आणखी एक दिवाळखोरी अन् 54 बँकांना हुडहुडी

bank
देशातील आणखी एका कंपनीने दिवाळखोरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र या एका कंपनीच्या पावलामुळे देशातील तब्बल 54 बँकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनुत्पादक कर्जांमुळे (एनपीए) आधीच गोत्यात आलेल्या या बँकांना हुडहुडी भरली आहे. ही दिवाळखोरी बँकांच्या दृष्टीने दुष्काळात तेरावा ठरणार आहे.

व्हिडिओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी आपल्या कंपनीवर90 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे जाहीर केले आहे. धूत यांच्या या घोषणेनंतर 54 बँकांच्या बॅलंस शीटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संपूर्ण व्हिडीओकॉन समूहाचे भारतीय बँकांना असलेले एकत्रित देणे हे 20,000 कोटी रुपयांच्या घरात असून ते 45 ते 50 हजार कोटी रुपये नाही, असा दावा त्यावेळी वेणुगोपाल धूत यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मात्र आता त्यांच्या ताज्या दाव्यामुळे त्या दाव्याला सुरूंग लागला आहे.

मूळ औरंगाबाद येथील असलेल्या व्हिडिओकॉन समुहातील व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (व्हीआयएल) आणि व्हिडिओकॉन टेलीकम्युनिकेशन लिमिटेड (व्हीटीएल) या दोन कंपन्या कर्जाच्या डोंगराखाली सापडल्या आहेत. व्हीआयएलवर 59,451.87 कोटी रुपये आणि व्हीटीएलवर 26,673.81 कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्हीआयएलच्या 54 कर्जदात्यांमध्ये 34 बँका असून त्यामध्ये एसबीआयचे थकीत कर्ज सर्वात जास्त आहे. एसबीआयची थकबाकी 11,175.25 कोटी रुपयांची आहे. व्हीटीएलवर एसबीआयचे थकीत कर्ज सुमारे 4,605.15 कोटी रुपये आहे. याशिवाय व्हीआयएलवर आयडीबीआय बँकेचे 9,561.67 कोटी रुपये, आयसीआयसीआय बँकेचे 3,318.08 कोटी रुपये थकीत आहे. व्हीटीएलवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 3,073.16 कोटी रुपये आणि आयसीआयसीआयचे 1,439 कोटी रुपये थकीत आहेत.

बँकांच्या कर्जाशिवाय 731 सप्लायर्सचे कर्जही व्हिडिओकॉनवर आहे. व्हीआयएलकडे या सप्लायर्सचे 3,111 कोटी 79 लाख 71 हजार 29 रुपये तर व्हीटीएलवर सप्लायर्सचे 1266 कोटी 99 लाख 78 हजार 507 रुपये थकीत असल्याचे सांगितले जाते.

इतकेच नव्हे तर व्हिडिओकॉन समुहाला नियमबाह्य कर्ज देण्याच्या वादामुळे आयसीआयसीआय बँकही गोत्यात आली आहे. बँकेच्या अध्यक्ष चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला. त्या वादानंतर दिल्ली पोलिसांनी आणखी एका प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. कोचर यांनी आयसीआयसीआयच्या प्रमुख असताना धूत यांच्या कंपनीला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यांच्या नावाचा वापर करून आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला कर्ज दिले. या कर्जाच्या बदल्यात वेणूगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवरमध्ये 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप एका गुंतवणूकदाराने केला होता. दोषी सिद्ध झाले तर धूत यांना या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.

धूत यांच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी तिरुपति सेरॅमिक्सचे मालक संजय भंडारी यांनी तक्रार दाखल केली होती. धूत यांनी 30 लाख शेअर परस्पर विकल्याचा आरोप भंडारी यांनी केला होता.

गेल्या वर्षीही कर्ज थकल्यामुळे अनेक बँकांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये (एनसीएलटी) व्हिडिओकॉनच्या विरोधात याचिका दाखल केली होती. एनसीएलटीने 57 हजार कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणांना मान्यता दिली आहे. दिवाळखोरी कायद्यानुसार कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी बँकांचे 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज थकविलेल्या 28 कंपन्यांमध्ये व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचा समावेश होता. दिवाळखोरी संहितेप्रमाणे या बँकांविरुद्ध प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांना दिल्या होत्या. त्यावेळी बँकांचे कर्ज बुडविण्यासाठी प्रवर्तकांनी देशाबाहेर पलायन केले असल्याच्याही बातम्या आल्या होत्या आणि त्या भांडवली बाजारात व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव 4 टक्क्य़ांनी कोसळला होता.

आपल्या आर्थिक साम्राज्याच्या जोरावर धूत हे काही वर्षांपूर्वी अत्यंत अहंमन्य पद्धतीने वागत होते. आज तेच दिवाळखोर म्हणून राहण्यास तयार झालेले दिसत आहेत. धूत यांनी आपले राजकीय वजन वापरून या प्रकरणातून बाहेर पडण्याचे प्रयत्न चालवले आहेत, मात्र हे प्रकरण इतके विकोपाला गेले आहे, की कोणीही त्यात हात घालायला तयार नाही. कायद्यापुढे सर्व समान हे वाक्य नेहमी वापरले जाते. मात्र अशा वाक्यांची खरी परीक्षा व्हिडिओकॉनसारख्या प्रकरणांत होते. ही धूत यांची नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेची व न्यायव्यवस्थेची कसोटी आहे.

Leave a Comment