असा बनवला गेला ‘कलंक’चा भव्यदिव्य सेट

kalank
बी-टाऊनमध्ये सध्याच्या घडीला करण जोहरची निर्मिती असलेल्या मल्टीस्टारर ‘कलंक’ चित्रपटाची बरीच चर्चा आहे. टीजर पासून ते ट्रेलरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवत आहे. कलाकारांच्या लूक्ससोबतच यातील भव्यदिव्य सेटही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आकर्षणीय ठरले आहेत. पण त्याचप्रकारची कठोर मेहनतही त्यासाठी घेतली आहे. ही सर्व मेहनत या चित्रपटाच्या मेकिंग व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

कलाकार एखाद्या चित्रपटासाठी जेवढी मेहनत घेतात. त्यापेक्षा पडद्यामागील लोकेही कठीण परिश्रम घेत असतात. तब्बल ७०० पेक्षा अधिक लोकांनी ‘कलंक’चा सेट तयार करण्याकरिता ३ महिने काम केले आहे. एखाद्या शहरासारखा हा सेट उभा करण्यात आला आहे. चित्रपटासाठी बराच पैसा खर्च करण्यात आला असावा, असा अंदाज या व्हिडिओवरुन येतो.

‘कलंक’चे जग प्रेक्षकांना पाहता यावे, याकरिता हा व्हिडिओ करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केल आहे. वरुण धवन या जगाची ओळख करुन देताना यात दिसतो. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा सेट अमृता महल यांनी डिझाईन केला आहे. ‘हुस्नाबाद’ असे या सेटला नाव दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा चित्रपट असल्यामुळे तसा काळ दाखविण्यासाठी त्याच पद्धतीचा सेट उभारण्यात आला होता. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दिक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा, अशी स्टारकास्ट झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment