंच्या व्यतिरिक्त राणीचा संग्रह खूपच मोठा आहे. यामध्ये अनेक मुकुट, रत्नहार, कर्णभूषणे, मौल्यवान रत्ने इत्यादींचा समावेश आहे.

Leave a Comment