जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने…

health-day
दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. आरोग्यपूर्ण आणि सुदृढ शरीर हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून, आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्याइतपत ज्ञान आणि तशी संधी व सुविधा जगातील प्रत्येकाला, जगाच्या हरएक कानाकोपऱ्यात मिळवून देण्याकडे केल्या जाणाऱ्या वाटचालीचे हे प्रतीक आहे. पण आजच्या प्रगत काळामध्ये देखील जगातील सुमारे चाळीस टक्के लोकांना मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. एकतर वाढत्या महागाईने वैद्यकीय सुविधा देखील महागल्या असल्यामुळे अनेकदा त्या सुविधा न परवडण्याजोग्या असतात. त्यामुळे अनेकांना या सुविधांची अतिशय गरज असूनही त्यांपासून वंचित राहावे लागते, तर अनेक रुग्णांना त्यांच्या आजारांवर वारेमाप पैसा खर्च होत असल्याने भवितव्याची चिंता सतावत असते. कित्येकदा रोगाच्या अपुऱ्या माहितीमुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत, तर अनेकदा रुग्ण अशा ठिकाणी असतात जिथे वैद्यकीय मदत पोहोचणे अशक्य असते.

लहान मुलांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसार दरवर्षी जगभरामध्ये सुमारे सहा लाख मुलांचा मृत्यू होत असतो, तर दररोज जगभरातील सुमारे आठशे स्त्रिया गर्भवती असताना किंवा बाळंतपणामध्ये दगावीत असतात. मलेरिया, क्षय, एड्स या रोगांपेक्षाही अधिक प्राणघातक डायरिया आणि न्युमोनिया हे आजार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. अशा वेळी आपल्याकडे आयुर्वेदाच्या रूपाने परंपरेने चालत आलेली नैसर्गिक उपचारपद्धती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली यांचे महत्व आपल्याला नव्याने पटते. त्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय नियमितपणे अवलंबले गेले तर त्यातून शरीराला उत्तम रोगप्रतिकारशक्ती लाभत असून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

नैसर्गिक उपचार पद्धतीबरोबरच ऋतुमानाच्या अनुसार आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामही सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. आपला दैनंदिन आहार, व्यायाम आणि झोपेचे वेळापत्रक ठरविताना आपल्याला दिवसभरामध्ये घ्यावे लागणारे शारीरिक श्रम, आणि रोजची कामे उरकताना मनावर येणारा मानसिक ताण यांचा ही विचार करणे आवश्यक आहे. रोजच्या कामाच्या धावपळीमध्ये आपल्या आवडत्या कामांसाठी वेळ काढणे हे मनावरील ताण कमी करून मनाला समाधान आणि आनंद देणारे असते. मन प्रसन्न राहिले तर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही सकारात्मक असतो. याचाही फायदा आपल्या शरीराला होतच असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याला पूरक असे बदल आपण जीवनशैलीमध्ये केले, तर शरीर निरोगी राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment