इजिप्तमधील हजारो वर्षे जुनी शवपेटिका उघडताना केले जाणार थेट प्रक्षेपण

mummy
इजिप्तमधील कैरो शहराच्या दक्षिणेला नाईल नदीच्या किनारी मिन्या नामक ठिकाणी हजारो वर्षांपूर्वीचे एक ‘सार्कोफेगस’ (मृत शरीर ठेवलेली शवपेटिका) सापडले असून हे उघडून त्यामध्ये काय मिळते हे शोधण्याच्या तयारीमध्ये पुरातत्ववेत्ते आणि इजिप्टोलॉजिस्ट आहेत. या शव पेटीकेमध्ये एका इजिप्शियन शाही सेवकाचे शव असून, ही शवपेटिका उघडली जात असतानाचे थेट प्रक्षेपण, ‘डिस्कव्हरी चॅनल’ या अमेरिकन वाहिनीच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या खास कार्यक्रमामध्ये केले जाणार असल्याचे समजते.
mummy1
इजिप्तमध्ये सध्या राजकीय वातावरण प्रतिकूल असल्याने त्याचा थेट परिणाम येथील व्यवसायांवर आणि मुख्यत्वे पर्यटनावर होत आहे. २०११ सालपासून इजिप्त मधील राजकीय वातावरण काहीसे अस्थिर असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पर्यटनाचा व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी आणि इजिप्तला भेट देण्यास जगभरातील पर्यटकांना प्रेरित करण्यासाठी हा खास कार्यक्रम सादर केला जात असल्याचे म्हटले जात आहे. इजिप्तमध्ये अनेक ठिकाणी उत्खनने सुरु असून, याद्वारे इतिहासकारांना प्राचीन संस्कृतीशी निगडित काही ना काही पुरावे नेहमीच सापडत असतात. याचाच फायदा पर्यटनासाठी करून घेण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न असल्याचे समजते.
mummy2
या बाबतीत इजिप्तच्या ‘सुप्रीम काऊंसील ऑफ अँटीक्वीटीज’च्या वतीने कोणतेही अधिकृत वृत्त देण्यात आले नसले, तरी या संस्थेचे प्रमुख या थेट प्रक्षेपणासाठी उपस्थित राहणार असल्याचे डिस्कव्हरी वाहिनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये केल्या गेलेल्या उत्खननामध्ये हे सार्कोफेगस सापडले असून इजिप्तच्या पुरातत्व मंत्रालयाच्या सहकार्याने ही शवपेटिका उघडतानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याचे वाहिनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले होते त्या ठिकाणी सुमारे चाळीस ‘ममी’ सापडल्या असून, त्यापैकी एक सार्कोफेगस उघडले जाण्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे थेट प्रक्षेपण डिस्कव्हरी वाहिनीच्या ‘ट्रॅव्हल’ आणि ‘सायन्स’ वाहिनींवर दाखविले जाणार आहे.

Leave a Comment