दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह काही काळापूर्वी अमेरिकेमध्ये असताना टेक्सास मधील ऑस्टिन शहरातील एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये भोजनासाठी गेले. तेथील मेन्यू कार्ड मध्ये ‘दीपिका पदुकोन’ डोसा पाहून दोघांना आश्चर्य वाटले, पण त्याचबरोबर आनंदही झाला. दीपिकाने देखील आपल्या नावाचा डोसा पाहून आनंदून जात विनाविलंब या मेन्यू कार्डचे छायाचित्र आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले. गरमागरम डोश्यावर तिखट मिरची ची चटणी आणि खास बटाट्याची भाजी भरून केलेला हा ‘दिपिका पदुकोन डोसा’ असल्याची माहितीही दीपिकाने आपल्या पेजवर शेअर केली आहे.
टेक्सासमधील रेस्टॉरंटमध्ये ‘दीपिका पादुकोन’ डोसा पाहून दीप-वीर खुश
टेक्सास मधील ऑस्टिन शहरातील या भारतीय रेस्टॉरंटचे नाव ‘डोसा लॅब्स्’ असून, या रेस्टॉरंटमध्ये अनेक तऱ्हेचे डोसे उपलब्ध आहेत. तसेच या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे ‘एअरी फेरी खिमा’ आणि ‘मस्त मस्त चीझ’ हे पदार्थ या रेस्टॉरंटची खासियत असल्याचे समजते. दीपिकाची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी ‘आपल्याला हा डोसा खाऊन पाहण्यास नक्कीच आवडेल’ असे म्हणत ‘जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा डोसा आपण अवश्य चाखून पाहू’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दीपिका-पती रणवीर याने ही दीपिकाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर प्रतिक्रिया देत ‘आपल्याला देखील हा डोसा चाखून पाहण्यास आवडेल’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर अभिनित ‘गली बॉय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर उत्तम कमाई केली असून सध्या रणवीर ’83’च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे, तर दीपिकाने मेघना गुलझार दिग्दर्शित ‘छपाक’ चित्रपटासाठी काम सुरु केले आहे.