चिनी वस्तूंची लाट ओसरतेय…

china
चिनी वस्तूंच्या भारतीय बाजारपेठेवरील आक्रमणामुळे गेली अनेक वर्षे चिंता व्यक्त केली जात आहे. चिनी वस्तूंमुळे बेजार झालेले व्यापाऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेक घटक समाजात आहेत. खासकरून दहशतवादविरोधी लढाईत चीनकडून पाकिस्तानची पाठराखण करण्यात येत असल्यामुळे चीनबाबत नागरिकांमध्ये आजही संतप्त भावना आहे. चीनी वस्तू खरेदीतून पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसा आणि शस्त्रास्त्रे मिळतात. त्यामुळे ज्या प्रमाणे भारतीय जवान सीमेवर चीनला रोखून धरतात त्याप्रमाणे देशभक्त नागरिकांनी चीनला भारतीय बाजारपेठेत रोखून धरण्यासाठी, भारतीय उद्योग, व्यापार, रोजगार क्षेत्रांना वाचविण्यासाठी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन अनेक संघटनांकडून करण्यात येत होते.

मात्र जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे याबाबत भारत सरकारचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे चिनी वस्तू देशात येण्यापासून रोखणे सरकारला थेट शक्य नव्हते. थोडक्यात म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार लोकांना सहन करावा लागत होता. खेळणी, पायपुसणी, पणत्या यांसारख्या छोट्या वस्तूंपासून ते मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत चीनी मालाने भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. या घुसखोरीमुळे स्थानिक लघु उद्योजक आणि छोटे कारागीर बेरोजगार झाले. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. आपली विदेश व्यापारातील तूट ही केवळ चीनमुळेच वाढली.

मात्र आता चिनी वस्तूंची लाट ओसरत असल्याची शुभचिन्हे दिसू लागली आहे. अलीकडच्या काही महिन्यांत चीनमधून होणाऱ्या आयातीत काहीशी सुस्ती दिसत आहे, तर भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली आहे.

पीएचडी चेम्बर्स ऑफ कॉमर्स या उद्योग संघटनेने या संबंधातील आकडेवारी गोळा केली आहे. या आकडेवारीनुसार 2018-19 च्या पहिल्या 10 महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय उत्पादनांची निर्यात 40 टक्क्यांनी वाढून 14 अब्ज डॉलरवर पोचली आहे.

शनिवारी या संघटनेने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार 2017-18 च्या आरंभीच्या 10 महिन्यांमध्ये (एप्रिल ते जानेवारी) चीनला 10 अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली होती. मार्चमध्ये समाप्त झालेल्या 2018- 19 या आर्थिक वर्षात हाच आकडा 14 अब्ज डॉलरवर पोचला.

या संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर महेश वाय. रेड्डी यांनी भारतीय निर्यातकांचे कौतुक केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2017-18च्या पहिल्या 10 महिन्यांत चीनमधून आयात 24 टक्के वाढली तर दुसरीकडे आयात पाच टक्क्यांनी घटली आहे. या सोबतच भारताची व्यापारी तूटही कमी झाली असून ती 53 अब्ज डॉलरवरून 46 अब्ज डॉलरवर आली आहे.

सध्या चीन हा भारतीय उत्पादनांसाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, तर चीनकडून भारत सर्वात जास्त आयात करतो. दोन्ही देशांतील परस्पर व्यापार 2001-02मध्ये केवल 3 अब्ज डॉलर होता, तो 2017-18 मध्ये वाढून सुमारे 90 अब्ज डॉलरवर पोचला होता. चीनसोबत भारताची व्यापार तूट खूप मोठी आहे, मात्र परराष्ट्र व्यापार धोरण 2015- 20 मध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात ही तूट कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या एक दशकापासून चीनने भारतीय बाजारपेठेत आपले पाय पसरले आहेत. चीनकडून भारत मुख्यतः इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यांत्रिक सामान, कार्बनिक रसायने आदींची आयात करतो. भारतातून चीनला मुख्यतः कार्बनिक रसायन, खनिज इंधन आणि कापूस इत्यादींची निर्यात केली जाते.

रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, भारत जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतीय औषध कंपन्या अमेरिका आणि युरोपीय संघाला जेनेरिक औषधांची निर्यात करत आहेत. मात्र चीनमधील कठोर गैर-शुल्क प्रतिबंधांमुळे चीनला या औषधांची निर्यात होऊ शकत नाही. ती झाली तर ही तूट आणखी कमी होऊ शकते.

भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध नेहमीच तणाव पूर्ण झालेत. त्यामुळे चीन हा भारतासाठी चिंतेचा विषय बनलाय. जागतिक व्यापार संघटना, ब्रिक्स आदी अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणा कार्यरत असताना कुठलेही सरकार तडकाफडकी एखाद्या देशातील आयात थांबवू शकत नाही. फार फार तर दर्जेदार उत्पादने, निकृष्ट उत्पादनांवर अँटी डम्पिंग शुल्क इत्यादी पद्धतींनी कारवाई करू शकते. मात्र ते पुरेसे नाही. यापरीस्थितीत चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अनेक जणांनी घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय ग्राहकांनीच घेतला आणि त्याला निर्यातकांच्या प्रयत्नांची जोड मिळाली, तर चिनी वस्तूंच्या आक्रमणाला परतवणे शक्य आहे, हेच या घडामोडीवरून दिसून येते.

Leave a Comment