अवघ्या एका रात्रीत झाले या मंदिरांचे निर्माण !

temple
भारतमध्ये अशी अनेक मंदिरे आहेत जी पाहून आपल्या आश्चर्याला पारावार उरत नाही. मग ती या मंदिराची रचना असो, वास्तुशैली असो, शिल्पकला असो, किंवा मंदिरांशी निगडित अनेक रोचक आख्यायिका असोत, आपल्याला थक्क करून सोडणाऱ्या अनेक बाबी या मंदिरांच्या बाबतीत दिसून येत असतात. यातील अनेक मंदिरे अतिशय प्राचीन असून, प्रत्येक मंदिराशी निगडीत काही ना काही तथ्ये, आख्यायिका तेथील स्थानिक लोकांकडून ऐकावयास मिळत असतात. यामधील काही मंदिरांचे निर्माण तर अवघ्या एका रात्रीत करण्यात आले असून, या मंदिरांशी निगडीत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
temple1
उत्तर प्रदेश राज्यातील वृंदावन येथे गोविंद देवजी यांचे मंदिर आहे. हे मंदिर दुरून दिसावयास अतिशय सुंदर दिसत असले, तरी जवळून पाहिले की या मंदिराचे निर्माण बहुधा अर्धवट राहिले असावे असे वाटते. या मंदिराचे निर्माण अवघ्या का रात्रीत झाल्याचे म्हटले जाते. अनेक भुतांच्या दिव्य शक्तीतून या मंदिराचे निर्माण झाले असल्याची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. भुते रात्रीच्या वेळी या मंदिराचे निर्माण आपल्या दिव्य शक्तीने करीत असता पहाट झाली, आणि त्यावेळी गावातील कोणीतरी जात्यावर दळण दळण्यास सुरुवात केली. जात्याची घरघर ऐकून भुते मंदिराच्या निर्माणचे कार्य अर्धवट टाकून निघून गेल्याने तेव्हापासून या मंदिराचे निर्माणकार्य तेवढ्यावरच थांबल्याची मान्यता येथे रूढ आहे.
temple2
उत्तराखंड राज्याच्या पिठौरागड मध्ये शिवशंकराचे मंदिर आहे. या मंदिराला ‘हथिया देवल’ म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे निर्माण एकच हात असलेल्या शिल्पकाराने केले असल्याचे म्हटले जात असल्याने या मंदिराला ‘हथिया देवल’ या नावाने ओळखले जाते. मंदिराचे निर्माण करता करता पहाट झाली, आणि आपले काम लवकर संपविण्याच्या नादामध्ये या शिल्पकाराने शिवलिंगाची दिशा विपरीत बाजूला केली, त्यामुळे या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येत असले, तरी येथे शिवलिंगाची पूजा मात्र होत नाही. मध्य प्रदेशातील मुरैना गावापासून वीस किलोमीटर अंतरावर ‘ककनमठ’ नामक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे निर्माण कच्छवाह वंशाचे राजा कीर्ती सिंह यांच्या शासनकाळामध्ये झाले असून, हे मंदिरही अवघ्या एका रात्रीत उभे केले गेले असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे निर्माण शिवशंकरांचे ‘गण’, म्हणजेच भुतांनी केले असल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर पूर्णपणे पाषाणाने बनले असून, हे सर्व पाषाण अशा पद्धतीने रचले गेले आहेत, की कितीही जोराचे वादळवारे वाहिले, कितीही नैसर्गिक आपदा आल्या तरी त्यांमुळे या मंदिराला आजवर त्यामुळे कोणतेही नुकसान होऊ शकलेले नाही.
temple3
मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भोजपूर गावामध्ये एका डोंगरावर भोजेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे निर्माण परमार वंशाचे राजा भोज यांनी करविले होते. या मंदिराचे निर्माणकार्य देखील एका रात्रीच्या अवधीमध्ये केले गेले असून, हे निर्माणकार्य अर्ध्यावरच सोडलेले पहावयास मिळते. असे का झाले असावे याची नेमकी माहिती उपलब्ध नसून मंदिराच्या छताची निर्मिती पूर्ण होण्याच्या आधीच पहाट झाल्याने या मंदिराचे काम अर्धवट राहिले असल्याची स्थानिक लोकांची मान्यता आहे. या मंदिरामध्ये असलेले शिवलिंग पाषाणाने बनलेले असून, हे भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे. झारखंड राज्यातील देवघर येथील शिवमंदिराचे निर्माण साक्षात ब्रह्माने एका रात्रीत केले असल्याची मान्यता येथे रूढ आहे. या मंदिराच्या प्रांगणामध्ये सती पार्वतीचे मंदिरही असून, या मंदिराचे निर्माण करत असता पहाट झालाने या मंदिराचे निर्माणकार्य अर्धवट राहिल्याची आख्यायिका आहे.

Leave a Comment