जगातील सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये या भारतीय चित्रपटांचाही समावेश

bollywood
भारतीय सिनेसृष्टीमध्ये असे अनेक चित्रपट येऊन गेले, ज्यांच्या प्रभावी कथानकाने, आणि अभिनयाने दर्शकांना केवळ जागीच खिळवून ठेवले नाही, तर कथानकावर विचार करण्यासही भाग पाडले. मग तो एखादा विनोदी चित्रपट असो, एखाद्या सामाजिक प्रश्नाला अधोरेखित करणारा चित्रपट असो, किंवा एखादा रहस्यपट असो, या सर्वच चित्रपटांनी केवळ भारतीय दर्शकांची मनेच जिंकली नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्धी मिळविली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या चित्रपटांमध्ये काही भारतीय चित्रपट देखील समाविष्ट आहेत.
bollywood1
१९५०-१९५९ या काळामध्ये सत्यजित रे यांच्या ‘द अपु ट्रिलॉजी’ या तीन चित्रपटांच्या मालिकेला कॅन, व्हेनिस आणि लंडन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘द वर्ल्ड ऑफ अपु’ या तीनही चित्रपटांच्या केंद्रस्थानी असलेल्या अपु नामक एका ब्राह्मण मुलावर या चित्रपटांची कथानके आधारित होती. १९६४ साली प्रदर्शित झालेला सत्यजित रे यांचा आणखी एक चित्रपट ‘चारुलता’ हा देखील सर्वशश्रेष्ठ चित्रपटांच्या यादीमध्ये समविष्ट आहे. १९५७ साली प्रदर्शित झालेला ‘प्यासा’ हा चित्रपटही या यादीमध्ये समाविष्ट आहे. विजय नामक कवी आणि गुलाबो नामक एका वेश्येच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये विजयची भूमिका गुरुदत्त यांनी साकारली असून, गुलाबोची भूमिका वहिदा रेहमान यांनी साकारली होती.
bollywood2
१९८७ साली प्रदर्शित झालेला कमल हासन अभिनीत, आणि मणिरत्नम दिग्दर्शित ‘नायकन’ हा चित्रपट सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक समजला गेला आहे. अन्यायाला लढा देताना, भ्रष्टाचाराला विटून अखेर स्वतःच गुन्ह्याच्या जगामध्ये सामील झालेल्या एका युवकाची कथा या चित्रपटामध्ये दर्शविली गेली आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटालाही अपार लोकप्रियता लाभली. एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या भोवती या चित्रपटाचे कथानक गुंफलेले असून, हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेतील आहे. याच चित्रपटाचा, याच नावाचा, अजय देवगण आणि तबू अभिनीत रिमेक ही अतिशय गाजला.
bollywood3
२००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाचे कथानक चाकोरीतील विषयांच्या पेक्षा हटके, दर्शकांना विचार करण्यास भाग पाडणारे होते. या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचे अप्रतिम अभिनय यांमुळे हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुकाचा विषय ठरला होता. २०१२ साली प्रदर्शित झालेली ‘गँग्स ऑफ वासेपूर’ ही अॅक्शन कॉमेडी देखील जगभरातील दर्शकांची पसंती मिळवून गेली. २००७ साली प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’ हा आमीर खानचा चित्रपट वेगळ्या, हृदयस्पर्शी विषयाला हात घालणारा ठरला. त्यामुळे आजवरच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा ही समावेश आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ आणि ‘अंधाधून’ या चित्रपटांनीही उत्तम कथानके आणि कलाकारांचा भारदस्त अभिनय या जोरावर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान मिळविले आहे.

Leave a Comment