चीनचे 10 तुकडे होणे हेच माझे स्वप्न!

china1
चीनच्या आर्थिक आणि राजकीय दादागिरीला जगातील बहुतेक देश कंटाळले आहेत. मात्र एखादा चिनी नागरिकच उभा राहून चीनचे १० तुकडे होण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर? हा प्रकार घडला आहे लियाओ यिवु या लेखकाच्या बाबतीत. चीन म्हणजे संपूर्ण ‘जगाला धोका’ असून या देशाचे 10 किंवा त्यापेक्षा जास्त तुकडे व्हावेत, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

लियाओ यिवु नावाच्या या व्यक्तीला एवढे महत्त्व देण्याचे काय कारण? तर लेखक म्हणून लियाओ याची ख्याती आहे. साम्यवादी रशियातील बंडखोर लेखक सोल्झेनित्सीन याच्याशी त्याची तुलना केली जाते आणि चिनी सोल्झेनित्सीन म्हणून त्याला ओळखले जाते. बीजिंग येथील तियानानमेन चौकात १९८९ मध्ये साम्यवादी सत्ताधाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत क्रूरपणे चिरडले होते. त्या हत्याकांडाच्या निषेधार्थ “मॅसाकर” नावाची कविता लियाओ याने लिहिली होती. त्यासाठी त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. याच लियाओने एएफपी वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली असून त्यात ही इच्छा व्यक्त केली आहे. चीनची फाळणी झाली तर मानवजातीवर उपकार होतील, असे त्याने म्हटले आहे.

“माझे स्वप्न आहे की चीनचे 10 किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये विभाजन व्हावे, कारण चीन हा आज संपूर्ण जगासाठी एक धोका आहे,” असे त्याने म्हटले आहे. ” बुलेट्स अँड ओपियम ” हे त्याचे ताजे पुस्तक फ्रान्समध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानिमित्त त्याने ही मुलाखत दिली आहे. या पुस्तकावर चीनमध्ये बंदी घालण्यात आली असून त्यात लोकशाहीची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यात आली आहे. हे हत्याकांड चार जूनचे हत्याकांड म्हणून ओळखले जाते आणि चीनमध्ये त्यावर चर्चा करणे गुन्हा समजला जातो.

लियाओ हे निर्वासित म्हणून 2011 पासून बर्लिनमध्ये राहतात. “चीनला परतणे ही माझ्यासाठी फार मोठी बाब नाही. मात्र मला माझ्या मूळ सिचुआनमध्ये परत जायचे आहे – ते स्वतंत्र होईल तेव्हा. मग तिथे परत जाण्यास मला आनंद होईल,” असे त्यांचे म्हणणे आहे.
मानवाधिकार संघटनांच्या म्हणण्यानुसार, लियाओ यांच्यावर तुरुंगात अत्याचार करण्यात आले आणि तुरुंगातून सुटल्यावरही पोलिसांनी त्यांचा छळ केला.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कारकीर्दीत चीनचे शासन अधिकाधिक एककेंद्री होत असून यामुळे आपल्याला नैराश्य येत असल्याचे त्याने सांगितले.

“तीस वर्षांपूर्वी आम्हाला वाटले होते, की आपण लोकशाहीच्या दिशेने पुढे जाऊ. आज मात्र प्रत्येकजण पैसा कमावू पाहत आहे. तियानमेन चौक हत्याकांडानंतर चीनवर टीका करणारा प्रत्येक पाश्चात्य देश आज त्याच्याशी व्यापार करण्यासाठी उतावीळ आहे. दुसरीकडे चीनमध्ये लोकांना तुरुंगात डांबून त्यांना जीवे मारणे चालूच आहे,” असे त्याचे म्हणणे आहे.

अध्यक्ष शी जिनपिंग यांची मुलगी इतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या मुलांबरोबर हार्वर्ड विद्यापीठात शिकली, यातील विसंगतीही त्याने दाखवली. जे लोक पक्षावर टीका न करता पैसा कमवतात ते स्वतःला वाट्टेल ते करू शकतात,” असे लियाओचे म्हणणे आहे.

लियाओचा चीनवर एवढा राग का? याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला तियानमेन हत्याकांडाबद्दल जाणून घ्यावे लागेल. चीनमधील विद्यार्थ्यांनी आर्थिक सुधारणा आणि राजकीय उदारमतवाद यांसाठी १५ एप्रिल १९८९ रोजी या चौकात निदर्शने केली होती. या निदर्शनांनंतर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी या निदर्शकांवर रणगाडे चालवले. या निर्घृण हल्ल्यात हजारो जण मरण पावले. सगळ्या चौकात रक्ताचे पाट वाहिले. या प्रसंगाला चार जूनची दुर्घटना किंवा तिआनमेन हत्याकांड म्हणून ओळखले जाते. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे माजी जनरल सेक्रेटरी हू यो बांग या हल्ल्यात मारले गेले. ते राजकीय उदारमतवादाचे एक समर्थक होते. त्यांच्यावरच्या अंतिम संस्कारासाठी तिआनमेन चौकात एक लाख लोक जमा झाले होते. त्यानंतर बीजिंगच्या बाहेरही निदर्शनांना सुरुवात झाली. सरकारने अनेक लोकांची आणि त्यांच्या नेत्यांची धरपकड करून हे बंड मोडून काढले. अत्यंत हिंसक पद्धतीने हे आंदोलन चिरडून टाकण्यात आले. नक्की कितीजण मृत झाले याचा आकडा सरकारने शेवटपर्यंत जाहीर केला नाही.

हे आंदोलन हे चिनी जनतेच्या मनातील भळभळती जखम आहे. लियाओसारख्या अनेकांना आजही त्या आठवणी सुखाने झोपू देत नाहीत. अमानुष साम्राज्यवाद आणि हुकूमशाहीचे तिआनमेन हे प्रतीक बनले आहे. म्हणूनच हा चौक असलेल्या चीनचे तुकडे होणे, हेच आपले जीवितधेय असल्याचे मानणारे लियाओसारखे लोक या जगात आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होवो, ही त्यांना शुभेच्छा!

Leave a Comment